सावधान! पावसाळ्यात समोसा, वडापाव खाणं पडू शकतं महागात; 'या' आजारांचा सर्वाधिक धोका
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2024 11:53 AM2024-06-17T11:53:21+5:302024-06-17T11:54:04+5:30
पावसाळा सुरू झाला की अनेक आजार डोकं वर काढतात. अशात रस्त्यावरील समोसा, वडापाव खाणं अनेकांना महागात पडू शकतं.
पावसाळा सुरू झाला की अनेक आजार डोकं वर काढतात. अशात रस्त्यावरील समोसा, वडापाव खाणं अनेकांना महागात पडू शकतं. दूषित पाणी आणि अन्न पदार्थांपासून तयार केलेलं पदार्थ रस्त्यावर विकले जातात. पावसाळ्यात शक्य तेवढे असे पदार्थ खाणे टाळणे हेच हिताचे असते.
'या' आजारांचा धोका
कावीळ : अनेकदा रस्त्यावर विकले जाणारे पदार्थ बनविण्यासाठी टँकर किंवा बोअरचे पाणी भाड्याने घेतले जाते. तसेच ग्राहकांना पिण्यासाठी सुद्धा हेच पाणी दिले जाते. हे पाणी रस्त्यावरच पिंपात जमा केले जाते. तेथील अस्वच्छतेमुळे कावीळ होते.
गॅस्ट्रो : पावसाळ्यात रस्त्यावरचा समोसा, वडापाव गॅस्ट्रोसारख्या साथीच्या आजारांना वाढवत असतो. कमी दर्जाचे तेलकट आणि तिखट खाल्ल्याने गॅस्ट्रो होऊ शकतो.
सर्दी, ताप : पावसात रस्त्यावरील उघडे अन्नपदार्थ खाल्ल्याने सर्दी आणि व्हायरल ताप होऊ शकतो. त्यामुळे शक्य तेवढे बाहेरचे उघडे अन्न पदार्थ खाऊ नयेत.
उघड्यावरील अन्नपदार्थांचे धोके
उघड्यावरील अन्नपदार्थ खाल्ल्यास अनेक धोके असतात. कावीळ, पोटदुखी होतेच; मात्र अनेकदा गंभीर आजाराने तब्येत बिघडते.
बाहेरचे खाणे टाळा
पावसाळा सुरू होताच रस्त्यावरील अन्नपदार्थ खाऊ नये यासाठी, राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून जनजागृती केली जाते.
...तर हॉटेलचालकांवर कारवाई
महापालिका आणि अन्न प्रशासन विभागाने जारी केलेल्या सूचनांची आणि नियमांची हॉटेलचालकांनी अंमलबजावणी केली नाही किंवा त्याकडे टाळाटाळ केली तर हॉटेलचालकांवर कारवाई होते.
शक्यतो लहान मुले, विद्यार्थी आणि वृद्धांना पावसाळ्यात बाहेरील अन्नपदार्थ खाण्यास देऊ नका. रस्त्यावरील तळलेले किंवा तिखट पदार्थ खाणे टाळावे. तसेच अशा ठिकाणी पाणी पिणेही टाळावे. घरचे अन्न आणि पाण्याची बाटली सोबत ठेवावी. स्वच्छ आणि शिजवलेले घरचे अन्न सेवन करावे.
- डॉ. विवेकानंद जाजू , वांद्रे, मुंबई