गाढ झोपेसाठी व्यायाम करावा की करू नये? वाचा सविस्तर...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2022 07:26 AM2022-04-14T07:26:46+5:302022-04-14T07:27:07+5:30

व्यायाम आरोग्यासाठी अतिशय चांगला असतो, हे आता नव्यानं कोणाला सांगायची गरज नाही, पण चांगल्या झोपेसाठी व्यायामाचा किती उपयोग होतो?

Exercise for deep sleep or not Read more | गाढ झोपेसाठी व्यायाम करावा की करू नये? वाचा सविस्तर...

गाढ झोपेसाठी व्यायाम करावा की करू नये? वाचा सविस्तर...

googlenewsNext

व्यायाम आरोग्यासाठी अतिशय चांगला असतो, हे आता नव्यानं कोणाला सांगायची गरज नाही, पण चांगल्या झोपेसाठी व्यायामाचा किती उपयोग होतो? रात्री गाढ झोप यावी यासाठी व्यायाम करावा की नाही? किती? कोणता? कोणत्या वेळेला?... असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात, नव्हे अनेक तज्ज्ञांनाही हे प्रश्न पडले आहेत आणि त्यांच्यात त्यासंदर्भात मतभेदही आहेत. 

पण एका गोष्टीबाबत मात्र सर्व संशोधकांचं एकमत आहे की, व्यायामामुळे आपल्याला रात्री चांगली, गाढ झोप येऊ शकते. व्यायामाचं आणि झोपेचं नेमकं काय नातं आहे, यावर अजूनही संशोधन सुरू आहे, पण मध्यम स्वरुपाचा एरोबिक पद्धतीचा व्यायाम केला, तर त्यानं चांगली झोप लागते, हे संशोधनानं सिद्ध झालं आहे. व्यायामामुळे शरीर आणि मनाला तरतरी तर येतेच, पण व्यायामामुळे आपलं मन स्थिर राहतं, मूड स्विंग्ज कमी होतात, शिवाय मेंदूही शांत राहायला मदत होते. त्यामुळे व्यायामाचा झोपेवर सकारात्मक परिणाम होतो, पण रात्री अगदी झोपायच्यावेळी जर तम्ही तीव्र व्यायाम केला, तर त्यामुळे तुमची झोप उडू शकते, असं काही संशोधकांचं म्हणणं आहे. रात्री झोपेच्या आधी व्यायाम करणाऱ्या काही लोकांनी या मताला दुजोराही दिला आहे. 

एरोबिक व्यायामामुळे आपल्या शरीरात एन्डॉर्फिन हे रसायन स्त्रवते. या रसायनामुळे मेंदू अधिक क्रियाशील होतो. त्यामुळे रात्री व्यायाम करणाऱ्या लोकांनी झोपायच्या किमान एक ते दोन तास आधी आपला व्यायाम संपवावा, असा सल्ला काही संशोधकांनी दिला आहे. 

व्यायामामुळे आपल्या शरीराचं तापमान वाढतं. व्यायामानंतर सुमारे अर्धा ते दीड तासानंतर तुमच्या शरीराचं तापमान कमी होऊ लागतं. झोपेसाठी त्याचा उपयोग होतो. ज्यांना झोपेची समस्या आहे, असे पेशंट बऱ्याचदा डॉक्टरांना विचारतात, मी किती तास, किती वेळ व्यायाम केला, तर मला चांगली झोप येईल? त्यासाठी किती दिवस, आठवडे, महिने, वर्षें मला व्यायाम करावा लागेल?.. पण या साऱ्यांसाठी आनंदाची गोष्ट म्हणजे, मध्यम तीव्रतेचा एरोबिक व्यायाम प्रकार अर्धा तास जरी केला, तरी त्याचदिवशी त्यांना त्याचा सकारात्मक परिणाम मिळू शकतो. तुम्हाला जर व्यायामाची सवय लागली आणि सातत्यानं तुम्ही योग्य प्रमाणात व्यायाम केलात, तर तुमची झोपेची समस्या निकालात निघू शकते. त्यामुळे संशोधक सांगतात, चांगल्या झोपेसाठी व्यायाम जरूर करा, त्यासाठीची वेळ मात्र तुम्हीच तपासून पाहा..

Web Title: Exercise for deep sleep or not Read more

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.