मधुमेह डोळ्यांना करतोय कमजोर, अशी घ्या योग्य काळजी!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 29, 2024 03:55 PM2024-02-29T15:55:00+5:302024-02-29T15:56:52+5:30
जगभरात मधुमेहाच्या समस्येचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आह
Diabetic Patient Eye Care : जगभरात मधुमेहाच्या समस्येचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. मधुमेह हा असा आजार आहे ज्याचा मुळातून पराभव करणे शक्य नाही. मात्र त्याला नियंत्रणात ठेवणेही तेवढेच महत्त्वाचे असते. मधुमेहाचा परिणाम तुमच्या संपूर्ण शरीरावर होतो. विशेषत: डोळ्यांवरही त्याचा परिणाम दिसून येतो. मधुमेहाच्या रुग्णांना तब्येतीची विशेष काळजी घ्यावी लागते. रक्तातील साखर अनियंत्रित होण्याबरोबरच मधुमेहाच्या रुग्णांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यातीलच एक म्हणजे अशा रुग्णांची दृष्टी कमकुवत होऊ शकते. मधुमेहाच्या रुग्णांची डोळ्यांची क्षमता कमी होण्याची शक्यता असते, हे टाळण्यासाठी मधुमेहाच्या रुग्णांसाठी काही उपाय मदत करू शकतात.
योग्य आहार - मधुमेहाच्या रुग्णांनी योग्य आहार नियंत्रण करणे अत्यंत आवश्यक आहे. योग्य अन्नपदार्थ खाल्ल्याने रक्तातील साखर नियंत्रित राहण्याबरोबरच डोळ्यांचे आरोग्यही जपले जाते. यासाठी व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन सी, बीटा कॅरोटीन, ल्युटिन, ओमेगा ३ फॅटी ॲसिड असे पोषकतत्त्व असणाऱ्या अन्नपदार्थांचा आहारात समावेश करा.
डोळ्यांची काळजी घेण्याच्या काही आवश्यक सवयी लावून डोळ्यांची काळजी घेतल्यास डोळ्यांच्या समस्या सहज टाळता येतात. सकाळी आणि संध्याकाळी आपले डोळे पाण्याने धुवावेत. तसेच हातही साबणाने स्वच्छ धुवावेत, कारण बऱ्याचदा डोळ्यांमध्ये इन्फेक्शन हे हातातील घाणीमुळे होते. मधुमेह असलेल्या व्यक्तींनी तर विशेष काळजी घ्यायला हवी. नियमित आणि पौष्टिक आहार, रक्तातील साखरेची तपासणी, व्यायाम आदी पथ्ये पाळली तर डोळ्यांचे संरक्षण होते. - डॉ. मिलिंद दामले, नेत्ररोगतज्ज्ञ