परदेशी पदार्थ जपून खा! अन्न आणि औषध प्रशासनाच्या कारवाईत २९ कोटींचा साठा जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2022 06:46 AM2022-11-06T06:46:03+5:302022-11-06T06:46:12+5:30

सध्या आपल्याकडे परदेशी खाद्यपदार्थ खाण्याचे ‘फॅड’ आले असून, अनेकांसाठी ते प्रतिष्ठेचे झाले आहे.

Eat foreign food carefully 29 crore stock seized in Food and Drug Administration action | परदेशी पदार्थ जपून खा! अन्न आणि औषध प्रशासनाच्या कारवाईत २९ कोटींचा साठा जप्त

परदेशी पदार्थ जपून खा! अन्न आणि औषध प्रशासनाच्या कारवाईत २९ कोटींचा साठा जप्त

googlenewsNext

मुंबई :

सध्या आपल्याकडे परदेशी खाद्यपदार्थ खाण्याचे ‘फॅड’ आले असून, अनेकांसाठी ते प्रतिष्ठेचे झाले आहे. मात्र, हे परदेशी खाद्यपदार्थ ज्या ठिकाणी साठवून ठेवले जातात त्या ठिकाणची अवस्था, ते ठेवण्याची पद्धत आणि घाणीचे साम्राज्य पाहून कोणालाही शिसारी येईल. अशाच पद्धतीने साठा केलेल्या परदेशी खाद्यपदार्थांचा साठा अन्न आणि औषध प्रशासन विभागाने नुकताच नवी मुंबईतील तुर्भे येथून जप्त केला. तब्बल २९ कोटी रुपये मूल्याचा हा साठा आहे. 
गेल्या काही महिन्यांपासून खाद्यपदार्थांची मोठ्या प्रमाणात आयात केली जात आहे. हे खाद्यपदार्थ सुरक्षित आहेत की नाही, याची अन्न व औषध प्रशासन विभागातर्फे पाहणी करण्यात येत असते. 

विशेषत: ही पाहणी करताना केंद्रीय आरोग्य विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या एफएसएसएआय (भारतीय अन्न सुरक्षितता आणि प्रमाण) या संस्थेने जी मानांकने आणि नियम आखून दिले आहेत, त्याची अंमलबजावणी झाली आहे किंवा कसे, याची तपासणी केली जाते. 

भारतात तयार होणाऱ्या सर्व पॅकबंद खाद्यपदार्थावर ते एफएसएसएआय या संस्थेकडून प्रमाणित केले आहे, हे वेष्टनावर छापणे बंधनकारक आहे. ते पाहण्यासाठी अन्न व औषध प्रशासन अधिकाऱ्यांनी नवी मुंबई विविध ठिकाणी येथील धाडी टाकल्या, त्यामध्ये धक्कादायक गोष्टी आढळून आल्या.

धाडीत काय बघायला मिळाले?
1. प्रशासनाने ज्या गोडाऊनवर छापे टाकले तिथे वेगवेगळया देशातून आलेल्या अन्नपदार्थांचा साठा केला जातो. त्या ठिकाणी प्रशासनाने एफएसएसएआयच्या सर्व नियमांची पायमल्ली केल्याचे दिसून आले आहे. हा सर्व माल ज्या ठिकाणी ठेवला  गेला आहे, त्या शीतगृहात विविध देशांमधून आलेले मसाले, ड्रायफ्रूटस आणि शीतपेये साठवून ठेवले होते.
2, पदार्थाच्या गोण्या ज्या लाकडी फळीवर ठेवण्यात आल्या होत्या त्या कीटकयुक्त झाल्याचे आढळून आले. कामगाराच्या स्वच्छतागृहाच्या बाजूलाच या पदार्थाची साठवणूक करून ठेवण्यात आली होती.
3. या शीतगृहात झुरळ आणि उंदीर यांचा प्रादुर्भाव आढळून आला. अन्नपदार्थांचे बॉक्स उंदराने कुरतडून खाल्ल्याचे आढळून आले आहे. झुरळ आणि उंदीर या खाद्यपदार्थाच्या गोण्यांवरून फिरत होते. वरील पदार्थांपैकी बदामाला तर अक्षरश: कीड लागली होती. 

या नियमांचे उल्लंघन
 जप्त केलेल्या अन्नपदार्थाच्या वेस्टनावर आयतदाराचे पूर्ण नाव व पत्ता नमूद केलेला नाही.
    मूळ निर्यातदार देशाचे नाव वेस्टनावर  नमूद केलेले नाही.
    वेस्टनावर कधीपर्यंत हे पदार्थ खाऊ शकतो, याचा कालावधी, कालबाह्यता तारीख नमूद नाही.

साठवणूक केलेल्या काही पदार्थांचा साठा निकृष्ट असल्याने आणि कायद्यातील तरतुदीचा भंग झाल्याने तो साठा जप्त केला करण्यात आला आहे. वरील सर्व अन्न पदार्थांचे नमुने अन्न विश्लेषक, अन्न चाचणी प्रयोगशाळा येथे विश्लेषणासाठी पाठविण्यात आले आहेत. तपासणी अहवाल संबंधित सहायक आयुक्त (अन्न), ठाणे यांना पुढील योग्य त्या कायदेशीर कारवाईसाठी पाठविण्यात येणार आहे. 
    - शशिकांत केकरे, सहआयुक्त,
    अन्न व औषध प्रशासन बृहन्मुंबई

Web Title: Eat foreign food carefully 29 crore stock seized in Food and Drug Administration action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.