कोट्यवधींचा निधी तरी औषधांचा खडखडाट; ४७० कोटींहून अधिक रक्कम परत जाण्याची शक्यता

By संतोष आंधळे | Published: December 17, 2022 06:19 AM2022-12-17T06:19:47+5:302022-12-17T06:20:04+5:30

राज्यातील २२ वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न रुग्णालयांना औषध आणि यंत्रसामग्रीच्या खरेदीसाठी दरवर्षी निधी दिला जातो.

Even though funds of crores of rupees, medicines are rattled; More than 470 crore is likely to be returned | कोट्यवधींचा निधी तरी औषधांचा खडखडाट; ४७० कोटींहून अधिक रक्कम परत जाण्याची शक्यता

कोट्यवधींचा निधी तरी औषधांचा खडखडाट; ४७० कोटींहून अधिक रक्कम परत जाण्याची शक्यता

googlenewsNext

- संतोष आंधळे  
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्य शासनाच्या अखत्यारीतील बहुतांश वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न रुग्णालयांत सध्या मोठ्या प्रमाणात औषध आणि साधनसामग्रीचा तुटवडा जाणवत आहे. रुग्णांच्या नातेवाइकांना मेडिकलमधून स्वखर्चाने औषधे विकत घ्यावी लागत आहेत. या महाविद्यालयांना हाफकिन संस्थेमार्फत औषधांचा पुरवठा केला जातो. गेल्या पाच वर्षांत ४७० कोटींपेक्षा अधिक निधी यंत्रसामग्री आणि औषधे खरेदी न केल्यामुळे पुन्हा जाण्याची शक्यता असल्याने खळबळ उडाली आहे. औषध तुटवड्यामागची कारणे काय, यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाच्या आयुक्तांना अधिष्ठात्यांची तातडीने बैठक घेण्याचे आदेश देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

राज्यातील २२ वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न रुग्णालयांना औषध आणि यंत्रसामग्रीच्या खरेदीसाठी दरवर्षी निधी दिला जातो. त्यातील ९० टक्के निधी हा हाफकिन संस्थेमार्फत खर्च करावा लागतो. केवळ १० टक्के निधी हा अधिष्ठात्यांना त्यांच्या स्तरावर खर्च करण्यासाठी दिला जातो. त्यामुळे रुग्णालये त्यांच्या गरजेप्रमाणे हाफकिन संस्थेला आपली मागणी कळवत असतात. मात्र गेल्या काही वर्षांत रुग्णालयाने मागणी केल्यानुसार औषधे आणि यंत्रसामग्री आलेली नाही. 

खरेदी हाफकिनमार्फत करण्याचे निर्देश
हाफकिनच्या आधी वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयामार्फत प्रत्येक वर्षाची खरेदी ३१ मार्चपर्यंत केली जात होती. त्यावेळी निविदा प्रक्रिया आणि दर-करार यांचा आधार घेऊन ही खरेदी केली जात होती. मात्र काही कारणांस्तव २०१७ पासून राज्यातील आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण विभागासाठी लागणारी खरेदी हाफकिनमार्फत करण्याचे निर्देश देण्यात आले होते. 

या वस्तूंचा तुटवडा... 
जखम शिवण्यासाठी लागणाऱ्या टाक्यांचे सामान व लागणारे स्टेपलर, ट्युमरचा तुकडा पाठविण्यासाठी जो द्रव पदार्थ वापरतात ते फॉरमॅलिन, आय व्ही फ्लुइड्स, ॲनेस्थेशियासाठी लागणारी औषधे, मलमपट्टी करण्यास लागणारे साहित्य, विविध जीवनसत्त्वांच्या गोळ्या, अँटिबायोटिक्स औषधे, कॅल्शिअमच्या गोळ्या.

हाफकिनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. आलेला निधी परत जाणार नाही, याची काळजी घेत आहोत. अत्यंत गरजेची औषधे खरेदी केली आहेत. महाविद्यालयाने औषधांची मागणी केली, ती खरेदी त्याच वर्षात केली जाईल, याच्या सूचना हाफकिनच्या व्यवस्थापकीय संचालकांना देण्यात आल्या आहेत. - गिरीश महाजन, वैद्यकीय शिक्षणमंत्री

या प्रकरणी आम्ही विभागाच्या आयुक्तांना अधिष्ठातांची बैठक घेण्यास सांगितले आहे. त्यानुसार पुढची पावले उचलण्यात येतील; मात्र औषधांचा तुटवडा होणार नाही, याची काळजी निश्चितपणाने घेतली जाईल.    - डॉ. अश्विनी जोशी, सचिव, वैद्यकीय शिक्षण विभाग.

Web Title: Even though funds of crores of rupees, medicines are rattled; More than 470 crore is likely to be returned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :medicineऔषधं