जास्त वेळ व्यायाम करणे धोक्याचे? फिटनेससाठी रोज किती वेळ द्यावा,जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2024 10:27 AM2024-01-02T10:27:34+5:302024-01-02T10:28:18+5:30
कोरोना काळानंतर म्हणा किंवा त्यापूर्वी लोकांमध्ये फिटनेसची क्रेझ अगदी झपाट्याने वाढली आहे.
मुंबई : कोरोना काळानंतर म्हणा किंवा त्यापूर्वी लोकांमध्ये फिटनेसची क्रेझ अगदी झपाट्याने वाढली आहे. रोग प्रतिकारशक्ती उत्तम ठेवण्याचा मार्ग म्हणजे फिटनेस हे एक समीकरणच झाले आहे. आणि म्हणून प्रत्येकजण व्यायाम करण्यासाठी जिमला जाऊ लागला आहे. जिममध्ये गेल्यानंतरही काही लोक तासन्तास व्यायाम करतात. निरोगी आणि तंदुरुस्त शरीरासाठी व्यायाम करणे ही चांगली गोष्ट आहे. मात्र, एखाद्या गोष्टीचा अतिरेक हा हानिकारक ठरतो. तासन्तास व्यायाम केल्याने ब्रेन हॅमरेज आणि हृदयाशी संबंधित समस्यांचा धोका वाढतो.
ब्रेन हॅमरेज, हृदयाशी संबंधित समस्या वाढण्याची शक्यता -
अतिव्यायाम केल्याने धोका:
अनेक संशोधनांमध्ये असे समोर आले आहे की, हार्डकोर व्यायामामुळे हृदयाचे ठोके अचानक बंद होतात. काहीवेळा जास्त व्यायाम केल्याने मेंदूला रक्तस्राव कमी होऊ शकतो. काहीवेळा खूप जास्त व्यायाम केल्याने कार्डियाक अरेस्ट आणि ब्रेन हॅमरेजचा धोका वाढतो. त्यामुळे शरीराला आवश्यक तेवढाच व्यायाम करावा.
यासंदर्भात डॉक्टर असा सल्ला देतात की, सर्वसामान्य लोकांनी हार्डकोर व्यायाम करणे टाळावे. फिट राहण्यासाठी दिवसातून कमीतकमी २० ते २५ मिनिटे व्यायाम करणे पुरेसे आहे.
जितका हलका व्यायाम कराल तितके तुमचे शरीर निरोगी राहील. हार्डकोर वर्कआऊट खेळाडूंनी करावा, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
सकाळी व्यायाम करण्याआधी काय खावे?
तुम्ही सकाळी व्यायाम करत असाल तर व्यायामाच्या किमान एक तास आधी नाश्ता केलेला असावा. सकाळी उठल्यानंतर एक तासानंतर आपण काहीतरी खावे. त्यामुळे तुम्हाला व्यायामासाठी ऊर्जा मिळेल. तुम्ही सकाळी व्यायाम करण्याचा विचार करत असाल तर न्याहारीमध्ये प्रोटीन आणि कार्ब्सचा समावेश करा.
अर्धा तास व्यायाम करणे पुरेसे :
शरीराला तंदुरुस्त ठेवण्यासाठी खरं तर रोजच व्यायाम करणे गरजेचे आहे. मात्र, शरीरावर तेवढाच व्यायाम टाकला पाहिजे जेवढे शरीर सहन करू शकेल. आठवड्यातून फक्त पाच दिवस व्यायाम केल्यास फायदा होऊ शकतो. फिटनेससाठी अर्धा तास व्यायाम करणे पुरेसे आहे. या जीवनशैलीमुळे पॅरालाईझ, मधुमेह, हायपरटेन्शन आणि उच्च रक्तदाब यासारख्या आजारांचा धोका कमी होऊ शकतो.
शरीराला दररोज हालचाल गरजेची असते. पूर्वीच्या तुलनेत सध्या शारीरिक कष्टाची कामे कमी झाली. त्यामुळे शरीराला निरोगी ठेवण्यासाठी वेगळ्या व्यायामाची गरज जाणवू लागली. काही मिनिटे व्यायाम करणेही शरीरासाठी फायदेशीर असते. दिवसभरात ३० मिनिटं सलग चालणे शक्य नसेल तर पाच-पाच मिनिटे असे टप्प्याटप्प्याने चाला. काहीच न करण्यापेक्षा थोडे करणे केव्हाही फायदेशीर असते. नियमित व्यायाम करणे हे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच अधिक काळ एका जागी न बसणे हेही महत्त्वाचे आहे. - डॉ. चेतन सुर्वे, एमडी