Pregnancy Care Tips : गरोदरपणात कॉफीचं सेवन करणं बाळासाठी असं पडू शकतं महागात...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2020 05:05 PM2020-01-08T17:05:47+5:302020-01-08T17:10:07+5:30
Pregnancy Care Tips : सगळ्यांनाच कॉफी किंवा चहा पिण्याची सवय असते.
(image credit- romper)
सगळ्यांनाच कॉफी किंवा चहा पिण्याची सवय असते. कारण चहा प्यायल्यानंतर ताजेतवाने झाल्यासारख वाटत असतं. पण तुम्हाला हे माहित आहे का जर गरोदरपणात बाळाच्या आईने कॉफीचं सेवन केलं तर आईच्या तसंच बाळाच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतं. महिलांना गरोदर असताना डोहाळे लागतात त्यावेळी त्यांना कोणतेही पेय पिण्याची इच्छा होऊ शकते. काही जणांना कॉफी प्यायला आवडतं असतं. कॉफीचे जास्त सेवन गरोदर असताना केले तर बाळाच्या अवयवांवर परिणाम होतो. गरोदरपणात केले जाणारे कॅफिनचे सेवन याबाबत रिसर्च करण्यात आला आहे.
सगळ्यात आधी हा रिसर्च उंदरांवर करण्यात आला. पिल्लाला जन्म देणार असलेल्या उंदराला कॅफिन देण्यात आले. त्यामुळे ताण- तणाव वाढल्यामुळे हार्मोन्समध्ये बदल झाला. त्यामुळे जन्माला आल्यानंतर पिल्लाचे वजन कमी झालेले दिसून आले. तसंच लिव्हरच्या विकासात अडथळा निर्माण झाला. जर्नल ऑफ एंडोक्रिनोलॉजी यात प्रकाशित करण्यात आलेल्य रिसर्चनुसार २- ३ कप कॉफी प्यायल्याने हार्मोन्सचे संतुलन बिघडण्याची शक्यता असते.
कॅफिनच्या सेवनाचा परीणाम बाळाच्या लिव्हरवर होत असतो. या रिसर्चमधून असं दिसून आलं की गरोदरपणात कॅफिनचे सेवन केल्यामुळे ताण-तणाव वाढून बाळाच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होत असतो. गरोदरपणात कॅफिन चे सेवन केल्यास फॅटि लिव्हर हे आजारपण वाढण्याचा धोका असतो. तसंच बाळाचं वजन कमी होण्याची शक्यता असते.
(Image credit- boston university)
तज्ञांच्या म्हणण्यानुसार गरोदरपणात कॉफिचं सेवन केल्यास आरोग्यासाठी घातक ठरतं. पण गरोदरपणात वेगवेगळ्या बदलामुळे अनेक पदार्थ खावेसे वाटत असतात. त्यावेळी काही महिलांना कॉफी पिऊन आराम मिळतो. कॅफिनच्या सेवनानाने तुमच्या झोपेवर सुद्दा परिणाम होतो. झोप पूर्ण न झाल्यामुळे तुमच्या आणि बाळाच्या आरोग्यावर वाईट परिणाम होण्याची शक्यता असते.