कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये कोरोना काळात 13 वर्षांच्या मुलीवर दुर्मिळ व गुंतागुंतीची ‘अपस्मार शस्त्रक्रिया’
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2020 04:54 PM2020-08-21T16:54:46+5:302020-08-21T17:06:08+5:30
मुंबईतील कोकिलाबेन हॉस्पिटलमधील (केडीएएच) पेडिएट्रिक न्यूरॉलॉजिस्ट व एपिलेप्टॉलॉजिस्ट डॉ. प्रज्ञा गाडगीळ यांनी या रुग्णाला डहाणूतील एका ग्रामीण अपस्मार उपचार शिबिरात प्रथम तपासले.
(प्रातिनिधीक छायाचित्र)
अपस्मार हा एक जुनाट स्वरुपाचा आजार आहे. औषधे घेऊनही ज्यांचा हा आजार नियंत्रित होत नाही, त्या रुग्णांचा, विशेषतः मुलांचा, जीवनप्रवास खरोखरच अवघड असतो. अशा रुग्णांवर ‘अपस्मार शस्त्रक्रिया’ हाच एकमेव उत्तम उपचार ठरतो. फीट येण्यास कारणीभूत ठरणारा मेंदूचा भाग या शस्त्रक्रियेने काढून टाकण्यात येतो. एका 13 वर्षांच्या मुलीची केस याच स्वरुपाची होती. तिला वयाच्या दहाव्या वर्षापासून फीट येत होत्या. तिला दिवसभरात कधीही, कितीही फीट्स येत. त्यावेळी ती कधी खाली पडत असे व तिला इजाही होई. दररोज औषधे घेऊनही तिचा हा आजार बरा झाला नाही. ‘मेडिकली रिफ्रॅक्टरी फोकल एपिलेप्सी’ असे या आजाराचे नाव आहे.
मुंबईतील कोकिलाबेन हॉस्पिटलमधील (केडीएएच) पेडिएट्रिक न्यूरॉलॉजिस्ट व एपिलेप्टॉलॉजिस्ट डॉ. प्रज्ञा गाडगीळ यांनी या रुग्णाला डहाणूतील एका ग्रामीण अपस्मार उपचार शिबिरात प्रथम तपासले. या मुलीच्या घरची परिस्थिती बेताचीच होती. तिच्या कुटुंबात 5 माणसे आहेत. तिचे वडील झेरॉक्सचे दुकान चालवतात आणि वडापाव विकतात. त्यातूनच त्यांची गुजराण होते.
संबंधित मुलीला दिवसभरात 10 ते 12 वेऴा फीट्स येत असल्याने तिला शाळेत जाणे अशक्यप्राय होते. तिने घरीच अभ्यास करावा व शाळेत केवळ परिक्षेपुरते यावे, असे शिक्षकांनी सुचविले होते. डॉ. प्रज्ञा यांच्याशी तिची भेट तीन महिन्यांनी एकदा शिबिरात होत असे. तिला योग्य ते उपचार मिळण्याची व तिची वैद्यकीय देखभाल व्यवस्थित होण्याची गरज असल्याने डॉक्टरांनी तिला ‘केडीएएच’मध्ये दाखल होण्याचा सल्ला दिला.
शस्त्रक्रियेने सुधारण्याजोग्या बहुतांश रुग्णांमध्ये फीट्स येण्यास कारणीभूत असणारा मेंदूचा भाग ‘एमआरआय’, ‘पीईटी’ अशा ‘स्कॅनिंग’ने वा ‘व्हिडिओ ईईजी’ या साध्या चाचण्यांनी ओळखता येतो. ज्या रुग्णांच्या मेंदूचा हा भाग सहजी ओळखता येत नाही, त्यांचे आव्हान मोठे असते. अशा मुलांची शस्त्रक्रियापूर्व तपासणी दोन टप्प्यांमध्ये करण्यात येते. यासाठीच्या ‘स्टिरिओ ईईजी’मध्ये मेंदूतील ‘अॅबनॉर्मल इलेक्ट्रिक सर्किट’ तपासण्याकरीता मेंदूमध्ये इलेक्ट्रोड्स खुपसले जातात व मेंदूचे कार्य व्यवस्थित तपासले जाते. यातूनच शस्त्रक्रियेचे अंतिम नियोजन करण्यात येते. ही तपासणी करण्याची सुविधा भारतात काही विशिष्ट केंद्रांमध्ये आहे. मुलांवर ती करणारी केंद्रे तर फारच थोडी आहेत.
मुलीच्या कुटुंबियांनी शस्त्रक्रियेसाठी ‘केट्टो क्राऊड फंडिंग प्लॅटफॉर्म’मधून पैसे उभारले. ‘केडीएएच’नेदेखील तिला काही आर्थिक मदत देऊ केली. ‘केडीएएच’मध्ये दाखल झाल्यानंतर तिची शस्त्रक्रियापूर्व तपासणी झाली. मुलीला येणाऱ्या फीट्ससाठी तिच्या मेंदूचा डाव्या बाजूचा समोरचा भाग (लेफ्ट फ्रंटल लोब) कारणीभूत होता, असे या तपासणीत आढळले. मेंदूचा हाच भाग बोलण्याच्या शक्तीशी संबंधित असतो. ‘एमआरआय’ चाचणीत तसे सिद्ध झाले. यामुळे या मुलीच्या मेंदूचे अचूक निदान करणे हा जोखमीचा व गुंतागुंतीचा विषय झाला.
मुलीच्या ‘लेफ्ट फ्रंटल लोब’ची ‘स्टिरिओ ईईजी’ ही चाचणी घेण्यात आली. त्याकरीता तेथे 11 इलेक्ट्रोड लावण्यात आले. त्यात दोन दिवसांच्या कालावधीत 18 वेळा फीट्स आल्याची नोंद झाली. त्यानंतर मुलीवर ‘बायपोलर स्टिम्युलेशन’ करण्यात आले. मुलीच्या ‘लेफ्ट मिडल फ्रंटल गायरस’मध्ये ‘सल्कस’च्या खालील बाजूस असलेला एक छोटा भाग हा तिच्या फीट्ससाठी कारणीभूत आहे, हे त्यातून लक्षात आले.
हा अॅबनॉर्मल भाग मेंदूच्या आतमध्ये असल्याने डोळ्यांना दिसू शकत नव्हता. मेंदूचे स्कॅनिंग करून तो शोधण्यात आला व नंतर अति कौशल्याने काढून टाकण्यात आला. शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला एकही फीट आली नाही. तिला घरी सोडण्यात आले. आता तिची प्रकृती उत्तम असून ती उपचारांच्या पाठपुराव्यासाठी नियमितपणे ‘केडीएएच’मध्ये येत असते.