राज्यातील सर्वात लहान बाळांपैकी एक बाळ तब्बल १०० दिवसांच्या वैद्यकीय संगोपनानंतर बचावले
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2021 06:12 PM2021-10-30T18:12:14+5:302021-10-30T18:12:39+5:30
बाळाच्या आईचा गर्भधारणेशी संबधित रक्तदाबाचा विकार बळावल्यामुळे कराव्या लागलेल्या आपत्कालीन सिझेरियननंतर गर्भधारणेच्या अवघ्या २६व्या आठवड्यात हे बाळ एका खाजगी रुग्णालयात जन्माला आले.
पुणे : यावर्षी जून महिन्यातगर्भधारणेची मुदत पूर्ण होण्यापूर्वी जन्माला आलेले, महाराष्ट्रातील सर्वात लहान बाळांपैकी एक बाळ, नवजात अर्भकांसाठी असलेल्या अतिदक्षता विभागात १०० दिवस ठेवल्यानंतर काही दिवसांपूर्वीच सुखरूप आपल्या घरी परतले. बाळाच्या आईचा गर्भधारणेशी संबधित रक्तदाबाचा विकार बळावल्यामुळे कराव्या लागलेल्या आपत्कालीन सिझेरियननंतर गर्भधारणेच्या अवघ्या २६व्या आठवड्यात हे बाळ एका खाजगी रुग्णालयात जन्माला आले.
अत्यंत तीव्र स्वरुपाच्या मुदतपूर्व परिस्थितीत जन्माला आलेल्या आणि जेमतेम ४८० ग्रॅम वजनाच्या या बाळाला त्याच्या श्वासनलिकेत जाऊ शकेल अशी सर्वात लहान नळी त्याच्या श्वासनलिकेत सोडून तात्काळ लाइफ सपोर्टवर ठेवण्यात आले. जन्माला आल्या आल्या त्याच्या शरीरातील उष्णतेचा र्हास होऊ नये म्हणून त्याला प्लॅस्टिकच्या पिशवीत गुंडाळण्यात आले. त्याच्या जिवावर बेतलेल्या अशा या परिस्थितीत त्यानुकत्याच जन्माला आलेल्या बाळाला खास नवजात अर्भकांना नेण्या-आणण्यासाठीतयार केलेल्या इन्क्युबेटरमधून पुण्याच्या ज्युपिटर रुग्णालयात हलवण्यात आले.
पुण्याच्या ज्युपिटर रुग्णालयातील मुख्य नवजात अर्भक तज्ज्ञ डॉ. श्रीनिवास तांबे सांगतात,“इतक्या लहान बाळांची त्यांच्या जन्मानंतरच्या पहिल्या तासातच व्यवस्था करणे खूप महत्त्वाचे असते. इतक्या छोट्या बाळांची फुफ्फुसे पुरेशी सक्षम नसल्यामुळे त्यांना जन्माला आल्या आल्या लगेचच यांत्रिक व्हेंटिलेटरच्या आधाराची गरज भासते. अशा गर्भधारणेची मुदत संपण्याच्या खूप आधी जन्माला आलेल्या मुलांना त्यांची त्वचा परिपक्व झालेली नसल्यामुळे घातक ठरणारा हायपोथर्मिया होण्याचा धोका असतो. त्यामुळे त्यांच्या शरीरातून होणारा उष्णतेचा र्हास रोखण्यासाठी त्यांना विशेष इन्क्युबेटरची गरज असते. त्या बाळाला आवश्यक ते पोषण मिळावे आणि त्याच्या महत्त्वाच्या खुणांवर लक्ष ठेवता यावे यासाठीत्याच्या नाळेतून विशेष कॅथेटर्स सोडण्यात आले होते.”
पुण्याच्या ज्युपिटर रुग्णालयातील मुख्य नवजात अर्भक तज्ज्ञ डॉ. श्रीनिवास तांबे पुढे सांगतात,“त्या बाळाला पहिले सात दिवस यांत्रिक व्हेंटिलेटरवर ठेवल्यानंतर पुढचे ७० दिवस सीपॅप मशीनच्या साहाय्याने श्वसनासाठी मदत केली गेली. त्या बाळाला पेटंट डक्टस आर्टेरियस हा आजारही झाला होता. पण तो हृदयाच्या स्कॅनमधून लक्षात आल्यावर योग्य त्या औषधोपचारांनी यशस्वीपणे बरा केला गेला. दर दोन तासाला ०.५ मिलिलीटरने सुरुवात करून त्याला दिल्या जाणार्या दुधाचे प्रमाण हळूहळू वाढवून आठव्या दिवशी संपूर्ण आहार दुधाचा केला गेला. त्याशिवाय त्या बाळाला संसर्गही झाला होता जो लगेच लक्षात आला आणि त्यावर प्रतिजैविकांचे योग्य ते उपचार केले गेले.”
डॉ. तांबे यांच्या म्हणण्याप्रमाणे गर्भधारणेची मुदत पूर्ण होण्याच्या खूप आधी जन्माला आलेल्या मुलांना संसर्ग होण्याचा,मेंदूमध्ये रक्तस्त्राव होण्याचा, आरओपी (डोळ्यांच्या पडद्यामध्ये विचित्र रक्तवाहिन्या विकसित होणे),नेक्रोटायजिंग एंटेरोकोलयटिस (आतड्याचा विकार),पीडीए (हृदयविकार) आणि फुफ्फुसांचा दीर्घकालीन विकार होण्याची शक्यता दाट असते. सुदैवाने, बाळाला त्याच्या घरी जाताना यातील कोणताही सहआजार नव्हता आणि केलेल्या उपचारांचे दीर्घकालीन चांगले परिणाम दिसून येणे अपेक्षित आहे.
नवजात अर्भकांसाठी असलेल्या विशेष काळजी विभागामध्ये तब्बल १०० दिवस ठेवल्यानंतर त्या बाळाला घरी पाठवण्यात आले आहे. घरी पाठवते वेळी त्याचे वजन २ किलोग्रॅम होते. त्या दिवशी बाळाचे पालक आनंदात होते आणि त्यांनी ज्युपिटर रुग्णालयाच्या डॉक्टर्स आणि कर्मचार्यांचे आभार मानले.
ते बाळ सध्या त्याच्या घरी असून त्याच्या वजनात वाढ होत आहे. तसेच ते वाढीच्या सामान्य खुणा दर्शवत आहे. त्याची वाढ आणि विकास यांची देखरेख करण्यासाठी त्या बाळाला ज्युपिटर रुग्णालयाच्या बाह्य रुग्ण विभागामध्ये नियमितपणे तपासले जाईल.