डेंग्यूपासून बचाव करण्यासाठी 'हे' घरगुती उपाय ठरतील फायदेशीर!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2018 04:34 PM2018-10-09T16:34:19+5:302018-10-09T16:35:45+5:30
संपूर्ण भारतामध्ये डेंग्यूने धुमाकूळ घातला आहे. आतापर्यंत देशाची राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये ऑक्टोबर महिन्यात फक्त 6 दिवसांत आतापर्यंत 169 नवीन रूग्णांना डेंग्यूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
संपूर्ण भारतामध्ये डेंग्यूने धुमाकूळ घातला आहे. आतापर्यंत देशाची राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये ऑक्टोबर महिन्यात फक्त 6 दिवसांत आतापर्यंत 169 नवीन रूग्णांना डेंग्यूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. डॉक्टरांचं म्हणणं आहे की, रूग्णांच्या संख्येत तासागणिक वाढ होत असून यामध्ये आणखी वाढ होणार असल्याचे दिसून येत आहे. सुरुवातीला सामान्य वाटणारा हा आजार दुर्लक्ष केल्यामुळे किंवा चुकीचे उपचार घेतल्यामुळे जीवघेणा ठरू शकतो. डेंग्यू पावसाळ्यामध्ये आणि त्यानंतरच्या महिन्यामध्ये म्हणजेच जुलै आणि ऑक्टोबरदरम्यान सर्वात जास्त पसरतो. कारण डेंग्यू हा डासांमुळे होणारा रोग असून या वातावरणात डासांची पैदास मोठ्या प्रमाणावर होते. यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही स्वतःचं डासांपासून रक्षण करणं गरजेचं असतं. जर कोणालाही डेंग्यू झाला तर घाबरून जाऊ नका, योग्य ते उपचार आणि काही घरगुती उपचारांनी तुम्ही पूर्ण बरे होऊ शकता.
एडीज इजिप्टी डासाच्या चावल्याने जवळपास 3 ते 5 दिवसांनंतर रूग्णांमध्ये डेंग्यूची लक्षणं दिसू लागतात. साधारणतः डेंग्यूची लक्षणं थंडी वाजल्यानंतर अचानक ताप येणं, डोकं, शरीराचे स्नायू आणि सांधेदुखीचा त्रास होणं, डोळे दुखणं, अशक्तपणा येणं, भूक न लागणं आणि तोंडाला चव नसणं यांसारखी असतात.
पपईच्या पानांचा रस डेंग्यूच्या तापाचा कालावधी कमी करतो. यामुळे शरीरातील पांढऱ्या पेशी आणि प्लेटलेट्सची संख्या वाढवतं. डेंग्यूचा ताप कन्फर्म होण्याआधीपासूनच पपईच्या पानांचा पस रूग्णाला देणं फायदेशीर ठरतं. कारण याचा कोणताही साइड-इफेक्ट नाही.
डेंग्युवर बकरीचं दूधही परिणामकारक ठरतं. आयुर्वेदाच्या अनेक पुस्तकांमध्ये सांगितलेलं आहे की, बकरीचं दूध डेंग्यूचा ताप नाहीसं करण्यात फायदेशीर ठरतं.
जेवणामध्ये हळदीचा वापर करणं फायदेशीर ठरतं. सकाळी अर्धा चमचा हळद पाण्यासोबत आणि रात्री हळदीचं एक ग्लास दूध प्यायल्याने फायदा होतो. हळदीमध्ये अॅन्टी-ऑक्सिंडंट मुबलक प्रमाणात असतात, जे शरीरातील मेटाबॉलिझम वाढवतात.
8 ते 10 तुळशीच्या पानांचा रस मधासोबत मिक्स करून घ्या किंवा तुळशीचा 10 पानं एक ग्लासभर पाण्यामध्ये उकळून घ्या. त्यानंतर त्यामध्ये 2 काळी मिरी पावडर आणि आलं टाकून पुन्हा उकळून घ्या. हा तयार झालेला काढा सकाळी आणि संध्याकाळी घ्या. शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि आजार दूर होतो.