मुलांचे आयुष्य बिघडवतोय मोबाइलचा अतिवापर; पालकांनो, 'हे' उपाय नक्कीच करा 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2024 01:27 PM2024-02-19T13:27:09+5:302024-02-19T13:29:56+5:30

सध्या लहान मुलांचे सर्वांत आवडते खेळणे म्हणजे मोबाइल फोन.

excessive of mobile phone is spoiling children life 5 tips for the parents to control overuse of mobile | मुलांचे आयुष्य बिघडवतोय मोबाइलचा अतिवापर; पालकांनो, 'हे' उपाय नक्कीच करा 

मुलांचे आयुष्य बिघडवतोय मोबाइलचा अतिवापर; पालकांनो, 'हे' उपाय नक्कीच करा 

Overuse of Mobile  : सध्या लहान मुलांचे सर्वांत आवडते खेळणे म्हणजे मोबाइल फोन. पूर्वी आईवडिलांच्या पिशवीतील खाऊची वाट पाहणारी मुले आता पालकांच्या खिशातील मोबाइल शोधत आहेत. ती आईवडिलांची आतुरतेने वाट पाहतात खरे ; पण तुमची नव्हे, तर मोबाइलची वाट पाहू लागली आहेत, ही वस्तुस्थिती आहे. मोबाइलच्या अतिवापरामुळे मैदानी खेळ विसरलेल्या मुलांचे मित्रदेखील खूप नाहीत. पालकांनी ‘पंचसूत्री’चे तंतोतंत पालन करून शाळा सुरू होण्यापूर्वी मुलांची मोबाइलची सवय तोडावी, अशी अपेक्षा आहे आणि हे हिताचे ठरणारे आहे.

पूर्वी लहान मुले पाढे, नातेवाइकांचे क्रमांक, गावी जाणाऱ्या बसचे नंबर व वेळ, जवळच्या व्यक्तींचे वाढदिवस, बोर्डाचा कोणता पेपर कधी आहे, अशा सर्वच गोष्टी पटकन लक्षात ठेवत होती. त्यातून वैचारिक पातळी व स्मरणशक्तीला वाव मिळत होता ; पण आता सर्वकाही मोबाइलमध्ये उपलब्ध असल्याने आणि त्याची अति सवय मुलांना लागल्याने स्मरणशक्ती कमी होत आहे. - डॉ. समीर सावंत, बालरोगतज्ज्ञ

पालकांनो, हे उपाय नक्कीच करा :

मुलांना एकलकोंडी होण्यापासून रोखा : मोबाइल घेतल्यावर कोणाचाही व्यत्यय नको, म्हणून मुले एकांतात बसतात. ती इतरांमध्ये मिसळत नाहीत. त्यामुळे ती एकलकोंडी होतात, तसेच मोबाइलच्या नादात इतर मुलांमध्ये न मिसळल्यामुळे त्यांची वैचारिक पातळी विकसित होत नाही.

दुसरीकडे लक्ष वळवा : रडणाऱ्या मुलांना शांत करण्यासाठी पालक त्यांना मोबाइल देतात. मोबाइल दिल्यावर मुले लगेचच शांत होतात. मोबाइलमुळे मुले चिडखोर होत आहेत. स्मरणशक्ती कमी होणे, हाताची बोटे दुखणे, पाठदुखीचा पण त्रास त्यांना सुरू होतोय.

जेवताना हातात मोबाइल नकोच : मुलगा जेवत नाही म्हणून त्याच्या हातात मोबाइल दिला जातो. मग, मोबाइल पाहता-पाहता आई घास भरवते. त्यावेळी जेवणाकडे लक्ष नसते आणि पोट भरल्याचेही त्यांच्या लक्षात येत नाही. जेवताना मोबाइल पाहण्याच्या सवयीचे रूपांतर व्यसनात झाल्यास अडचणी वाढू शकतात.

पालकांनी मुलांना वेळ द्यावा : मोबाइलच्या अति आहारी गेलेली अनेक मुले नैराश्याचे शिकार होत असून काहींनी जीवनदेखील संपविले आहे. मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी घरी पालकांनी मोबाइलचा वापर टाळून त्यांना भरपूर वेळ द्यायला हवा. त्यांच्या चांगल्या सवयी, छंद शोधून त्याला प्रोत्साहन द्यावे.

मुलांची कला, छंद जोपासा : पालकांनी वेळ मुलांसाठीच देणे महत्त्वाचे आहे. मुलांना चित्रकला, हस्तकला, संगीत, नृत्य, वादन, इनडोअर व आउटडोअर गेम्स,  हस्ताक्षर, वाचनाची गाेडी लावावी. मुले त्यात रमतील आणि त्यातून त्यांची आवड-निवडही लक्षात येईल. 

Web Title: excessive of mobile phone is spoiling children life 5 tips for the parents to control overuse of mobile

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.