अतिरिक्त ताणामुळे महिलांना येतोय अकाली मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 03:38 PM2017-10-24T15:38:59+5:302017-10-24T17:22:42+5:30
सर्वच आघाड्यांवर लढताना महिलांना सावधानतेचा इशारा
- मयूर पठाडे
आजच्या काळात महिलांवर कामाची जबाबदारी इतकी वाढली आहे की खरंच अक्षरश: कशाशीही त्याची तुलना करता येणार नाही. प्रत्येक आघाडीवर महिला लढताहेत. अतिशय समर्थपणे लढताहेत. पूर्वीच्या तुलनेत कित्येक पटींनी त्यांच्यावर कामाचा नुसता बोजाच वाढला नाही, तर तो बोजा समर्थपणे रेटण्याचं आव्हान आणि कर्तव्यही त्यांच्यावर आपोआप लादलं गेलं आहे.
महिलांनी घराचा उंबरा ओलांडला आणि बाहेरचीही जबाबदारी त्यांनी घ्यायला सुरुवात केली. असं असलं तरी कोणत्याच आघाडीवर त्यांची जबाबदारी कमी झाली नाही, उलट ती वाढलीच. शिवाय प्रत्येक गोष्ट उत्कृष्ट, व्यवस्थितच झाली पाहिजे, कोणतीच कमतरता त्यात राहायला नको याचं सततचं प्रेशरही वाढलं.
महिला खरोखरच सुपर वुमन झाल्या. त्या तुलनेत पुरुषांवरीची जबाबदारी एवढी वाढली नाही. महिलांवरचं परफॉर्मन्स प्रेशर मात्र दिवसेंदिवस वाढतच गेलं. आता तर ते इतकं वाढलं आहे की त्यांच्या आयुष्यावरच त्याचं प्रश्नचिन्ह उमटतं आहे.
नुकत्याच झालेल्या संशोधनानं त्यावर शिक्कामोर्तब करताना महिलांचा धोक्याचा इशारा दिला आहे. ओटावा युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी यासंदर्भात विस्तृत अभ्यास केला आणि त्यावर आपली निरीक्षणं नोंदवलेली आहेत.
शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार अतिरिक्त ताणाच्या ओझ्याखाली दिवसेंदिवस महिला दबल्या जाताहेत. त्या ताणाचा त्यांच्या शरीर, मनावर तर परिणाम होतो आहेच, पण त्यांचं आयुष्यही कमी होतंय. अनेक महिलांचं आयुष्य ताणामुळे कमी होताना त्यांना अकालीच मृत्यू येतोय. आयुष्य व्यवस्थित जगण्यासाठी महिलांवरील ताण कमी झाला पाहिजे आणि महिलांनीही त्यासाठी स्वत:हून प्रयत्न केले पाहिजेत, प्रत्येक आघाडीवर लढताना काही काळ विश्रांतीही घेतली पाहिजे आणि आपल्या आरोग्याकडे लक्ष दिलं पाहिजे, असा कळकळीचा इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे.