कधीही झोपा, कधीही उठा असं करता? मग तुमचा दिवस वाईटच जाणारच
By admin | Published: June 8, 2017 06:23 PM2017-06-08T18:23:06+5:302017-06-08T18:23:06+5:30
वाट्टेल तेव्हा झोपून वाट्टेल तेव्हा उठत असाल तर तुम्हाला मूडबदल नावाचा आजार छळतोच.
- निशांत महाजन
आपण तरुण असतो, बिन्धास्त असतो. रात्री जागरणं करतो, सिनेमे पाहतो, पार्ट्या करतो, गप्पा मारत बसतो, जमलं तर अभ्यास करतो. आणि पहाटे कधीतरी झोपतो, दुपारी उठतो. कधी तर संध्याकाळीही उठतो. काहीजण तर बारा वाजून गेल्याशिवाय उठतच नाहीत. हे सारं करणं अनेकांना ‘कूल’ वाटतं. भल्या पहाटे उठून खूडबूड करणारे आईबाबा तर महाबोअर वाटतात. लवकर उठणं आवडत नाही. आणि उठलेच कधी तर उठून करणार काय असा प्रश्न पडतो. पण आता जीवनशैलीचा अभ्यास असं म्हणतो की, जर तुम्ही लवकर झोपेतून उठत नसाल किंवा रोजच तुमच्या झोपेच्या वेळा बदलत असतील तर तुमचे जबरदस्त मूडस्विंग्ज होतात. आणि तुमचे दिवसच्या दिवस वाईट जातात. आणि त्यानं तुमच्या करिअरवर कायमचा वाईट परिणाम होतो.
मेसेच्युसेट्ेस इन्स्टिट्यूट आॅफ इंजिनिअरिंगने केलेल्या एका अभ्यासानुसार हे निरीक्षण पुढं आले आहे. त्यांनी आपल्या कॉलेजमध्ये शिकणाऱ्याच मुलांचं एक सर्व्हेक्षण केलं. या मुलांना फक्त त्यांच्या झोपेच्या वेळेच्या नोंदी सलग ३६ दिवस ठेवायला सांगण्यात आल्या. त्यातून एक रेकॉर्ड तयार झालं जे असं दाखवतं की रोज एकाच वेळी झोपणारे आणि एका ठराविक वेळीच उठणारे तरुण मुलं अत्यंत कमी आहेत. बाकीचे सारे रोज वाट्टेल तेव्हा झोपतात, वाट्टेल तेव्हा उठतात. अनेकांचं झोपेचं ठरलेलं असं काही शेड्युल नाहीत. त्यातून या मुलांचं झोपेचं चक्र बिघडतं.त्यातून पचनाचं तंत्रही बिघडतं.
त्याहून वाईट म्हणजे ज्यांचं झोपेचं चक्र बिघडतं, त्यांचा मूड अनेकदा दिवसभर चांगला नसतो. ते चिडचिडतात. उदास असतात.कधी आक्रमक असतात. त्यांचे प्रचंड मूड स्विंग्ज ोतात. आणि त्यांचं कामावरचं लक्षही उडालेलं असतं. परिणाम म्हणून त्यांच्या दिवसभराच्या कामाचा दर्जा बिघडतो. आणि एकूण प्रगतीवरही त्याचा विपरीत परिणाम होतो. म्हणून हा अभ्यास सांगतोय की तुम्हाला आरोग्य, आनंद आणि मानसिक शांतता हवी असेल तर निदान झोपेच्या वेळा तरी पाळा.