...तर माणसाचं अस्तित्व धोक्यात; 'हे' आहे चिंताजनक कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2018 03:43 PM2018-10-09T15:43:20+5:302018-10-09T15:44:08+5:30
आधुनिक जीवनशैली, ताण-तणावामुळे माणसासमोर अस्तित्वाचा प्रश्न
मुंबई: पुरुषांची प्रजनन क्षमता दिवसेंदिवस कमी होत असल्याचं एका अभ्यासातून समोर आलं आहे. ही क्षमता अशीच कमी होत राहिल्यास माणसाचं अस्तित्वच धोक्यात येऊ शकतं. रसायनांचा अतिवापर, प्रदूषण आणि आधुनिक जीवनशैलीचा विपरित परिणाम पुरुषांच्या प्रजनन क्षमतेवर होत असल्याचं निरीक्षण संशोधनातून नोंदवण्यात आलं आहे. यासाठी अमेरिका आणि युरोपमधील कृत्रिम बिजारोपण केंद्रात येणाऱ्या 1 लाख 24 हजार पुरुषांच्या प्रजनन क्षमतेचा अभ्यास करण्यात आला. यामध्ये पुरुषांच्या विर्याचा दर्जा दर वर्षी 2 टक्क्यांनी खालावतो आहे.
पुरुषांच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम झाला असल्यास आणि अनेकदा अनेकदा स्पर्म डोनरची मदत घेतली जाते. मात्र आणखी एका संशोधनातून स्पर्म डोनर्सच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम झाल्याचं समोर आलं आहे. या संशोधनात 2 हजार 600 स्पर्म डोनर्सचा अभ्यास करण्यात आला. आधुनिक जीवनशैली, त्यामुळे येणारे ताण-तणाव यांचा प्रतिकूल परिणाम स्पर्म डोनरच्या शारीरिक स्थितीवरही झाल्याचं यातून दिसून आलं. त्यामुळे या संशोधनाचं गांभीर्य वाढलं आहे.
सध्या बहुतांश पुरुष दोन मुलांना जन्म देऊ शकतात. मात्र विर्याचा दर्जा घसरत चालल्यानं माणसाच्या अस्तित्वासमोर मोठं संकट निर्माण होऊ शकतं. 2017 मध्येही सध्याचं वातावरण आणि त्याचा पुरुषांच्या प्रजनन क्षमतेवर होत असलेला परिणाम याबद्दल एक संधोशन करण्यात आलं. 1973 ते 2011 या कालावधीत विर्याचं प्रमाण आणि दर्जा यामध्ये 59 टक्क्यांनी घट झाली आहे. शेतीमध्ये केला जाणारा रसायनांचा भरमसाठ वापर, हार्मोन्सवर परिणाम केली जाणारी किटकनाशकं, तणाव, धूम्रपान, स्थूलत्व यामुळे विर्याच्या दर्जावर परिणाम होत असल्याचं संशोधनातून समोर आलं आहे.