डोळ्यांचा थकवा आणि जळजळ दूर करण्यासाठी करा 'हे' उपाय!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2018 12:03 PM2018-07-16T12:03:58+5:302018-07-16T12:12:48+5:30
बदलली जीवनशैली आणि वाढलेला कामाचा ताण यामुळे बऱ्याचदा रात्री उशीरापर्यंत काम करणे भाग पडते. तसेच अभ्यासाचे प्रेशर असल्यामुळे अनेक विद्यार्थीही बराचवेळ पुस्तकांमध्ये डोकं घालून बसतात. यामुळे डोळ्यांच्या अनेक समस्या उद्भवतात.
बदलली जीवनशैली आणि वाढलेला कामाचा ताण यामुळे बऱ्याचदा रात्री उशीरापर्यंत काम करणे भाग पडते. तसेच अभ्यासाचे प्रेशर असल्यामुळे अनेक विद्यार्थीही बराचवेळ पुस्तकांमध्ये डोकं घालून बसतात. यामुळे डोळ्यांच्या अनेक समस्या उद्भवतात. डोळे लाल होणं, जळजळ होणं, डोळ्यांतून सतत पाणी येणं, धुरकट दिसणं यासारख्या समस्यांना सामोरं जावं लागतं. अशातच काही सोप्या आणि घरगुती उपयांमुळे डोळ्यांच्या या समस्या तुम्ही सहज दूर करू शकता.
जर तुमच्या डोळ्यांवर ताण येत असेल आणि त्याचबरोबर डोळ्यांवर सूजदेखील असेल तर डोळे थंड पाण्याने धुवावेत अथवा बर्फाने डोळ्यांवर शेक द्यावा. यासाठी एका स्वच्छ कॉटनच्या कपड्यामध्ये बर्फाचे काही तुकडे गुंडाळा आणि त्यांना तुमच्या डोळ्यांवर काही वेळासाठी ठेवा. असं १५ ते २० मिनिटं केल्यानं तुमच्या डोळ्यांवरील सूज निघून जाईल आणि डोळ्यांना जाणवत असलेला थकवाही दूर होण्यास मदत होईल.
गुलाब पाणी थकलेल्या डोळ्यांचा थकवा दूर करण्यासाठी उत्तम उपाय आहे. तसेच याच्या वापरामुळे डोळ्यांखालील काळी वर्तुळेही दूर होतात आणि त्वचा आकर्षक आणि मुलायम होते. गुलाब पाण्याच्या दररोजच्या वापरामुळे डोळ्यांमधील ओलावा टिकून राहतो.
काकडीचे तुकडे काही काळ डोळ्यांवर ठेवल्यानेही त्यांचा थकवा दूर होतो. काकडीमध्ये असलेल्या थंडाव्यामुळे डोळ्यांजवळील थकलेल्या पेशी शांत होतात. यासाठी एक मध्यम आकाराचा काकडीचा तुकडा २० ते ३० मिनिटं फ्रिजमध्ये ठेवा. त्यानंतर तो तुकडा कापून डोळ्यांच्या खाली ठेवा. काकडीसारखाच बटाट्याच्या फोडींचाही वापर करता येऊ शकतो.
डोळ्यांचा व्यायाम केल्याने ब्लड सर्क्युलेशन नीट होते. त्यामुळे डोळ्यांना थकवा जाणवत नाही आणि कामावर लक्ष केंद्रित करणे सोपे जाते. डोळ्यांचा व्यायाम करण्यासाठी एक पेन किंवा पेन्सिल घ्या आणि डोळ्यांपासून थोडं लांब पकडा. हळूहळू ते तुमच्या डोळ्यांजवळ घेऊन या. जोवर ते तुम्हाला दिसतंय, तोवर त्याच्यावर लक्ष केंद्रीत करा. त्यानंतर तसंच हळूहळू ते मागे घेऊन जा. असं 10 ते 15 वेळा करा. दुसऱ्या व्यायामाच्या प्रकारात तुमच्या डोळ्यांना क्लॉकवाईज आणि अॅन्टीक्लॉकवाईज फिरवावे आणि थोडा वेळ थांबून त्यानंतर पापण्या मिटाव्यात. असे दिवसातून 4 ते 5 वेळा करावे. त्याने डोळ्यांना आराम मिळतो.