'या' आजार ज्याबाबत महिलांना पुसटशी कल्पनाही नसते!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2019 12:49 PM2019-03-06T12:49:48+5:302019-03-06T12:50:35+5:30
प्रत्येक महिन्याला महिलांना मासिक पाळी येणं हे एक नैसर्गिक चक्र आहे. अनेकदा मासिक पाळी दरम्यान प्रचंड वेदनांचा सामना करावा लागतो. महिलांना मासिक पाळीमध्ये स्वतःची व्यवस्थित काळजी घेणं आवश्यक असतं.
प्रत्येक महिन्याला महिलांना मासिक पाळी येणं हे एक नैसर्गिक चक्र आहे. अनेकदा मासिक पाळी दरम्यान प्रचंड वेदनांचा सामना करावा लागतो. महिलांना मासिक पाळीमध्ये स्वतःची व्यवस्थित काळजी घेणं आवश्यक असतं. अन्यथा शरीराला वेगवेगळ्या समस्यांसोबतच आजारांचाही सामना करावा लागू शकतो. असाच एक आजर म्हणजे, एंडोमीट्रियोसिस. अनेक महिला या आजाराने ग्रस्त असतात. पण अनेकदा त्यांना याबाबत पुसटशी कल्पनाही नसते.
एंडोमीट्रियोसिस असा आजार आहे, ज्यामध्ये गर्भाशयाच्या आसपासच्या पेशी आणि टिशू संपूर्ण शरीरामध्ये पसरू लागतात. अनेकदा तर या पेशी आणि टिश्यूमुळे गाठी तयार होतात.
भारतामध्ये या आजाराने पीडित महिलांची संख्या कोट्यावधीमध्ये आहे. हा आकडा त्या महिलांचा आहे, ज्यांना आपल्या आजाराबाबत सर्वकाही माहीत असून त्यावर त्या योग्य ते उपचार घेत आहेत. एंडोमिट्रियोसिस सोसायटी ऑफ इंडियाच्या आकड्यांनुसार, जवळपास 2.5 कोटी महिला या आजाराने ग्रस्त आहेत.
एंडोमिट्रियोसिस आजार
गर्भाशयाच्या आजूबाजूच्या पेशी जेव्हा अंडाशय, पॅलोपियन ट्यूब, यूरीनरी ब्लॅडर किंवा पोटाच्या इतर भागांमध्ये पसरतात तेव्हा त्याला एंडोमिट्रियोसिस असं म्हणतात. सामान्यतः एंडोमिट्रियोसिस या आजाराची लक्षणं ही तरूणींमध्ये जास्त दिसून येतात.
हेल्थ एक्सपर्टच्या सांगण्यानुसार, मोनोपॉजनंतर एंडोमिट्रियोसिसचा धोका कमी होत जातो. हा आजार मासिक पाळीशी निगडीत असून याची मोनोपॉजनंतर शक्यता कमी होते.
एंडोमिट्रियोसिसची लक्षणं
- मासिक पाळीमध्ये अनियमितता
- मासिक पाळीमध्ये वेदना आणि अति रक्तस्त्राव
- मासिक पाळी येण्याआधी ब्रेस्टला सूज येणं आणि थोड्या वेदनांचा सामना करणं
- सतत होणारं यूरिन इन्फेक्शन
- पेल्विक एरियामध्ये वेदना होणं
- थकवा, अस्वस्थता आणि चिडचिड होणं
एंडोमीट्रियोसिसवर उपचार
द हेल्थ साइडने दिलेल्या वृत्तानुसार, तरूणींमध्ये जर या आजारांची लक्षणं दिसून आली तर डॉक्टर त्यांना लवकरात लवकर मातृत्व स्वीकारण्याचा सल्ला देतात. कारण हा आजार मासिक पाळीच्या संदर्भात असून महिला जेव्हा आई बनतात त्यावेळी 9 महिन्यांपर्यंत त्यांची मासिक पाळी येत नाही आणि त्यादरम्यान या पेशींचा विकास थांबतो.
दरम्यान, हा उपाय एंडोमीट्रियोसिसच्या पहिल्या स्टेजपर्यंतच सफल होऊ शकतो. याचा अर्थ अजिबातच असा नाही की, आई बनल्यानंतर या समस्येपासून सुटका होते.
तुम्हाला तुमच्या मासिक पाळीदरम्यान वरील लक्षणं दिसली तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. अनेकदा हा आजार समजण्यासच वेळ लागतो. त्यामुळे या आजाराची लक्षणं जाणवल्यानंतर स्त्री रोग तज्ज्ञांऐवजी एंड्रोक्राइनोलॉजिस्टचा सल्ला घेणं उत्तम ठरतं.