फॅक्टचेक : टूथपेस्टवर असणाऱ्या 'या' मार्कचा अर्थ तुम्हाला माहीत आहे का?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2018 04:03 PM2018-08-07T16:03:07+5:302019-08-29T12:28:15+5:30
आपण दात घासण्यासाठी बाजारात अनेक कंपन्यांच्या विविध टूथपेस्ट उपलब्ध आहेत. यातील बहुतांश कंपन्या आपलीच टूथपेस्ट कशी चांगली, हे वारंवार जाहिरातींच्या माध्यमातून सांगताना दिसतात.
आपण दात घासण्यासाठी बाजारात अनेक कंपन्यांच्या विविध टूथपेस्ट उपलब्ध आहेत. यातील बहुतांश कंपन्या आपलीच टूथपेस्ट कशी चांगली, हे वारंवार जाहिरातींच्या माध्यमातून सांगताना दिसतात. एवढच नाही तर टूथपेस्टवर एका विशिष्ट रंगाचे मार्कही करण्यात आलेले असतात. हे मार्कही काहीना काही सांगत असतात. त्यात तुम्ही टूथपेस्टच्या खालच्या बाजूस काळ्या रंगाचा मार्क पाहिला असेल तर ती टूथपेस्ट चुकूनही खरेदी करू नका. कारण काळ्या रंगाचा मार्क असणाऱ्या टूथपेस्टमध्ये केमिकल्सची मात्रा सर्वाधिक असते. अशाप्रकारचं एक वृत्त आम्ही काही इंग्रजी वेबसाइटवरील वृत्ताच्या आधारे दिलं होतं. सोबत लाल, निळ्या आणि हिरव्या रंगाचा काय अर्थ असंही त्यात सांगितलं होतं.
मात्र, factcrescendo.com या वेबसाइटच्या मदतीने आम्हाला हे जाणून घेण्यास मदत झाली की, टूथपेस्टवरील मार्कबाबतची ही माहिती अफवा होती. अशात factcrescendo.com ने पडताळणी केल्यावर खालील माहिती समोर आली आहे.
तथ्य पडताळणी
ट्युबवरील रंगीत मार्कचा खरं काय अर्थ असतो याचा शोध सुरू केल्यावर द सन नावाच्या वृत्तस्थळावरील एक बातमी आढळली. 14 जुलै 2016 रोजी प्रसिद्ध झालेल्या या बातमीत या रंगीत मार्कविषयीच्या अफवेचे खंडन केले आहे. बातमीनुसार, रंगीत मार्क हे ट्युब उत्पादनाच्या प्रक्रियेचा एक भाग आहे. त्याचा आणि टुथपेस्टमधील रसायनांची मात्रा यांचा काहीही संबंध नसतो. रंगीत मार्कला “आय मार्क्स” म्णतात. ट्युबला कुठे कापायचे आणि फोल्ड करायचे याची मशीनला सूचना करण्याचे काम हे मार्क्स करीत असतात. हेल्थलाईन वेबसाईटवरीलसुद्धा हीच माहिती दिली आहे.
चीनमधील ऑबर पॅकेजिंग ही कंपनी विविध प्रकारच्या ट्युबचे उत्पादन करते. या कंपनीचे तत्कालिन सिनीयर ओव्हरसीज सेल्स मॅनेजर हेन्री पेंग यांनी लिंक्डइन वेबसाईटवर एक ब्लॉग लिहून रंगीत आय मार्कचा उपयोग सांगितला आहे. उत्पादनावर आय मार्क असण्याचे दोन कारण असतात. एक म्हणजे मागची आणि पुढची बाजूचे संरेखन (आलाईनमेंट) सारखे ठेवून पॅकेजवरील प्रिंटिंग सरळ ठेवणे आणि दुसरे म्हणजे पॅकेज कुठे कापायचे आणि फोल्ड करायचे याची माहिती देणे. आय मार्कच्या रंगाचा काहीच अर्थ नसतो. ट्युबच्या रंगानुसार आय मार्कचा रंग निवडण्यात येतो. त्यामुळे तो कोणताही असू शकतो. आय मार्क आणि उत्पादन याचा काहीच संबंध नसतो.
कोलगेट कंपनीच्या वेबसाईटवरसुद्धा कलर मार्क/कोड विषयक मेसेज खोटा असल्याचे म्हटले आहे. कोलगेटने दिलेल्या माहितीनुसार, ट्युबवरील रंगीत मार्क हे लाईट सेन्सरला ट्युबचा शेवट कुठे आहे याची माहिती देतो, जेणेकरून ट्युब तयार करणाऱ्या मशीनला नेमके कुठे कापायचे आणि कुठे सील करायचे हे कळते.
बेस्ट पॅकेजिंग कोको या युट्युब चॅनेलवर आय मार्कद्वारे पॅकेजची कशी कटिंग आणि फोल्डिंग केली जाते याचे प्रात्याक्षिक दाखविले आहे. ते तुम्ही खाली पाहू शकता. यावरून स्पष्ट होते की, केवळ टुथपेस्टच नाहीत इतर अनेक उत्पादनांच्या ट्युबवर हे रंगीत मार्क असतात. ते मशीनसाठी केवळ कट आणि फोल्ड मार्क म्हणून काम करतात.
निष्कर्ष
टुथपेस्ट ट्युबच्या खालच्या बाजूस असणारे रंगीत मार्क टुथपेस्टमधील रासायनिक तत्वांच्या प्रमाणांचे निर्देशक नसतात. लाल, निळा, हिरवा, काळा रंगाच्या मार्कचा टुथपेस्टच्या गुणवत्तेशी काही संबंध नसतो. ट्युबची निर्मिती करताना मशीनला ट्युब कुठे कापायची आणि फोल्ड करायची यासाठी ते मार्क असतात. त्यामुळे टुथपेस्टवरील रंगीत मार्कविषयीचा मेसेज खोटा आहे.
(माहिती सौजन्य : marathi.factcrescendo.com)