पावसाळ्यात हमखास डोळे येतील! -सांभाळा
By admin | Published: July 1, 2017 05:00 PM2017-07-01T17:00:00+5:302017-07-01T17:00:00+5:30
सारखा सारखा डोळ्यांना हात लावताय? एकच रुमाल न धुता वापरताय?तुमच्या डोळ्यांना धोका आहे.
-पवित्रा कस्तुरे
पावासाळा रोमॅण्टिक वाटतो अनेकांना. तुझ्या डोळ्यात पाऊस दिसतो वगैरे म्हणतात. पण प्रत्यक्षात पावसाळ्यात अनेकांचे डोळे लाल होतात, चुरचुरतात. डोळे येतात. त्यातून पाणी वाहतं आणि डोळ्यांची आग काही उमजू देत नाही. त्यामुळे पावसाचा रोमान्स राहतो बाजूलाच आणि डोळे वाचवा मोहीम सुरु होते. त्यात हा आजार संसर्गजन्य असल्यामुळे आपल्यामुळे इतरांना प्रसाद मिळणार नाही, याचीही काळजी घ्यावी लागते. खरंतर दरवर्षी पावसाळ्यात आपल्याकडे डोळे येण्याची साथ येते. स्वच्छतेची माहिती देत जनजागृतीही होते पण तरीही हा आजार वाढतोच. आणि अनेकांना छळतोही. पाऊस आत्ताच कुठं सुरु झालाय त्यामुळे यंदा तरी आपले डोळे येवू नयेत म्हणून काही गोष्टी रोज ठरवून करायला हव्यात. आणि चुकून आले डोळे आले असतील त्यांच्यापासून लांब राहणं योग्यच. मात्र डोळे येवू नयेत म्हणून काही गोष्टी करायला हव्यात. डोळे येणं हा आजार एकप्रकारचं बॅक्टेरिअल इन्फेक्शन असतं. फंगल, केमिकल इन्फेक्शनमुळेही डोळे येतात. त्यामुळे काही गोष्टी टाळल्या तर आपण आपले डोळे येणार नाहीत इतपत खबरदारी घेवू शकतो.
१) कितीही आवडत असले तरी दुसऱ्या कुणाचे काजळ, लिपस्टिक, डिओ, परफ्युम किंवा अन्य कॉस्मेटिक्स याकाळात वापरू नयेत.
२) दुसऱ्याचा आंघोळीचा टॉवेल वापरू नये.
३) इतरांचे नॅपकिन वापरू नयेत. घरातले हात पुसायचे नॅपकिन सतत धुवावेत.
४) आॅफिसला नेतो ते रुमाल रोज धुवावेत. काहीजण अनेक दिवस हे रुमाल धूत नाहीत. किंवा न धुताच पुन्हा पुन्हा वापरतात.
५) बाहेरुन आल्यावर हातपाय स्वच्छ धुवा.
६) ज्यांचे डोळे आलेत अशा सहकाऱ्यांपासून किंवा सहप्रवाश्यांपासून लांब रहा.
७) लेन्स वापरत असाल तर त्यांची योग्य काळजी घ्या.
८) आपला रोजचा चष्माही रोज स्वच्छ करा.
९) अनेकांना सारखे डोळे चोळायची सवय असते. तसं करू नका.
१०) हॅण्ड सॅनिटायझर वापरा. हात स्वच्छ असल्याची खात्री करुनच गरज पडल्यास डोळ्यांना हात लावा.
११) सेल्फ मेडिकेशन अर्थात डोळे चुरचुरतात म्हणून स्वत:च्या मनानं किंवा गुगल करुन, मित्रांच्या सल्यानं डोळ्यात कुठलीही औषधं, ड्रॉप्स टाकू नका.