बाटलीला तोंड लावून पाणी प्यायल्याने आरोग्यावर होतो वाईट परिणाम?; जाणून घ्या, योग्य पद्धत
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2024 02:04 PM2024-08-07T14:04:48+5:302024-08-07T14:06:13+5:30
सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत पाणी पिण्याचे अनेक मार्ग सांगण्यात आले आहेत जे आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. पाणी पिण्याची योग्य पद्धत कोणती आहे ते जाणून घेऊया...
पाणी आपल्या शरीरासाठी अत्यंत आवश्यक आहे. आपल्या शरीरात ६५-७० टक्के पाणी असतं. आपल्याला ऊर्जा देण्यासोबतच पाणी आपल्याला हायड्रेट ठेवतं. तसेच अनेक आजारांपासून संरक्षण करण्याचं काम करतं. पाण्याचे असंख्य फायदे आहेत. पण पाणी पिण्याची योग्य पद्धत माहीत असणारे फार कमी लोक आहेत.
पाणी नीट प्यायलं नाही तर अनेक समस्या उद्भवू शकतात. उदाहरणार्थ, काही लोक बोलत असताना पाणी पितात तर काही लोक उभं राहून पाणी पितात, जे चुकीचं आहे. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत पाणी पिण्याचे अनेक मार्ग सांगण्यात आले आहेत जे आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. पाणी पिण्याची योग्य पद्धत कोणती आहे ते जाणून घेऊया...
बाटलीला तोंड लावून पाणी पिण्याचे तोटे
बहुतेक लोकांना बाटलीला तोंड लावून पाणी प्यायला आवडतं. यामुळे त्यांचं नुकसान होऊ शकतं. बाटलीला तोंड लावून पाणी प्यायल्याने त्यात लाळ मिसळते, त्यामुळे बॅक्टेरिया वाढू शकतात आणि आजारांचं ते कारण ठरू शकतं. एका श्वासात पाणी पिणं देखील धोकादायक आहे. त्यामुळे पोट फुगण्याची भीती असते.
एकाच ग्लासातून पाणी पिणं हानिकारक
एकच ग्लास न धुता आठवडाभर पाणी पिण्यासाठी कधीही वापरू नये. यामुळे, काचेच्या पृष्ठभागावर बॅक्टेरिया वाढतात, जे त्वरीत आरोग्यास हानी पोहोचवू शकतात. त्यामुळे पाण्याचा ग्लास नेहमी साबणाने पूर्णपणे स्वच्छ करावा.
पाणी नेमकं कधी प्यावं?
- रात्री झोपण्यापूर्वी आणि सकाळी उठल्यानंतर एक ग्लास पाणी प्यायल्याने दिवसभर एनर्जी टिकून राहते आणि पोटाचा त्रास होत नाही.
- वाढलेलं वजन कमी करण्यासाठी जेवण करण्यापूर्वी एक ग्लास पाणी प्यावं.
- जिममध्ये किंवा घरी व्यायाम करण्यापूर्वी आणि नंतर एक ग्लास पाणी पिणे फायदेशीर आहे.
- दिवसभरात दर तासाला थोडं थोडं पाणी प्यावं. सिप्समध्ये पाणी पिण्याचे अनेक फायदे आहेत.
- उभं राहून कधीही पाणी पिऊ नये. आरामात बसून प्यावं. यामुळे किडनी आणि गुडघे निरोगी राहतात.
- कोमट पाणी प्यायल्याने पचनक्रिया चांगली राहते.
- गरम दूध, चहा प्यायल्यानंतर किंवा उन्हातून आल्यावर किंवा तळलेले पदार्थ खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये.