नाश्ता, जेवणामध्ये फक्त 'कॉर्नफ्लेक्स'च...थेट झाला यकृतावर परिणाम
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2022 04:42 PM2022-11-05T16:42:30+5:302022-11-05T16:46:52+5:30
सध्या इंस्टंट फूडचा (instant food) जमाना आहे. २ मिनिटांत होणारी मॅगी किंवा १ मिनिटांत बनणारे पॉपकॉर्न खाऊनही लोक आपले पोट भरतात. मात्र याचा अतिरेक केल्यास गंभीर परिणामांना सामोरे जावे लागते.
सध्या इंस्टंट फूडचा (instant food) जमाना आहे. २ मिनिटांत होणारी मॅगी किंवा १ मिनिटांत बनणारे पॉपकॉर्न खाऊनही लोक आपले पोट भरतात. मात्र याचा अतिरेक केल्यास गंभीर परिणामांना सामोरे जावे लागते. कामावर जाताना नाश्ता बनवायला वेळ नसतो. त्यासाठी कॉर्नफ्लेक्स, ओट्स, टोस्ट यांसारख्या इंस्टंट नाश्त्यावरच अनेक जण अवलंबून असतात. या सवयीमुळे पुढे मात्र गंभीर आजार होतात. अशीच एक केस इंग्लंडमधून समोर आली आहे.
इंग्लंडमध्ये वास्तव्यास असलेले क्रिस किर्क हे नोकरी करतात. नेहमीच कामाच्या गडबडीत असल्याने त्यांना रोज कॉर्नफ्लेक्स खायचीच सवय होती. विशेष म्हणजे फक्त नाश्त्यात नाही तर दुपारच्या जेवणातही ते कॉर्नफ्लेक्सच खायचे. यामुळे रोज दोन बाऊल कॉर्नफ्लेक्स खाण्याची त्यांना सवय लागली. ही सवय त्यांना चांगलीच महागात पडली. याचा परिणाम थेट त्यांच्या यकृतावर झाला. रुटीन रक्ततपासणी मध्ये हे निदर्शनास आले.
रोज कॉर्नफ्लेक्स खाल्ल्याने काय झाले ?
रोज दोन बाऊल केवल कॉर्नफ्लेक्स खाल्ल्याने त्यांच्या शरिरातील लोहाचे प्रमाण गरजेपेक्षा जास्त वाढले. क्रिस सांगतात की, हात आणि पायावर सतत खाज सुटायची, झोप लागणे कठीण झाले, ऊर्जा कमी झाली अशी लक्षणे दिसत होती. यानंतर ६ महिन्यांनी त्यांना यकृतावर परिणाम झाल्याचे लक्षात आले.
क्रिस पुढे म्हणतात, माझे वजन जास्त आहे. ही लक्षणे जास्त वजन असल्यामुळे जाणवत असतील असेच निदान सुरुवातीला करण्यात आले. खरेतर स्थूल व्यक्तींमध्ये लिव्हर सोरायसिसचे प्रमाण दिसून येते. याच आधारावर माझ्यारील लक्षणांचा नीट अभ्यास केला गेला नाही. तपासणीनंतर हे लक्षात आले की शरिरातील फेरिटीनचा थर वाढला आहे. फेरिटीन लोह साठवून ठेवण्याचे काम करते. फेरिटीन रक्ततपासणीतून समजते की शरिरात लोहाचे प्रमाण कमी आहे की जास्त आहे. जास्त लोह जमा झाल्यामुळे नंतर ते शरिराला घातक ठरत जाते. यानंतर डॉक्टरांनी लोहयुक्त आहार पुर्णपणे बंद करण्यास सांगितले. त्यामुळे फेरिटिनची पातळी पुन्हा सामान्य होऊ लागली.
याचा अर्थ कशाचाही अतिरेक हा शरिरावर गंभीर परिणाम करतो. यासाठी प्रत्येक प्रकारचा आहार घ्यावा पण त्याचा अतिरेक व्हायला नको. नाहीतर शरीर लगेच तुम्हाला संकेत द्यायला सुरुवात करते.