तुम्हीही रात्री उशिरा जेवण करता का ? रात्रीचा 'हा' आहार शरीराचे नुकसान करेल वेळीच काळजी घ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2022 10:57 AM2022-11-13T10:57:44+5:302022-11-13T11:06:21+5:30
संध्याकाळी ७ वाजताच जेवण करावे असा सल्ला दिला जातो. जेवणाच्याही वेळा असतात. कधी आणि काय खावे याचे नियम आहेत त्यांचे जर पालन केले तर पोटाच्या विकारांपासून दूर राहाल.
अनेकांना सवय असते रात्री भरपेट जेवून झोपण्याची. दिवसभर थकून आल्यावर रात्री जास्त आहार घेतला जातो. खूप कमी लोक असतील जे रात्री जेवल्यानंतर काही वेळ चालायला जात असतील. जेवल्या जेवल्या झोपण्याच्या सवयीमुळे अपचन होते. सतत पोटात जळजळ होते त्यामुळे नीट झोपही लागत नाही. यामुळेच कोणत्या वेळी काय खाल्ले पाहिजे हे आयुर्वेदात सांगितले आहे. चुकीच्या वेळी चुकीचा आहार घेतल्याने अपचनाच्या समस्यांना सामोरे जावे लागते. आता बघुया रात्री कोणते पदार्थ खाणे टाळले पाहिजे.
१. प्रोसेस्ड किंवा स्नॅक्स
रात्री अबरचबर खाण्याची अनेकांना सवय असते. स्नॅक्स सारख्या गोष्टी जर रात्री खात असाल तर आधी ही सवय थांबवा. कारण अशा पदार्थांमध्ये काही त्तव असतात जे अपचनाला कारणीभूत ठरतात. भविष्यात याचे गंभीर परिणामही होऊ शकतात.
२. तळलेले पदार्थ
तळलेले पदार्थ दिवसा खाल्ले तर ते पचतात मात्र रात्री या पदार्थांना पचनासाठी वेळ लागतो. यामुळे पोटात टॉक्सिंस होतात म्हणजे गॅस, उलटी यासारख्या समस्या उद्भवतात. तर असे पदार्थ शक्यतो रात्री खाणे टाळावे.
३. फळं
फळं ही शरिरासाठी उत्तम आहेतच मात्र फळं खाण्याचीही एक वेळ असते. फळं ही थंड असतात यामुळे ती रात्री खाल्ली तर सर्दी, ताप अशा समस्या येऊ शकतात. अॅलर्जी देखील होऊ शकते. फळं खाल्ल्यानंतर लगेच जेवण करु नये आणि जेवणानंतर लगेच फळांचे सेवन करु नये यामध्ये एक ते दिड तासांचे अंतर असावे असे आयुर्वेदात सांगितले आहे.
४. रेड मीट
जे मांसाहार करतात त्यांना हिवाळ्यात रेड मीट खायला आवडते. शरिरात ऊर्जा आणि गरमी यावी म्हणून रेड मीट खाल्ले जाते. मात्र याचे साईड इफेक्ट होतात. रेड मीट पचायला जास्त वेळ लागतो. झोपल्यानंतर याचे परिणाम दिसू लागतात.
५. दही
आयुर्वेदात रात्री दही खाणे वर्ज्य आहे. रात्री दही खाल्ल्याने शरिराच्या तापमानात फरक पडतो. असंतुलनामुळे इतर विकार होण्याची शक्यता असते. म्हणून रात्री शक्यतो दही न खाल्लेले बरे.
जेवल्यानंतर किती वेळाने झोपावे
पोटाचे विकार होऊ नये म्हणून रात्रीच्या जेवणाच्या वेळांवर लक्ष द्या. अनेकदा आपल्याला सांगितले जाते की संध्याकाळी ७ वाजताच जेवावे. कारण जेवल्यानंतर किमान ३ तासांनी झोपण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे पचनक्रिया सुरळित होते. जे याचे पालन करतात ते पोटाच्या विकारांपासून दूर राहतात.