चालणं सर्वात सोपा व्यायाम; फायदे वाचून व्हाल अवाक्
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2021 06:47 PM2021-05-23T18:47:58+5:302021-05-23T18:48:53+5:30
दररोज चालण्याने शरीराला बरेच फायदे मिळतात. तसेच त्यामुळे आपले आरोग्य चांगले राहते.
कोरोना काळात रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी जितकी शरीराची काळजी, सोशल डिस्टन्सिंग, मास्क वापरणं गरजेचं आहे त्याबरोबरच योग्य व्यायामही महत्त्वाचा आहे. मात्र सध्या लॉकडाऊनमुळे मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडू शकत नसल्याने घरातही चालण्याचा व्यायाम करता येऊ शकतो. तुम्ही दररोज 20 मिनिटांपासून एका तासापर्यंत चालू शकता. दररोज चालण्याने शरीराला बरेच फायदे मिळतात. तसेच त्यामुळे आपले आरोग्य चांगले राहते. बर्याच आजारांपासून आपलं संरक्षणही होतं. तुम्ही आपल्या फ्लॅटच्या गॅलरीत किंवा एखाद्या रुममध्ये देखील वॉक (Walk) घेऊ शकता. दिवसातून तुम्ही किमान २० मिनटं ते १ तास चालणं आवश्यक आहे. त्यासाठी घड्याळात वेळ पाहून चालालयला सुरुवात करा.
चालण्याचे काय फायदे आहेत जाणून घेऊया.
हृदयविकार दूर राहतात
जर आपण दररोज वीस मिनिटे चालत असाल तर, यामुळे कोणत्याही प्रकारचे हृदयाशी संबंधित आजर होण्याचा धोका १९ टक्क्यांनी कमी होतो. दररोज बराच वेळ आणि स्पीडने चालण्याने आजार दूर पळतात.
रक्तातील शर्करा नियंत्रणात राहते
दररोज जेवणानंतर चालणे हा उत्तम व्यायाम आहे. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात येते. दररोज जेवल्यानंतर १५ मिनिटं चालण्याने रक्तातील साखर नियंत्रणात येऊ शकते.
सांधेदुखी
सांधेदुखीवर तर चालणं उत्तम व्यायाम आहे. त्यामुळे स्नायू बळकट होतात. ज्यांना आर्थराइटिस आहे त्यांनी तर, दररोज वॉक केलंच पाहिजे.
रोगप्रतिकारशक्ती वाढवते
वातावरणातील बदलामुळे लगेच खोकला आणि सर्दी होण्याचा त्रास असेल तर, रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी रोज चालावे.
मेंदूसाठी उत्तम
आठवड्यातून किमान २ तास चालण्यामुळे ब्रेन स्ट्रोकचा धोका ३० टक्क्यांनी कमी होतो.
वजन नियंत्रित ठेवण्यास मदत
दररोज ३० मिनिटं चालल्यास लठ्ठपणाची समस्या ५० टक्क्यांनी कमी होते. चालण्यामुळे स्नायु मजबूत होतात आणि कामं करण्याचा उत्साह वाढतो.
मूड चांगला राहतो
दररोज किमान ३० मिनिटं चालण्याने मूड चांगला राहतो. यामुळे आपल्यामध्ये तणाव, भीती, नैराश्य आणि नकारात्मक विचार देखील कमी होतात आणि ऊर्जा देखील वाढते. मानसिक आरोग्यही चांगलं राहतं