Equatorial Guinea : ताप, रक्तस्त्राव आणि नंतर…, अज्ञात आजारामुळे 'या' देशात भीतीचे वातावरण, लोकांना केलं जातंय क्वारंटाईन
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2023 10:27 PM2023-02-11T22:27:02+5:302023-02-11T22:27:29+5:30
Equatorial Guinea : देशाचे आरोग्य मंत्री मितोहा ओंडो ओ अयाकाबा यांनी शुक्रवारी सांगितले की, नमुने तपासण्यासाठी सरकार ठोस पावले उचलत आहे. त्यासाठी रक्ताचे नमुने शेजारील देश गॅबॉन येथे पाठवण्यात आले आहेत.
इक्वेटोरियल गिनी : दक्षिण आफ्रिकेच्या इक्वेटोरियल गिनीमध्ये अज्ञात आजार पसरल्याने खळबळ उडाली आहे. या आजारामुळे आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाला आहे. देशभरात या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. देशाचे आरोग्य मंत्री मितोहा ओंडो ओ अयाकाबा यांनी शुक्रवारी सांगितले की, नमुने तपासण्यासाठी सरकार ठोस पावले उचलत आहे. त्यासाठी रक्ताचे नमुने शेजारील देश गॅबॉन येथे पाठवण्यात आले आहेत.
अज्ञात रक्तस्त्रावामुळे झालेल्या मृत्यूनंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. प्रशासनाने आतापर्यंत 200 लोकांना क्वारंटाईन केले आहे. आरोग्य मंत्री मितोहा ओंडो ओ अयाकाबा यांनी माहिती दिली की, 7 फेब्रुवारी रोजी इक्वेटोरियल गिनीमध्ये प्रथमच अज्ञात आजाराची लागण झाल्याची नोंद झाली. तपासाअंती असे आढळून आले की, या अज्ञात आजाराच्या संसर्गामुळे मृत्यू झालेल्या लोकांमध्ये जे लोक होते, ते अंत्यसंस्कारात सहभागी झालेले होते.
रॉयटर्स या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, देशाच्या अधिकाऱ्यांनी संसर्गाशी थेट संबंधित असलेल्या लोकांना दोन गावांमध्ये जाण्यास बंदी घातली आहे. यासोबतच संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी उपाययोजनाही केल्या जात आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, 200 लोकांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. या लोकांमध्ये या आजाराची कोणतीही विशिष्ट लक्षणे दिसली नाहीत. मात्र, काहींनी ताप आणि नाकातून रक्त येणे, सांधेदुखीच्या तक्रारी केल्याचे सांगितले जात आहे. तसेच, या आजाराची लागण झालेल्या लोकांचा काही तासांत मृत्यू होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
इक्वेटोरियल गिनीच्या सरकारी रेकॉर्डमध्ये की-एनटेम प्रांतातील न्सोके नसोमो जिल्ह्यात गेल्या आठवड्यात असामान्य आजारामुळे नऊ मृत्यू झाल्याचे दिसून येते. मात्र, नंतर हा आकडा 8 सांगितला गेला आणि एकाचा या अज्ञात आजाराशी संबंध नसल्याचेही सांगण्यात आले. डब्ल्यूएचओच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, संघटना मृत्यूचे कारण शोधण्यासाठी नमुना चाचण्यांचे निरीक्षण करत आहे आणि त्याच्या परिणामांची वाट पाहत आहे.