स्मरणशक्ती वाढवण्यासाठी संत्र्याचा ज्यूस फायदेशीर - रिसर्च
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2018 10:18 AM2018-11-23T10:18:17+5:302018-11-23T10:18:43+5:30
जर तुम्हाला तुमची स्मरणशक्ती वाढवायची असेल आणि म्हातारपणीही ती कमी होऊ नये असे वाटत असेल तर आताच काही पदार्थांचं सेवन करणं गरजेचं आहे.
(Image Credit : breakingmuscle.com)
वाढत्या वयासोबत स्मरणशक्ती कमी होणे आणि गोष्टी विसरणे सामान्य बाब आहे. पण जर तुम्हाला तुमची स्मरणशक्ती वाढवायची असेल आणि म्हातारपणीही ती कमी होऊ नये असे वाटत असेल तर आताच काही पदार्थांचं सेवन करणं गरजेचं आहे. एका शोधातून समोर आले आहे की, जे पुरुष हिरव्या पाले भाज्या, गर्द केशरी आणि लाल रंगाच्या भाज्या, स्ट्रॉबेरी, ब्लॅकबेरी आणि ब्लूबेरी यांसारखे फळं खातात तसेच संत्र्याचा ज्यूस पितात त्यांना म्हातारपणात स्मरणशक्ती गमावण्याचा धोका कमी असतो.
भरपूर फळं आणि भाज्या
या शोधाच्या निष्कर्षातून हे समोर आलं आहे की, जे पुरुष वृद्धापकाळाच्या २० वर्षांआधी म्हणजेच तरुण असतानाच जास्तीत जास्त प्रमाणात फळं आणि भाज्या खातात, त्यांना विचार आणि स्मरणशक्तीशी निगडीत समस्या कमी होतात. नंतर त्यांनी फळं खाल्ली नाही तरी चालेल. जे पुरुष जास्तीत जास्त भाज्यांचं सेवन करतात, त्यांच्यातील विचारशक्ती अधिक मजबूत होऊ शकते.
संत्र्याच्या ज्यूसचा मोठा फायदा
अभ्यासकांना आढळले की, जे पुरुष रोज संत्र्याच्या ज्यूस पितात, त्यांची विचारशक्ती संत्र्याचा ज्यूस न पिणाऱ्यांच्या तुलनेत ४७ टक्के जास्त विकसीत असते. जे महिन्यातून एकदाही संत्र्याचा ज्यूस पित नाहीत, त्यांना स्मरणशक्ती संबंधी समस्या होऊ शकतात.
हॉवर्ड यूनिव्हर्सिटीच्या बॉस्टन येथील टी.एच.चान स्कूल ऑफ पब्लिक हेल्थचे चांगझेंग यूआन म्हणाले की, 'या शोधाची सर्वात चांगली बाब ही होती की, आम्ही यात सहभागी लोकांचा २० वर्ष अभ्यास केला. त्यांचं निरीक्षण केलं. आमच्या शोधातून याबाबत ठोस पुरावे समोर आले आहेत की, मेंदु निरोगी ठेवण्यासाठी आहार महत्त्वाचा आहे'.
२८ हजार पुरुषांवर शोध
हा शोध न्यूरॉलॉजी जर्नलमध्ये प्रकाशित केला आहे. हा शोध एकूण २७ हजार ८४२ पुरुषांवर करण्यात आला. यांचं वय सरासरी ५१ वर्ष होतं. यातील ५५ टक्के सहभागी लोकांची स्मरणशक्ती चांगली आढळली. तर ३८ टक्के लोकांची स्मरणशक्ती ठीक होती आणि केवळ ७ टक्के लोकांची स्मरणशक्ती कमजोर होती.
संत्र्याच्या ज्यूसचे इतर फायदे
संत्र्यामध्ये असलेलं सिट्रीक अॅसिड स्कीनला हायड्रेट ठेवण्यासोबतच सूर्याच्या घातक किरणांपासूनही सुरक्षा देतं. त्यामुळे रोज आपल्या डाएटमध्ये संत्र्याचा ज्यूस सामिल करा. या ज्यूसमुळे पचनक्रियाही चांगली होते. संत्र्यामध्ये भरपूर अँटिऑक्सिडंट्स असतात. हेस्पेरीडीन नावाच्या अँटिऑक्सिडंटमुळे रक्तवाहिन्या निरोगी राहतात आणि हृदयरोगांची शक्यता कमी होते. अमेरिकन संशोधकांच्या मते जे पुरुष दररोज ५०० मिली संत्र्याचा रस सेवन करतात त्यांच्या शरीराला २९२ मिली ग्रॅम हेस्पेरीडीन मिळते. हा रस उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासही मदत करतो. यामुळे किडनी स्टोन्स तयार होत नाहीत. संत्र्याचा रस ‘क’ जीवनसत्त्वाचा चांगला स्रोत आहे. कारण हे जीवनसत्त्व खास करून आंबट फळांमध्येच आढळते.