रात्रीचा भात, वजन आणि झोप यांचा संबंध काय? जाणून घ्या डॉक्टरांचा मोलाचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2021 05:24 AM2021-06-04T05:24:52+5:302021-06-04T05:25:10+5:30

व्यायामाच्या पाऊण तास अगोदर किंवा व्यायाम झाल्यावर अर्ध्या तासाच्या आत दोन चमचे घेतले तर स्नायूंना सगळ्यात जास्त फायदा मिळतो.

eating rice at night and its impact on weight and sleep | रात्रीचा भात, वजन आणि झोप यांचा संबंध काय? जाणून घ्या डॉक्टरांचा मोलाचा सल्ला

रात्रीचा भात, वजन आणि झोप यांचा संबंध काय? जाणून घ्या डॉक्टरांचा मोलाचा सल्ला

googlenewsNext

वाढत्या वयात येणारे झोपेचे प्रश्न सोडवायचे असतील, तर स्नायूवर्धन करणे हा राजमार्ग आहे, हे आपण गेल्या लेखात पाहिले. वरील गोष्टीला आता जीवशास्त्रामध्ये देखील आधार मिळाला आहे. पाठीचा कणा ताठ झाला की आत्मविश्वास वाढतो हे चाचण्यांमध्ये दिसते. 

आता हे स्नायूवर्धन करायचे कसे? - तर कुठल्याही वयात स्नायू वाढवता येतात, हा विश्वास बाळगा. स्नायू हे प्रथिनांचे बनलेले असतात. प्रथिनांचे मूळ घटक म्हणजे ॲमिनो ॲसिड. त्यातही विशिष्ट अमिनो ॲसिडस स्नायूवर्धनकरिता उत्तम ! भारतीय लोक प्रथिनांचे सेवन एकंदरीतच कमी करतात. हैदराबाद येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशनने केलेल्या अभ्यासानुसार सर्व सामान्य निरोगी प्रौढ व्यक्तींच्या आहारामध्ये त्या व्यक्तीच्या दर किलोग्रॅम वजनासाठी एक ग्रॅम प्रथिने  लागतात. तुम्ही सकाळपासून रात्रीपर्यंत सर्व आहार बघितला तर साधारणत : वीस ग्रॅम कमी पडतात असे लक्षात येईल. भारतीय लोक प्रामुख्याने शाकाहारी असतात, आणि जे मांसाहारी आहेत ते देखील आठवड्यातून सरासरी दोनदाच मांसाहार करतात. संपूर्ण शाकाहारी लोकांकरिता भिजवलेली कडधान्य ,मुगाचे लाडू, सोयाबीनचे पदार्थ यात प्रथिने मिळतात. ‘व्हे’ प्रोटीन पावडर बाजारात उपलब्ध आहेत.  

व्यायामाच्या पाऊण तास अगोदर किंवा व्यायाम झाल्यावर अर्ध्या तासाच्या आत दोन चमचे घेतले तर स्नायूंना सगळ्यात जास्त फायदा मिळतो. आहारामध्ये सकाळी आणि दुपारी प्रथिनांचे प्रमाण जास्त ठेवा आणि स्निग्ध  व पिष्टमय पदार्थ (जसे बटाटा , भात, ब्रेड) यांचे मिश्रण असलेले पदार्थ (बटाटवडा ,श्रीखंड) हे अजिबात ठेवू नका म्हणजे दिवसा झोप कमी येईल. याउलट रात्री पिष्टमय पदार्थ (दही भात )जरूर घ्या. काही लोकांची अशी शंका असते की रात्री भात खाल्ल्याने वजन वाढते. खरे म्हणजे स्नायूची कमी असल्यास आपले यकृत (लिव्हर) रात्रीच्या वेळी मेदाच्या (फॅट सेल्स) बाजूने झुकते आणि जादा कॅलरीज मेद वाढवण्याकरिता वापरल्या जातात. कमी खाण्यापेक्षा योग्य तितके खाणे पण स्नायू संवर्धन हा खरेतर यावरचा उपाय आहे. रात्री, झोपण्याच्या ५ ते ६ तास अगोदर जर वजने उचलण्याचा व्यायाम केला तर प्रतिक्षिप्त क्रियेने (रिप्लेएक्स) तुमची डेल्टा झोप वाढते. 

- डॉ. अभिजित देशपांडे, 
इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्लीप सायन्सेस 
iissreports@gmail.com

Web Title: eating rice at night and its impact on weight and sleep

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.