जेवण केल्यावर लगेच थंड पाणी पिण्याची सवय पडू शकते महागात; वाचा तोटे!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2018 10:16 AM2018-10-17T10:16:31+5:302018-10-17T10:16:58+5:30
वातावरण गरम असेल तर थंड पाणी पिणे अनेकांना चांगलं आणि थंडावा देणारं वाटतं. पण जेवण झाल्यावर थंड पाणी पिण्याचे अनेक गंभीर नुकसान आहेत.
वातावरण गरम असेल तर थंड पाणी पिणे अनेकांना चांगलं आणि थंडावा देणारं वाटतं. पण जेवण झाल्यावर थंड पाणी पिण्याचे अनेक गंभीर नुकसान आहेत. याचा प्रभाव थेट तुमच्या पचनक्रियेवर पडू शकतो. आणि यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते.
जास्तीत जास्त लोकांना असं वाटतं की, जेवण केल्यावर पाणी पिणे गरजेचे आहे. पण त्यांना हे माहीत नसतं पाणी साधं प्यावं कि थंड.
जेवण केल्यावर लगेच थंड पाणी प्यायल्याने पित्ताशयासाठी फारच धोकादायक आहे. आपल्या शरीराचं सामान्य तापमान ९८.६ डिग्री फॅरेनहाइट म्हणजे ३७ डिग्री सेल्सिअस असतं. त्यामुळे आपल्या शरीरासाठी २०-२२ डिग्री सेल्सिअस तापमान असलेलं पाणी फायदेशीर ठरतं. पण त्यापेक्षा थंड पाणी हानिकारक आहे.
जेव्हाही थंड पाणी सेवन केलं जातं तेव्हा ते गिळायला जरा वेळ लागतो. कारण आधी पाणी तोंडातच राहतं आणि त्याचं तापमान सामान्य झाल्यावर ते घशाखाली उतरतं. जास्त थंड पाणी प्यायल्याने टॉन्सिल्सची समस्याही होण्याची शक्यता आहे. चला जाणून घेऊ जेवण केल्यावर थंड पाणी पिण्याचे नुकसान...
पोटासंबंधी समस्या
थंड पाणी प्यायल्याने शरीरात तयार होणाऱ्या पचन रसाचं तापमानही कमी होतं. त्यामुळे पचनक्रिया योग्यप्रकारे होण्यास अडचण येते. तसेच थंड पाणी प्यायल्याने पोटाच्या आतड्याही आकुंचन पावतात. हे पोटाच्या वेगवेगळ्या समस्या होण्याचं मुख्य कारण असू शकतं. ज्या लोकांना पोटाच्या समस्या नेहमी होतात त्यांनी थंड पाणी सेवन करु नये.
हार्ट अटॅकचा धोका
काही लोकांना सवय असते की, जेवण केल्यावर ते लगेच थंड पाणी पितात. पण ही सवय तुमच्या हृदयासाठी हानिकारक होऊ शकते. हार्ट अटॅक आणि पाण्याचा जवळचा संबंध आहे. एका रिसर्चमधून समोर आले आहे की, जेवण केल्यावर थंड पाणी प्यायल्याने हार्ट अटॅकचा धोका वाढतो. आंतरराष्ट्रीय अभ्यासकांच्या एका समूहाने चीन आणि जपानमधील लोकांवर हा रिसर्च केला होता. चीन आणि जपानमधील लोक जेवण केल्यावर थंड पाणी पित नाहीत. हे लोक जेवण केल्यावर गरम चहा घेतात. अभ्यासकांना आढळलं की, या लोकांमध्ये हार्ट अटॅकची समस्या फारच कमी आहे.
फॅट तयार होतं
तज्ज्ञांनुसार, जेवण केल्यावर थंड पाणी प्यायल्याने पचनक्रिया हळुवार होते. पचनक्रिया कमी झाल्याने पोटाची समस्या होऊ शकते. त्यासोबतच जेव्हा हे पाणी पदार्थांसोबत पोटातील अॅसिडच्या संपर्कात येतं तेव्हा ते फॅटमध्ये रुपांतरित होतं. याने अनेक गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात.
कफ होण्याची समस्या
जेवण केल्यावर थंड पाणी प्यायल्याने शरीरात कफ तयार होतो. जेव्हा शरीरात जास्त कफ तयार होतो तेव्हा तुमची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. आणि याच कारणाने सर्दी-खोकला वाढतो. त्यामुळे जेवण केल्यावर थंड पाणी सेवन करु नये. थोडं साधं पाणी प्यायल्यास समस्या होणार नाही.