तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्याचे हे आहेत आरोग्यदायी फायदे
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2018 11:13 AM2018-04-02T11:13:03+5:302018-04-02T11:13:03+5:30
अनेकजण तांब्यांचं कडं हातात घालत असल्याचंही बघायला मिळतं. चला जाणून घेऊया तांब्याच्या भांड्याचे फायदे…..
मुंबई - आरोग्याची योग्य काळजी घेण्यासाठी पूर्वीपासून काही गोष्टींची आवर्जुन काळजी घेतली जाते. त्यातील काही गोष्टी आजही मोठ्या प्रमाणात फॉलो केल्या जातात. त्यात सर्वात जास्त प्रचलित असलेली गोष्ट म्हणजे धातूच्या भांड्यातील पाणी पिणे.
धातूच्या भांड्यांबद्दल फार पूर्वीपासून खूप काही चांगलं सांगितलं जातं. धातू शरिरासाठी कसे फायदेशीर आहेत याबाबतही सांगितलं जातं. त्यात तांब्याचं भांडं अतिशय शुद्ध समजलं जातं. अनेक घरांमध्ये लोक तांब्याच्या भांड्यातून पाणी पित असल्याचं तुम्हाला बघायला मिळेल. अनेकजण तांब्यांचं कडं हातात घालत असल्याचंही बघायला मिळतं. चला जाणून घेऊया तांब्याच्या भांड्याचे फायदे…..
१) तांब्याच्या भांड्यातील पाणी पिल्याचे अनेक आरोग्यदायी फायदे सांगितले जातात. याने शरीरातील तांब्याची कमतरता पूर्ण होते. याने रोग पसरवणाऱ्या जिवाणूंपासून शरीर सुरक्षित राहतं.
२) तांब्याच्या भांड्यात ठेवलेलं पाणी अधिक शुद्ध मानलं जातं. हे पाणी जुलाब, कावीळ, अतिसार यांसारखे अनेक आजार पसरवणाऱ्या जिवाणूंना नष्ट करतं.
३) तांब्यात अँटी-इन्फ्लेमेटरी(विषाणूंशी लढण्याचे) गुण असतात. ज्यामुळे शरीराला वेदना, वात आणि सूज येत नाही. संधिवात असल्यास तांब्याच्या भांड्यातून पाणी प्यायल्याने फायदा होतो.
४) अमेरिकन कॅन्सर सोसायटीनुसार, कॅन्सरची सुरुवात रोखण्यास तांबे फायदेशीर आहे. यामध्ये कॅन्सरविरोधी घटक असतात.
५) पोटाच्या वेगवेगळे आजार पळवून लावण्यासाठी तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. हे केल्यास तुमचा डॉक्टरकडे होणारा खर्च नक्कीच कमी होऊ शकतो. दररोज हे पाणी प्यायल्यास पोटदुखी, गॅस,अॅसिडिटी आणि बद्धकोष्ठता यांसारख्या समस्यांवर आराम मिळतो.
६) तांब्याच्या भांड्यात ठेवलेलं पाणी प्यायल्याने त्वचेवर कोणत्याही प्रकारची समस्या होत नाही. या पाण्यामुळे पिंपल्स तसेच त्वचेसंदर्भातील रोग होत नाहीत. तसंच त्वचा साफ आणि अधिक चमकदार होते.
७) शरीराच्या अंतर्गत सफाईसाठी तांब्याचं पाणी फायदेशीर आहे. याशिवाय हे पाणी यकृत आणि किडनी निरोगी ठेवतो. कोणत्याही प्रकारच्या इन्फेक्शनपासून बचावासाठी तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवणं लाभदायक असतं.