पायाच्या 'या' समस्या जाणवल्यास अजिबात करू नका दुर्लक्ष, असू शकतो हा गंभीर आजार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2021 08:09 PM2021-06-14T20:09:55+5:302021-06-14T20:17:54+5:30
काही शारीरीक समस्या सामान्यतः प्रौढ आणि वयस्कर व्यक्तींमध्ये जास्त दिसून येत होत्या. मात्र आता बदलेल्या लाईफस्टाईलमुळे तरूणांमध्येही या समस्या दिसून येत आहेत.
डायबेटीसची समस्या सामान्यतः प्रौढ आणि वयस्कर व्यक्तींमध्ये जास्त दिसून येत होती. मात्र आता बदलेल्या लाईफस्टाईलमुळे तरूणांमध्येही ही समस्या दिसून येते. जेव्हा शरीरात रक्तातील साखरेची पातळी अनियंत्रित होते, तेव्हा शरीरात डायबेटीजची लक्षणं दिसू लागतात. यापैकी काही लक्षणं ही पायांमध्येही दिसतात. अशावेळी त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणंच योग्य.
डायबेटीजची पायांमध्ये दिसून येणारी लक्षणं पुढीलप्रमाणे-
पायाला जखम होणं
जर तुमच्या पायांवर आपोआप जखमा होत असतील किंवा एखादी छोटीशी जखम मोठी होत असेल तर तुम्ही सावध राहिलं पाहिजे. ब्लड शुगरचं प्रमाण वाढलं की बॅक्टेरियांचं प्रमाण वाढतं. यामुळे पायांपर्यंत पुरेसा रक्तप्रवाह होत नाही. यामुळेच जखमा होण्याची शक्यता असते.
पाय सुन्न होणं
जेव्हा शरीरात रक्तातील साखरेची पातळी वाढते तेव्हा शरीराच्या नसांना कमकुवत होतात. त्यांची संवेदनाही कमी होते. परिणामी पाय सुन्न होण्याची समस्या आढळते.
पाय सुजणं
पाय सुजणं हे डायबेटीजचं सामान्य लक्षणं मानलं जातं. सतत तुमच्या पायाला सूज येत असेल तर ती डायबेटीजची समस्या असल्याची शक्यता आहे. कारण रक्तात साखरेची मात्रा वाढल्यानंतर शरीरातील विविध भागांमध्ये रक्तपुरवठा होत नाही. ज्यामुळे पायांना सूज येऊ शकते.
पायाच्या त्वचेची जळजळ होणं
डायबेटीजमध्ये तुमच्या पायाच्या त्वचेची जळजळ होऊ शकते. याचे कारण असे की, डायबेटीजमुळे होणारं यीस्ट इन्फेक्शन, कोरडी त्वचा या समस्या कारणीभूत असतात. यामुळे तळापायाची त्वचाही जास्त जळजळते. त्यामुळे जर पायांना अशी जळजळ जाणवत असेल तर तुम्ही त्वरित डॉक्टरचा सल्ला घ्या.