डायबिटीजचा धोका कमी करण्यासाठी रोज ३-४ कप कॉफी फायदेशीर!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2018 10:21 AM2018-11-15T10:21:03+5:302018-11-15T10:21:17+5:30
दिवसेंदिवस मधुमेह या आजाराचा धोका वाढतो आहे. पूर्वी मधुमेह हा वृद्धावस्थेत होणारा आजार अशी समज होता.
दिवसेंदिवस मधुमेह या आजाराचा धोका वाढतो आहे. पूर्वी मधुमेह हा वृद्धावस्थेत होणारा आजार अशी समज होता. पण आता कमी वयातही हा आजार अनेकांना आपल्या जाळ्यात अडकवत आहे. मात्र, वेळीच जर याची लक्षणे ओळखली तर यातून सुटका होऊ शकते. वेगवेगळे रिसर्च या आजाराला दूर करण्यासाठी सतत केले जातात. त्यानुसार, दररोज तीन ते चार कप कॉफी प्यायल्याने डायबिटीज टाइप-२ चा धोका २५ टक्के कमी होतो. ही माहिती एका शोधातून निघालेल्या निष्कर्षातून देण्यात आली आहे.
इंस्टिट्यूट फॉर सायंटिफीक इन्फॉर्मेशन ऑन कॉफी (ISIC)च्या रिपोर्टनुसार, कॉफीचं सेवन आणि डायबिटीज धोका कमी करणे यात खोलवर संबंध आहे.
डायबिटीज टाइप -२ प्रकरणांमध्ये कॉफी पिण्याचा प्रभाव पुरुष आणि महिला दोघांमध्येही आढळला. स्वीडनचे कारोलिंस्का इन्स्टिट्यूटचे सहायक प्राध्यापक मॅट्टियस काल्स्ट्रोम म्हणाले की, केवळ कॅफीन नाही तर हायड्रॉक्सीसिनेमिक अॅसिडमुळे हा प्रभाव होतो. हायड्रॉक्सीसिनेमिक अॅसिडमध्ये प्रामुख्याने क्लोरोजेनिक अॅसिड, ट्राजोनेलिन, कॅफेस्टॉल, कॉवियोल आणि कॅफीक अॅसिड आढळतं.
या शोधातून निघालेले निष्कर्ष यूरोपिय असोसिएशन फॉर स्टडी ऑफ डायबिटीजचे २०१८ जर्मनीमध्ये आयोजित संमेलनात सादर करण्यात आले. या शोधाच्या संशोधकांनी एकूण १ कोटी ११ लाख ८५ हजार २१० लोकांना सहभागी करुन घेण्यात आले होते. या शोधानुसार, यात वेगवेगळे मुद्दे आहेत. जसे की, अॅटी-ऑक्सिडेंट इफेक्ट, अॅंटी-इंफ्लेमेट्री इफेक्ट, थेर्मेजेनिक इफेक्ट इत्यादी. त्यामुळे शोधातून सांगण्यात आले आहे की, ३ ते ४ कप कॉफी दररोज प्यायल्याने टाइप २ डायबिटीजचा धोका २५ टक्के कमी होतो.
कमी वयात मधुमेहाचा विळखा
मधुमेहाचा रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना आता या आजाराचा विळखा कुमारवयातच पडू लागल्याचे पुण्यातील एका अभ्यासातून समोर आले आहे. त्यातही या वयातील मुलांपेक्षा मुलींमध्ये टाईप २ मुधमेहाचे प्रमाण अधिक आढळून आले आहे. बदलत्या जीवनशैलीबरोबरच या आजाराच्या लक्षणांकडे होत असलेल्या दुर्लक्षामुळे हे प्रमाण वाढत असल्याचा निष्कर्ष अभ्यासातून काढण्यात आला आहे.
मागील काही वर्षांपासून भारतात मधुमेहग्रस्त रुग्णांचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. त्यामध्ये बैठे काम असलेली जीवनशैली आणि खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे टाईप २ प्रकारचा मधुमेह होतो. भारतीयांमध्ये तो तुलनेने कमी वयोगटांत म्हणजे १८ ते ३० वर्षे या वयोगटात आढळून येत आहे. एका खासगी संस्थेने पुणे शहरातील त्यांच्याकडे आलेल्या १२ हजार १८२ जणांच्या मधुमेहाबाबतच्या माहितीचा अभ्यास केला. ही माहिती सप्टेंबर २०१७ ते ऑस्ट २०१८ या कालावधीतील आहे. या अभ्यासानुसार २० वर्षांखालील दहा टक्के मुलींना मधुमेहाचा विळखा पडला आहे. तर तेवढ्याच मुली काठावर आहेत. त्यातुलनेत ८ टक्के मुले मधुमेहग्रस्त असून ५ टक्के काठावर आहेत. वयोगट वाढत गेल्यानंतर ही स्थिती उलटी झाली आहे. पुरूषांमध्ये तुलनेने मधुमेह अधिक आढळून आला आहे.