उन्हाळ्यात लसूण खायचा की नाही? उष्माघाताची भीती, नेमके खायचे काय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2023 12:57 PM2023-04-08T12:57:43+5:302023-04-08T12:59:09+5:30
लसूण खावा की नको, किंवा किती प्रमाणात खावा हे प्रत्येकाच्या प्रकृतीवर अवलंबून असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: उन्हाचा पारा दिवसेंदिवस चढत आहे. कडक उन्हामुळे जीव अगदी नकोसा होतो. उष्माघाताचा फटकाही बसण्याची शक्यता असते. अशा वेळी भरपूर पाणी प्या, फळे खा, फळांचे सरबत घ्या, बाहेर पडताना महिलांनी स्कार्फ गुंडाळा, तर पुरुषांनी टोपीचा वापर करा, अशा सूचना करण्यात येतात. तसेच उष्ण पदार्थ शक्यतो टाळण्याचाच सल्ला देण्यात येतो. कुठलाही ऋतू असला तरी मसालेदार पदार्थ खाण्यासाठी जीभ तयारच असते. या मसाल्यासाठी लसूणही तितकाच गरजेचा असतो. परंतु लसूण उष्ण असल्यामुळे उन्हाळ्यात तो खायचा की नाही? असा प्रश्न अनेकांना सतावतो. मात्र, लसूण खावा की नको, किंवा किती प्रमाणात खावा हे प्रत्येकाच्या प्रकृतीवर अवलंबून असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
लसणाचे फायदे
लसूण कृमी किंवा जंतांचा नायनाट करतो. त्यामुळे लहानग्यांसाखी लसूण गुणकारी मानला जातो.
हृदयरोग, पचनक्रिया सुधारण्यासाठी, खोकला आणि दमा रुग्णांनाही लसूण गुणकारी ठरतो.
पाऱ्यात विषाचे प्रमाण असते. मात्र, काही पदार्थांमध्ये पाऱ्याचा वापर केला जातो. या पाऱ्याच्या शुद्धीकरण प्रक्रियेत लसणाचा वापर करण्यात येतो.
एपीएमसी मार्केटमध्ये रोज ६० ते ९० टन आवक
- मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत रोज ६० ते ९० टन लसणाची आवक होत असल्याचे तेथील व्यापाऱ्यांनी सांगितले.
- लसणाला मोठी मागणी असून, मोठ्या प्रमाणावर लसूण खरेदी होत असल्याचेही त्यांनी सांगितले.
- दरम्यान, सध्या किरकोळ बाजारात लसूण ८० ते १२० रूपये प्रतिकिलोने विकला जात असल्याचेही व्यापाऱ्यांनी सांगितले.
असा खा लसूण!
- लसूण तुपात भाजून खाल्ल्यास प्रकृतीसाठी चांगलाच असल्याचे आयुर्वेदातील तज्ज्ञ डॉक्टरांनी सांगितले.
- आम्ल रस सोडून सर्व रस लसणात असतात.
- मधुर, लवण, कटू, तिखट आणि कशाय यांचा त्यात समावेश होतो.
- दरम्यान, विर्याचे प्रमाण वाढविण्यासाठीही लसूण गुणकारी ठरतो, असेही आयुर्वेदातील तज्ज्ञ डॉक्टरांनी सांगितले.
पित्ताचा त्रास आहे त्यांनी लसणाचे योग्य प्रमाणात सेवन करावे. उष्ण पदार्थांचे सेवन केल्यास पित्तदोष वाढू शकतो. मात्र, पचनक्रिया सुधारण्यासाठी लसूण फायदेशीर ठरतो. लसूण किती खावा हे प्रत्येकाच्या प्रकृतीवर अवलंबून आहे. - डॉ. आशुतोष गुप्ता, समन्वयक, नॅशनल कमिशन ऑफ सिस्टम ऑफ मेडिसिन, नीती आणि नोंदणी मंडळ