Summer Health tips: आंबे खा पण सालीसकट, आहेत इतके फायदे की साल काढायचंच विसरुन जाल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2022 04:55 PM2022-03-29T16:55:14+5:302022-03-29T17:00:44+5:30
आंब्याची सालदेखील (mango peel) शरीरासाठी खूप लाभदायक असते. त्यामुळे तुम्ही आंब्याची साल फेकून देत असाल तर त्यापूर्वी ही बातमी वाचाच.
उन्हाळा (summer) सुरू झाला आणि मार्केटमध्ये फळांचा राजा अर्थात आंबा दिसू लागला आहे. उन्हाळा ऋतू न आवडणारेही उन्हाळ्यात आंबा बाजारात यायची वाट बघत असतात. उन्हाळ्यात आंब्याचा रस आणि कैरीचं पन्हं म्हणजे खवय्यांसाठी मेजवानी असते. आंबा फक्त चवीनेच नव्हे, तर शरीरासाठीदेखील चांगला असतो. तसंच केवळ पिकलेला आंबा आणि कच्ची कैरीच नाही तर आंब्याची सालदेखील (mango peel) शरीरासाठी खूप लाभदायक असते. त्यामुळे तुम्ही आंब्याची साल फेकून देत असाल तर त्यापूर्वी ही बातमी वाचाच.
एका अहवालानुसार, आंब्याच्या सालीमध्ये अँटीऑक्सिडंट (Anti-oxidant) गुणधर्म आढळतात. ते आपल्याला कॅन्सरपासून वाचवू शकतात. फुफ्फुसांचा कॅन्सर (lung cancer), आतड्यांचा कॅन्सर, मेंदूचा कॅन्सर (brain cancer) आणि स्तनांचा कॅन्सर (breast cancer) यांपासून बचाव करण्यासाठी आंब्याची साल उपयुक्त ठरू शकते. आंब्याच्या सालीमध्ये भरपूर प्रमाणात फायटोन्यूट्रिएंट्स (phytonutrients) असतात. या संदर्भात माहिती देणारं वृत्त 'झी न्यूज हिंदी'ने प्रसिद्ध केलं आहे.
याशिवाय वजन कमी करण्यासाठीही सालीसह आंबा खाल्ल्याचा फायदा होतो. त्यामुळे ज्या व्यक्ती वजन कमी करत आहेत किंवा ज्यांना वजन कमी करायचं आहे, त्यांनी आंब्याची साल अजिबात फेकू नये. आंबे सालीसह खावेत.
वजन कमी करण्यासह चेहऱ्यासाठीदेखील आंब्याची साल खूप फायदेशीर आहे. आंब्याच्या सालीपासून फेस पॅक (mango peel face pack) तयार करता येतो. सालीपासून लेप तयार करण्यासाठी आंब्याची साल काही दिवस उन्हात वाळवावी. ती चांगली सुकली की ती बारीक वाटून घ्यावी. नंतर या पावडरमधे दही किंवा गुलाब पाणी घालून हा लेप रोज चेहर्यावर लावावा. या स्पेशल मँगो फेसपॅकमुळे त्वचेवरचे डाग जातात. चेहऱ्यावरचे काळे डाग आणि पिंपल्सपासून सुटका होते.
आंब्याच्या सालीचा उपयोग उन्हामुळे निर्माण होणारी टॅनिंगची (tanning) समस्या दूर करण्यासाठीही होतो. चेहर्यावर जिथे जास्त टॅनिंग आहे तिथे आंब्याच्या सालीच्या साह्याने हलक्या हातानं मसाज करावा. मसाज करून झाल्यावर काही वेळ चेहरा तसाच ठेवावा. नंतर पाण्यानं चेहरा स्वच्छ धुवावा. यामुळे चेहर्यावरचं टॅनिंग निघून जातं आणि चेहरा चमकदार होतो.
तुम्हाला आंबे खायला आवडत असतील, तर आंब्याच्या सालीचे हे फायदे विसरू नका. कारण आंब्याच्या सालीपासून हे घरगुती उपाय करता येतात. त्यांचा वजन कमी करण्यासह चेहरा चमकदार आणि तजेलदार बनवण्यासाठीही उपयोग होतो. उन्हात गेल्यामुळे चेहरा किंवा हातपाय टॅन झाले असतील तर आंब्याच्या सालीच्या मदतीने तुम्ही ते टॅनिंग घालवू शकता.
त्यामुळे आंबे भरपूर खा, पण सालीसकट खा. अर्थातच आंबे खाण्यापूर्वी ते नीट स्वच्छ करणं, धुऊन घेणं अत्यावश्यक आहे, हे वेगळं सांगायला नकोच.