सर्वसामान्यांना मिळणार मोठा दिलासा; NLEM च्या यादीत 34 औषधांचा समावेश
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2022 02:03 PM2022-09-13T14:03:36+5:302022-09-13T14:04:02+5:30
Cheap Medicines : माहितीनुसार, यादीत 34 औषधांचा समावेश करण्यात आला असून 26 औषधे काढून टाकण्यात आली आहेत.
नवी दिल्ली : अत्यावश्यक औषधे भारतात स्वस्त होणार आहेत. नवीन अत्यावश्यक औषधांची राष्ट्रीय यादी (NLEM) जाहीर झाली आहे. यामध्ये अँटी डायबिटिज औषध इन्सुलिन ग्लार्गिन, अँटी टीबी औषध डेलामॅनिड, आयव्हरमेक्टिन आणि अँटीपॅरासाइट या औषधांचा समावेश आहे. राष्ट्रीय अत्यावश्यक यादीत आता 384 औषधांचा समावेश आहे. माहितीनुसार, यादीत 34 औषधांचा समावेश करण्यात आला असून 26 औषधे काढून टाकण्यात आली आहेत.
NLEM मध्ये सूचीबद्ध असलेली औषधे नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटीने (NPPA) निश्चित केलेल्या किंमत मर्यादेपेक्षा कमी विकली जातात. पहिल्यांदा NLEM ला 1996 मध्ये तयार करण्यात आले. यापूर्वी 2003, 2011 आणि 2015 मध्ये त्यात बदल करण्यात आला आहे. आता या यादीत सप्टेंबर 2022 मध्ये पाचव्यांदा सुधारणा केली जात आहे. या यादीत निकोटीन रिप्लेसमेंट थेरपीचाही समावेश करण्यात आला आहे. म्हणजेच सिगारेट सोडणारे औषध आता NLEM मध्ये समाविष्ट झाले आहे.
याशिवाय, Ivermectin देखील यादीचा भाग बनले आहे, जे कीटकांना मारण्याचे औषध आहे. कोरोनामधील अनेक प्रकरणांमध्ये ते प्रभावी आढळले आहे. मात्र, एरिथ्रोमायसीन (Erethromycin) सारख्या अँटीबायोटिकला देखील यादीतून काढून टाकण्यात आले आहे. शेड्युल्ड औषधांच्या किमतीत वाढ घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित महागाईशी निगडीत आहे. नॉन-शेड्युल्ड औषधांसाठी कंपन्या दर वर्षी 10 टक्क्यांपर्यंत किंमत वाढवू शकतात. अंदाजे 1.6 लाख कोटी रुपयांच्या देशांतर्गत फार्मा मार्केटमध्ये शेड्युल्ड औषधांचा वाटा अंदाजे 17-18 टक्के आहे. जवळपास 376 औषधांची किंमत नियंत्रणात आहे.
वेगवेगळ्या ब्रँडच्या औषधांच्या बाजारभावाच्या साधारण सरासरीच्या आधारे कमाल मर्यादा किंमत (Ceiling Price) मोजली जाते. ज्या औषधांचा बाजारातील किमान 1 टक्के हिस्सा आहे, त्यांच्यासाठी हे केले जाते. किंमत मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या कंपन्यांना दंड ठोठावला जातो. यंदा परवडणाऱ्या किमतीत पुरेशा प्रमाणात मिळणाऱ्या औषधांची यादी तयार करण्यास स्थायी समितीला सांगण्यात आले होते. यंदा दर वेगळ्या पद्धतीने ठरवण्यात आले आहेत. तत्पूर्वी, आरोग्य मंत्रालयाने यादीत समाविष्ट असलेल्या औषधांची यादी जाहीर केली.