ब्रेन ट्युमरची सुरुवातीची लक्षणे, दिसताच डॉक्टरांना दाखवले पाहिजे

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2024 01:37 PM2024-06-08T13:37:43+5:302024-06-08T14:42:20+5:30

ब्रेन ट्युमरची सुरुवातीची लक्षणे कोणती आणि ती कशी ओळखावीत याची मार्गदर्शक माहिती पुढे दिली आहे.

Early symptoms of brain tumor, for go to the doctor immediately | ब्रेन ट्युमरची सुरुवातीची लक्षणे, दिसताच डॉक्टरांना दाखवले पाहिजे

ब्रेन ट्युमरची सुरुवातीची लक्षणे, दिसताच डॉक्टरांना दाखवले पाहिजे

डॉ अभय कुमार, हेड, न्यूरोसर्जरी आणि कन्सल्टन्ट, मिनिमली इन्व्हेसिव्ह स्पाईन सर्जरी, कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल, मुंबई 

ब्रेन ट्युमर हा जरी दुर्मिळ आजार असला तरी त्याचे परिणाम गंभीर आणि जीवनात प्रचंड उलथापालथ घडवून आणणारे असतात. वेळीच निदान आणि उपचार व्हावेत यासाठी आजाराची लक्षणे ओळखू येणे गरजेचे असते. ब्रेन ट्युमरची सुरुवातीची लक्षणे कोणती आणि ती कशी ओळखावीत याची मार्गदर्शक माहिती पुढे दिली आहे. यापैकी कोणतीही लक्षणे दिसून येत असल्यास तातडीने डॉक्टरांना दाखवणे आवश्यक आहे. 

डोकेदुखी - ब्रेन ट्युमरच्या सर्रास आढळून येणाऱ्या सुरुवातीच्या लक्षणांपैकी एक म्हणजे सततची किंवा खूप गंभीर डोकेदुखी. सकाळी किंवा झोपलेल्या अवस्थेत असताना डोके प्रचंड दुखते आणि डोकेदुखीवरील नेहमीचे उपाय करूनही थांबत नाही. डोके सतत दुखत असेल आणि त्याची तीव्रता किंवा प्रकार नेहमीपेक्षा वेगळा असेल तर तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.

फिट किंवा झटका येणे - अपस्मार किंवा फेफरे येण्याचा त्रास नसताना देखील अचानक फिट किंवा झटका येणे हे ब्रेन ट्युमरचे लक्षण असू शकते. फिट सौम्य ते गंभीर स्वरूपाची असू शकते, शरीराला जोरात हिसके बसणे, शुद्ध हरपणे किंवा आचके देणे असे प्रकार घडू शकतात.

आकलन क्षमता किंवा व्यक्तिमत्त्वामध्ये बदल - ब्रेन ट्युमरमुळे आकलनात्मक कामे आणि वागणुकीत बदल होऊ शकतात. स्मरणशक्ती कमी होणे, मन एकाग्र करू न शकणे, गोंधळ उडणे किंवा व्यक्तिमत्त्वामध्ये किंवा वागणुकीत लक्षणीय बदल होणे. सुरुवातीला हे बदल सौम्य असतात पण हळूहळू त्यांची तीव्रता वाढत जाते.

कोणतेही विशेष कारण नसताना मळमळणे, उलट्या होणे - हे प्रकार सकाळी सर्वात जास्त प्रमाणात होतात. हे ब्रेन ट्युमरचे सुरुवातीचे लक्षण असू शकते. कवटीच्या आत ताण वाढल्यामुळे ही लक्षणे दिसून येतात.

दृष्टिदोष, अस्पष्ट दिसणे, एकच गोष्ट दोन-दोन दिसणे किंवा परिधीय दृष्टी गमावणे ही ब्रेन ट्युमरची सुरुवातीची लक्षणे असू शकतात. या समस्या अचानक किंवा हळूहळू निर्माण होऊ शकतात.

नीट बोलता न येणे, योग्य शब्द न सुचणे किंवा अस्पष्ट बोलणे ही ब्रेन ट्युमरची सुरुवातीची लक्षणे असू शकतात. जर यापैकी कोणतीही समस्या अचानक उद्भवलेली असेल किंवा हळूहळू अधिकाधिक गंभीर होत जात असेल तर ते ब्रेन ट्युमरचे लक्षण असू शकते.

संतुलन आणि समन्वय नीट करता न येणे - नीट चालता न येणे, वेंधळेपणा, संतुलन आणि समन्वयामध्ये समजून येईल इतका गोंधळ होणे ही ब्रेन ट्युमरची लक्षणे असू शकतात. मेंदूचा जो भाग मोटर फंक्शन्सवर नियंत्रण ठेवतो त्यावर जर ट्युमरमुळे परिणाम झाला असेल तर ही लक्षणे दिसून येतात.

एक हात किंवा एका पायामध्ये कमजोरी येणे किंवा संवेदना कमी होणे, बऱ्याचदा ही समस्या शरीराच्या एका बाजूला उद्भवते. हे ब्रेन ट्युमरचे एक लक्षण असू शकते. सुरुवातीला हे लक्षण सौम्य असते पण हळूहळू त्याची तीव्रता वाढत जाते.
कमी ऐकू येणे किंवा अजिबात ऐकू न येणे किंवा कान वाजणे हे ब्रेन ट्युमरचे सुरुवातीचे लक्षण असू शकते. जर हे त्रास एकाच कानात होत असतील किंवा अचानक उद्भवलेले असतील तर ते ब्रेन ट्युमरचे लक्षण असण्याची शक्यता जास्त असते.

डॉक्टरकडे कधी जावे?

ही लक्षणे इतर काही कारणांमुळे देखील होऊ शकतात, तरीही त्यांना गंभीर मानले गेले पाहिजे. जर तुम्ही किंवा तुमच्या एखाद्या जवळच्या व्यक्तीला हे त्रास होत असतील, आणि महत्त्वाचे म्हणजे ती पहिल्यांदाच दिसत असतील किंवा अधिकाधिक तीव्र होत असतील तर तातडीने फुलटाइम स्पेशालिस्ट सिस्टीम असणाऱ्या रुग्णालयात वैद्यकीय सल्ला घ्या. आजार लवकरात लवकर लक्षात येणे आणि त्यावर उपचार करून घेतल्याने रुग्णाला मिळणाऱ्या परिणामांमध्ये सुधारणा होऊ शकते.

ध्यानात ठेवा, ही माहिती म्हणजे धोक्याची सूचना नाही तर जागरूकता वाढवण्यासाठीचा प्रयत्न आहे. आजार लवकरात लवकर लक्षात येणे आणि त्यावर तातडीने उपचार केले जाणे मेंदूच्या आरोग्यासाठी गरजेचे आहे.

सारांश 

ब्रेन ट्युमरच्या सुरुवातीच्या लक्षणांबद्दल माहिती असेल तर तुम्ही तुमच्या आरोग्याची अधिक जागरूकतेने काळजी घेऊ शकाल. वर नमूद केलेल्यापैकी काही लक्षणे दिसून येत असल्यास डॉक्टरकडे जायला उशीर लावू नका.
 

Web Title: Early symptoms of brain tumor, for go to the doctor immediately

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.