फिट्स येणं अंधश्रद्धा नाही तर आजार आहे; जाणून घ्या लक्षणं आणि कारणं
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2019 01:01 PM2019-02-12T13:01:25+5:302019-02-12T13:05:27+5:30
मागील काही वर्षांमध्ये फिट्स येण्याबाबत लोकांमध्ये जागरूकता पसरवण्यात आली आहे. अनेकदा फिट्स का येतात? फिट्स आल्यावर काय करावं?
(Image Credit : Sun Life Financial)
मागील काही वर्षांमध्ये फिट्स येण्याबाबत लोकांमध्ये जागरूकता पसरवण्यात आली आहे. अनेकदा फिट्स का येतात? फिट्स आल्यावर काय करावं? याबाबत ठाऊक नसल्यामुळे अनेकदा याला अंधश्रद्धेचा प्रकार समजून त्यावर तांत्रिक-मांत्रिकाकडे नेऊन उपचार करण्यात येत असत. परिणामी रूग्णाची परिस्थिती आणखी गंभीर होऊन अनेकदा रूग्ण दगावण्याचीही शक्यता वाढत असे. परंतु याबाबत पसरवण्यात आलेल्या जागरुकतेमुळे हा प्रकार अंधश्रद्धेचा नसून त्यावर डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं असल्याचं लोकांच्या लक्षात येऊ लागलं आहे. तज्ज्ञांच्या सल्यानुसार, फिट्स येण्यावर नियंत्रण मिळवणं शक्य आहे. यावर करण्यात येणारे उपचार दिर्घकाळ चालतात. पण यामुळे रूग्णाची फिट्सच्या त्रासातून सुटका करून घेणं शक्य आहे.
का येते फीट?
फिट्स येणे ही एकप्रकारे न्यूरॉलॉजिकल डिसऑर्डर आहे. ज्यात रुग्णाच्या मेंदूमध्ये असामान्य तरंग निर्माण होऊ लागतात. ज्या प्रकारे शॉर्ट सर्किटमध्ये दोन तारांमध्ये वीज चुकीच्या दिशेने प्रवाहीत होते. यात रुग्णाला झटके येतात, तो जमिनीवर पडतो आणि काही वेळासाठी तो बेशुद्ध होतो. १ दिवसांच्या बाळापासून ते १०० वर्षांच्या वयोवृद्धालाही फिट्स येण्याची समस्या होऊ शकते. WHO नुसार, जगभरात ५ कोटी लोकांना फीट येण्याची समस्या आहे.
फिट्स येण्याची लक्षणं :
- एकाद्या व्यक्तीसोबत बोलताना ब्लँक होणं, स्नायूंमध्ये हालचाल होणं
- प्रखर प्रकाशामुळे डोळ्यांना त्रास होणं
- अचानक बेशुद्ध होणं.
- अचानक स्नायूंवरील नियंत्रण सुटणं.
फिट्स येण्याची प्रमुख कारणं :
- डोक्याला मार लागणं, ताप डोक्यात जाणं.
- डोक्यामध्ये ट्यूमर सदृश्य गाठी तयार होणं किंवा ब्रेन स्ट्रोक येणं.
- दारू किंवा इतर पदार्थांच्या सहाय्याने व्यसनं करणं.
फिट्स आल्यावर 'या' गोष्टी लक्षात ठेवा :
- फिट्स आल्यानंतर रूग्णाला एका सुरक्षित ठिकाणी एका कुशीवर झोपवा.
- साधारणतः मोकळ्या हवेमध्ये किंवा गर्दी नसलेल्या ठिकाणी रूग्णाला झोपण्यास सांगा.
- रूग्णाच्या डोक्याखाली मुलायम कापड ठेवा.
- रूग्णाला फिट येत असेल तर त्याच्या तोंडामध्ये काही टाकू नका.