घराबाहेर पडताय? तापमानाचा पारा वाढतोय, पाणी सोबत ठेवा अन् खबरदारी घ्या!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2022 03:59 PM2022-03-02T15:59:07+5:302022-03-02T16:08:03+5:30
Health Tips : योग्य प्रमाणात पाणी पिल्यास उन्हाळ्यातील तक्रारींवर मात करता येते. दररोज किमान तीन लिटर पाणी प्यायला हवे.
फेब्रुवारीच्या उत्तरार्धापासून थंडी कमी झाली असून, आता उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. कमाल आणि किमान तापमानात वाढ झाल्याने दुपारच्या वेळी उकाडा जाणवत आहे. अशा परिस्थितीत शरीराचे निर्जलीकरण अर्थात डिहायड्रेशनचा धोका संभावतो. पातळी कमी झाल्याने शरीरावर गंभीर परिणाम होतो. योग्य प्रमाणात पाणी पिल्यास उन्हाळ्यातील तक्रारींवर मात करता येते. दररोज किमान तीन लिटर पाणी प्यायला हवे. फळांचा सर, लिंबूपाणी, नारळ पाण्याचे सेवन लाभदायी असते. तसेच घराबाहेर पडताना न विसरता पाण्याची बाटली सोबत ठेवावी.
पहाटे थंडी, दुपारी ऊन
थंडी संपून उन्हाळा सुरू झाल्याने दुपारच्या वेळी उकाडा जाणवत आहे. असे असले तरी पहाटेच्या वेळी वातावरणात गारवा पसरत आहे.
यंदा पारा ५ अंशांपर्यंत
यंदाच्या हिवाळ्यात जिल्ह्याचा किमान तापमानाचा पारा ५ अंशांपर्यंत घसरला होता. निफाडचे तापमान त्याहूनही खाली आले होते. मात्र, ते जास्त काळ टिकू शकले नाही. वातावरणातील बदलामुळे हिवाळाभर तापमानात चढ-उतार सुरू होती.
तापमान ३४ अंशांवर
हिवाळ्यात ५ अंशांपर्यंत घसरलेल्या तापमानात फेब्रुवारी अखेरला ३४ अंशांपर्यंत वाढ झाली. उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच तापमानात वाढ झाल्याने मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात उष्णतेचा सामना करावा लागू शकतो.
काय काळजी घ्याल?
उन्हाळ्यातील उष्णतेपासून बचावासाठी सुती व फिकट रंगाच्या कपड्याचा वापर करावा. योग्य प्रमाणात पाणी पिणे हाच रामबाण उपाय आहे. सकाळी १० ते दुपारी ३ पर्यंत सूर्याच्या किरणांची प्रखरता सर्वाधिक असते. त्यामुळे या वेळात घराबाहेर पडणे टाळावे.
पाणी वारंवार प्या
शरीरातील पाण्याची पातळी टिकवून ठेवण्यासाठी ठरावीक वेळेने थोडे पाणी प्यावे. त्याचबरोबर नारळाचे पाणी, सरबत, पन्हे, ताक, दूध, फळांचा रस घ्या. पुन्हा पुन्हा पाणी पिऊनही तहान भागत नसल्यास कलिंगडाचा रस, सब्जाचे पाणी घ्यावे. चहा, कॉफी, कोला, बीअर, मद्य, आदी उष्णता वाढविणाऱ्या पेयांपासून दूर राहावे.
उन्हाळ्यात शरीरातील पाणी कमी पडणे नुकसानदायक ठरते. पाणी कमी पडल्यास डिहायड्रेशन, थकवा, अशक्तपणा जाणवणे, आदींसह रक्तदाबाची समस्या, त्वचा कोरडी होणे, डोळे निस्तेज होणे अशा समस्या जाणवतात. त्यासाठी ठरावीक वेळेने थोडे पाणी प्यायला हवे.
- डॉ. तुषार कुटे, फॅमिली फिजिशियन