पित्ताशयाच्या समस्येकडे करू नका दुर्लक्ष, पडेल महागात...बघा डॉक्टर काय सांगतात
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2021 04:50 PM2021-06-24T16:50:33+5:302021-06-24T17:32:02+5:30
आपल्या शरीरातील कोणत्याही भागात बिघाड झाला कि आपल्याला लगेचच त्या आजारांची लक्षणे दिसू लागतात. त्यावर उपाय करणे जरुरीचे असते. पित्ताशयाची समस्या अशीच एक. जाणून घेऊया लक्षणे आणि उपाय...
आपल्या शरीरातील कोणत्याही भागात बिघाड झाला कि आपल्याला लगेचच त्या आजारांची लक्षणे दिसू लागतात. त्यावर उपाय करणे जरुरीचे असते. पित्ताशयाची समस्या अशीच एक. यामध्ये वाढत्या कॉलेस्ट्रॉलमुळे शरीरात पित्ताचे खडे होतात. जर्नल और लेप्रोस्कोपिक सर्जन डॉ.अमित अग्रवाल यांनी नवभारत टाईम्सच्या संकेतस्थळाला या आजाराची लक्षणे आणि कारणे सांगितली आहेत.
पित्ताशयाचे कार्य काय?
पित्ताशय हा यकृताच्या मागे व खालच्या बाजूला असलेला एक छोटा पिशवीसारखा अवयव आहे. पित्ताशयाचे मुख्य काम पित्त साठवणे व त्याचा निचरा करणे होय. यामुळे आहारातील चरबीचे पचन होण्यास मदत होते.
पित्ताशयात खडे होण्याची कारणे काय असतात?
पित्तामध्ये कोलेस्टेरॉल तसेच इतर अनेक रासायनिक द्रव्ये असतात. या सर्वांमध्ये असमतोल निर्माण झाल्यास पित्ताशयात खडे तयार होतात असे मानले जाते. बहुतेक वेळा पित्तामधील कोलेस्टेरॉलची पातळी खूप वाढते आणि या अतिरिक्त कोलेस्टेरॉलचे खडे तयार होतात. पित्ताशयातील खडे हा बऱ्याच लोकांमध्ये आढळून येणारा त्रास आहे.
पित्ताशयात खडे होण्याचा धोका खालील कारणांमुळे वाढतो
प्रमाणापेक्षा जास्त वजन
स्त्स्त्रियांमध्ये पित्ताशयात खडे होण्याचा त्रास पुरुषांपेक्षा २ ते ३ पटींनी जास्त आढळतो.
४० वर्षांपेक्षा जास्त वय
स्त्रियांमध्ये मुले झाल्यानंतर - गर्भावस्थेमध्ये स्त्रियांच्या शरीरातील संप्रेरकांमध्ये अनेक बदल घडून येतात. या बदलांमुळे कोलेस्टेरॉलची पातळी वाढते व म्हणूनच पित्ताशयात खडे होण्याचा धोका वाढतो.
पित्ताशयातील खड्यांची लक्षणे काय असतात?
पोटात तीव्र वेदना. या वेदना पोटातून उजव्या खांद्याकडे किंवा पाठीकडे जातात. जेवल्यानंतर किंवा काही खाल्ल्यानंतर विशेषतः चरबीयुक्त (तेल-तूप असणारे) पदार्थ खाल्ल्यानंतर या वेदना वाढतात. पोटात टोचल्यासारखे किंवा कळ येऊन दुखते किंवा मध्यम तीव्रतेचे पण सतत दुखते. दीर्घ श्वास घेतल्यावर वेदना वाढतात. छातीत दुखते. छातीत जळजळ होते, अपचन पोटात वात धरतो. पोट सतत फुगल्यासारखे वाटते. मळमळ, उलट्या, ताप येतो. पोटात विशेषतः वरच्या भागात उजव्या बाजूला हात लावल्यावर दुखणे. शौचाचा रंग फिका किंवा मातकट दिसतो.
उपाय
वजन आटोक्यात ठेवणे हा पित्ताशयावरील एक उत्तम उपाय आहे. मात्र वजन कमी करताना ते जलद गतीने करू नका नाहीतर त्याचे दुष्परिणाम होतील. रोज व्यायाम करा आणि अँटीइन्फेमेंटरी डाएट घ्या.
या शिवाय त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्यायला विसरु नका.