परीक्षेत ‘फेल्युअर’? कमी मार्क्स, पोरानं घराण्याचं नाव घालवलं? भविष्याचं ‘वाटोळं’? अॅडमिशनचा बोऱ्या?..
By admin | Published: May 31, 2017 04:13 PM2017-05-31T16:13:25+5:302017-05-31T16:13:25+5:30
तुम्हाला मार्क्स हवेत की तुमचं मूल? रिझल्टच्या काळात खास पालकांसाठी नऊ टिप्स..
- मयूर पठाडे
सध्या परीक्षांच्या रिझल्टचे दिवस आहेत. दहावी, बारावी, त्याचबरोबर सीईटी.. अशा अनेक परीक्षांचे रिझल्ट लागताहेत.. काहींचे रिझल्ट लागलेत, तर काहींचे लागायचेत.
या परीक्षांमध्ये ज्यांना खरोखरच चांगले, आपल्या अपेक्षेप्रमाणे मार्क्स पडलेत किंवा पडतील, त्यांचं ठीक आहे, पण बहुतेकांचं तसं होत नाही. कितीही मार्क्स पडलेत तरी ते पालकांना आणि विद्यार्थ्यांनाही कमीच वाटतात. अर्थात आजच्या स्पर्धेच्या युगात ते साहजिकही आहे. कारण गुणांच्या या खैरातीत कितीही मार्क्स पडलेत तरीही आजकाल हव्या त्या शाखेला अॅडमिशन मिळण्याची मारामार.
पालकांनीही एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, की त्यांना खरोखर मार्क्स हवे आहेत, की आपलं मूल? फेल्युअरच्या टेन्शनपायी त्यानं नको ते करून घेतलं तर शेवटी हाती काय उरणार आहे?
त्यामुळे खरंतर यावेळी विद्यार्थ्यांऐवजी पालकांनीच समजून घेण्याची गरज आहे.
पालकांसाठी काही खास टिप्स
१- आपल्या मुलाला खरोखरच कमी मार्क्स मिळाले असतील किंवा तो फेल झाला असेल तर जाहीरपणे आपली निराशा दाखवण्याऐवजी मुलाला समजून घ्या. त्याच्या पाठीशी उभे राहा. यशापेक्षाही अपयशातून माणूस सर्वाधिक शिकत असतो. तुमचा हाच सपोर्ट मुलाला नवी उभारी देऊन जाईल.
२- लक्षात ठेवा, आपल्या पाल्यांची इतरांबरोबर तुलना कधीही करू नका. ‘तुझ्याच बरोबरचा ना तो? बघ, त्याला किती मार्क्स मिळाले आणि तुला?’ अशी तुलना मुलांचा आत्मविश्वासच खचवून टाकते.
३- प्रत्येक मुलाची कपॅसिटी, स्ट्रेंथ, क्षमता, आवड वेगवेगळी असते. कोणी अभ्यासात चांगला, कोणी खेळात, कोणी तार्किक बुद्धिमत्तेत, कोणी कशात, तर कोणी कशात.. एका गोष्टीत फेल म्हणजे साऱ्यात फेल, असं कधीच होत नाही.
४- अपयशामुळे आपलं मूलही निराशच झालं असेल. त्याच्या शेजारी बसा. प्रेमानं त्याला जवळ घ्या. तो कशात कमी पडला हे समजून घ्या आणि पुढच्या वेळी त्या गोष्टीवर अधिक लक्ष केंद्रित करा.
५- आपल्या मुलाची स्ट्रेंग्थ काय आहे आणि विकनेस कशात आहे, याची पालक म्हणून आपल्याला कल्पना असलीच पाहिजे. त्यानुसारच त्यांच्या अभ्यासाचा वेळ आणि फोकस केंद्रित करायला हवा.
६- आपल्या अपेक्षा कायम वास्तव, रिअलिस्टिक आणि साध्य करता येण्याजोग्या असू द्या. नाहीतर या अपेक्षांच्या ओझ्याखाली आपलं मूलही कायम दडपलेलंच राहील आणि आपल्याही वाट्याला कायम नैराश्यच येईल. आत्ता आपण ज्यावरून नाराज झाला आहात किंवा मुलाला झापताहात, त्याचं कारणही हेच आहे का, याकडे एकदा स्वत: बघा आणि आत्मपरीक्षण करा.
७- अपयश पचवायला शिकणं हेदेखील एक खूप मोठं शिक्षण असतं, जे कधीच पैसे देऊन शिकायला मिळत नाही हेदेखील लक्षात घ्या.
८- आत्ताच्या रिझल्टमुळे किंवा (पुढे लागणाऱ्या रिझल्टनंतर) आपलं मूल नैराश्यात गेलंय का, ते एकटं एकटं राहतंय का, स्वत:शीच खूप कुढतंय का, ते खूप संताप करतंय का, त्याची भूक आणि झोप खूपच कमी झालंय का.. अशा गोष्टींकडेही बारीक लक्ष द्या.. वेळीच त्याला आधार द्या.. स्वत:चं काही बरंवाईट करून घेण्यापूर्वीची ही सर्वसाधारण लक्षणं आहेत एवढं लक्षात असू द्या.. आपलं मूल असं काही करणार नाही, इतका काही गुन्हा त्यानं केलेला नाही. त्याला घालूनपालून बोलू नका. चारचौघात अपमान करू नका..
९- तुमचं मूल तुमच्याजवळ आहे, भविष्याच्या आव्हानांसाठी ते तयार आहे, यापेक्षा अधिक तुम्हालाही काय हवं?