अरे व्वा! अँटी कोरोना औषध २ ते ३ दिवसात बाजारात उपलब्ध होणार; DRDO अध्यक्षांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2021 04:11 PM2021-05-16T16:11:47+5:302021-05-16T16:33:57+5:30
DRDO invented a medicine : पुढच्या आठवड्यापासून कोरोना रुग्णांना हे औषध मिळायला सुरूवात होईल. हे औषध पावडर स्वरूपात उपलब्ध होणार आहे. जूनपर्यंत सगळ्या रुग्णांना हे औषध उपलब्ध होणार आहे.
कोरोनाची लढाई जिंकण्यासाठी अनुसंधान आणि विकास संगठन (डीआरडीओ) चे नवीन औषध काही दिवसातच बाजारात येण्याची शक्यता आहे. या औषधावर रिसर्च करत असलेल्या टिमचे मुख्य वैज्ञानिक डॉ. अनंत नारायण भट्ट यांनी सांगितले की, ''पुढच्या आठवड्यापासून कोरोना रुग्णांना हे औषध मिळायला सुरूवात होईल. हे औषध पावडर स्वरूपात उपलब्ध होणार आहे. जूनपर्यंत सगळ्या रुग्णांना हे औषध उपलब्ध होणार आहे. ''
डीआरडीओच्या रिसर्च लॅब इन्स्टिट्यूट ऑफ न्यूक्लिअर अँड अलाइड सायन्सेस (आयएनएमएएस) चे वैज्ञानिक डॉ. भट्ट म्हणाले की, ''ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (डीसीजीआय) च्या मान्यतेनंतर डॉ. रेड्डीच्या प्रयोगशाळेने त्याच्या निर्मितीवर मोठ्या प्रमाणात काम केले आहे.
हे औषध विशेषत: अशा रुग्णांना फायदा करेल जे व्हेंटिलेटरवर किंवा ऑक्सिजनसह आहेत. असे रुग्ण लवकरच बरे होऊ शकतात. या औषधाचे उत्पादन वेगानं सुरू असून जूनपासून या औषधाचे 50 हजार ते एक लाख डोस दररोज लोकांना उपलब्ध करून दिले जातील.''
असे आहे नव्या औषधाचे स्वरूप
डीआरडीओचे २-डेओक्सी-डी-ग्लुकोज (२-डीजी) हे कोरोनावरील नवे औषध पावडर स्वरुपात असून रुग्णाने ते पाण्यात मिसळून घ्यायचे आहे. कोरोनामुळे कोणत्या पेशी बाधित झाल्या आहेत याची ओळख हे औषध पटविते व त्या पेशींचे कार्य सुधारते. रुग्णाच्या प्रतिकारशक्तीत वाढ करून विषाणूला रोखण्याचे काम करते. देशात रुग्णांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढत असताना हे गुणकारी औषध त्यांच्यासाठी वरदान ठरेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
४२% रुग्णांना ऑक्सिजन पुरवठ्याची गरज नाही
या औषधाची मानवी चाचण्यांची तिसरी फेरी डिसेंबर २०२० ते मार्च २०२१ या कालावधीत महाराष्ट्रासह देशभरातील २७ रुग्णालयांमध्ये पार पडली. त्यात सहभागी झालेल्यांपैकी ४२ टक्के रुग्णांच्या प्रकृतीत खूप सुधारणा होऊन त्यांना बाहेरुन ऑक्सिजनचा पुरवठा करण्याची गरज उरली नाही.