शरीरात होणारे 'हे' बदल 'सेप्सिस'ची लक्षणं असू शकतात; जाणून घ्या काय आहे 'हा' आजार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2019 12:26 PM2019-09-16T12:26:47+5:302019-09-16T12:31:30+5:30
सेप्सिस (Sepsis) ला सेप्टिसीमिया (Septicemia) म्हणूनही ओळखलं जातं. हा अत्यंत घातक आजार असून यामुळे अनेक गंभीर परिणामांचा सामना करावा लागू शकतो.
सेप्सिस (Sepsis) ला सेप्टिसीमिया (Septicemia) म्हणूनही ओळखलं जातं. हा रक्ताचा आजार असून ज्यामध्ये रक्तामध्ये इन्फेक्शन होतं. जेव्हा शरीरामध्ये म्हणजेच, फुफ्फुसं किंवा त्वचेमधून बॅक्टेरिअल इन्फेक्शन रक्तामध्ये प्रवेश करतं त्यावेळी सेप्टिसीमिया होतो. हा आजार अत्यंत घातक असतो कारण हे बॅक्टेरिया संपूर्ण शरीरामध्ये पसरतात.
वेबएमडीने दिलेल्या वृत्तानुसार, या बॅक्टेरियाने शरीरात प्रेवश केल्यानंतर रक्ताच्या गाठी तयार होऊ लागतात आणि शरीरातील रक्तप्रवाह कमी होतो. यामुळे शरीराला पोषक तत्व आणि ऑक्सिजन मिळू शकत नाही. अनेकदा हा आजार झाल्याने शरीराचे अवयव निष्क्रीय होऊ शकतात. वेळेवर उपचार न केल्याने रूग्णाचा मृत्यू होण्याचीही शक्यता अधिक असते.
सेप्टीसीमिया होण्याची कारणं
सेप्टीसीमिया तुमच्या शरीरातील एखाद्या अवयवामध्ये संक्रमण झाल्यामुळे होतं. हे संक्रमण साधारणतः गंभीर असतं. अनेक प्रकारच्या बॅक्टेरियामुळे सेप्टिसीमिया आजार बळावतो. हा संसर्ग वेगवेगळ्या कारणांमुळे होऊ शकतो. पण काही प्रकरणांमध्ये प्रायव्हेट पार्टमार्फत झालेलं संक्रमण, न्यूमोनिया यांमुळे फुफ्फुसांमध्ये झालेला संसर्ग तसेच पोटामध्ये संसर्ग झाल्यामुळेही सेप्टीसीमिया होऊ शकतो.
सेप्टीसीमियाची लक्षणं
साधारणतः याची लक्षणं फार लवकर सुरू होतात. आजाराची लागण झाल्यानंतरच्या पहिल्या स्टेजमध्येच व्यक्ती फार आजारी दिसू शकते. या आजाराच्या सुरुवातीच्या लक्षणांमध्ये थंडी वाजणं, ताप येणं, जोरात श्वास घएणं, हृदयाचे ठोके वाढणं, विचार करण्यात अडथळा येणं, उलट्या, त्वचेवरील लाल चट्टे, लघवी न होणं, रक्तप्रवाह कमी होणं इत्यादी लक्षणं दिसून येतात.
प्रोढ लोकांमध्ये दिसून येणारी लक्षणं :
प्रौढ लोकांमध्ये दिसणारी या आजाराची लक्षणं काहीशी वेगळी दिसून येतात. बोलण्यास अडचण होणं, स्नायूंमध्ये होणाऱ्या वेदना, प्रमाणापेक्षा जास्त थंडी वाजणं, लघवी न होणं, श्वास घेण्यास त्रास होणं, त्वचेचा रंग बदलणं यांसारख्या समस्यांचा समावेश होतो.
मुलांमध्ये दिसणारी या आजाराची लक्षणं :
हलकासा ताप येणं, जोरात श्वास घेणं, शरीर पिवळं पडणं, शरीरावर डाग दिसणं, सतत स्तुस्ती येणं आणि जोप पूर्ण न होणं यांसारखी लक्षणं दिसून येतात. पाच वर्षांपेक्षा कमी वयाची मुलं या आजाराला बळी पडू शकतात. जर तो मुलगा जेवण जेवत नसेल, सतत उलट्या करत असेल आणि लघवी केली नसेल तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.
सेप्टीसीमियापासून बचाव करण्यासाठी उपाय...
बॅक्टेरियल इन्फेक्शन सेप्टीसीमिया होण्याचं सर्वात मोठं कारण आहे. वरील लक्षणं आढलून आली तर त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा. सुरूवातीला काही अॅन्टीबायोटिक औषधं देऊन या आजारावर उपाय केला जातो. तसेच बॅक्टेरिया रक्तामध्ये जाण्यापासून रोखण्यात येतो.
याव्यतिरिक्त, तुम्ही धुम्रपान करणं टाळाव, संतुलित आहार घ्या, दररोज व्यायाम करा, तसेच हात नियमितपणे स्वच्छ ठेवा. तसेच लहान मुलांना या आजारापासून दूर ठेवण्यासाठी लसीकरण करणं आवश्यक असतं.
(टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. वर सांगण्यात आलेली लक्षणं इतर समस्या किंवा आजारांमध्येही दिसू शकतात. अनेकदा ही लक्षणं दिसणं साधारण बाबही असू शकते. त्यामुळे लक्षणांमध्ये सातत्याने वाढ होत असेल तर कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.)