निरोगी आयुष्यासाठी एक तरी उपवास हवाच!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2021 10:19 AM2021-08-09T10:19:00+5:302021-08-09T10:19:12+5:30

काही जणांना उपवास करण्याची योग्य पद्धत माहीत नसल्याने त्यांना या उपवासाचा त्रास होतो. एका वेळेनंतर त्यांना हा उपवास नकोसा वाटतो.

Fasting is a must for a healthy life! | निरोगी आयुष्यासाठी एक तरी उपवास हवाच!

निरोगी आयुष्यासाठी एक तरी उपवास हवाच!

Next

- ओमकार गावंड

मुंबई : निरोगी आयुष्य जगण्यासाठी उपवास करणे आवश्यक असल्याचे नेहमी आहार तज्ञ सांगतात. यासाठी भारतात अनेक जण विविध प्रकारे उपवास करतात. उपवास करण्याच्या पद्धती वेगळ्या असल्या तरी हे उपवास सर्वांना फलदायी ठरतात. बदललेला आहार आणि त्याच्या वेळा यामुळे अनेक आजार वाढतात. त्यामुळे अनेक जण आठवड्यातून एकतरी उपवास करतातच.

मात्र काही जणांना उपवास करण्याची योग्य पद्धत माहीत नसल्याने त्यांना या उपवासाचा त्रास होतो. एका वेळेनंतर त्यांना हा उपवास नकोसा वाटतो. उपवासाच्यावेळी योग्य आहाराची काळजी घेणे देखील गरजेचे आहे. यासाठी आहार तज्ञाचा योग्य सल्ला घेऊन उपवास केल्यास त्याचा नक्कीच फायदा होतो.

एकादशी दुप्पट खाशी, असे नको !
उद्या उपवास धरायचा आहे, म्हणून आदल्या दिवशी जास्त खाणे किंवा उशिरा खाणे योग्य नाही. यामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्याचप्रमाणे उपवासाच्या दिवशी चहा, दूध, बटाट्याचे तळलेले पदार्थ यांचे जास्त सेवन करू नये. यामुळे पोटाचे विकार वाढू शकतात. तसेच रात्री उपवास सोडताना देखील समतोल आहार घेणे गरजेचे आहे. तरच उपवास सफल होऊ शकतो.

उपवासाला काय खावे?
शरीरात पाण्याचे प्रमाण योग्य राहण्यासाठी मुबलक प्रमाणात पाणी प्यावे. दर दोन ते तीन तासांनी फळे खावीत. उपवासाला चालणारी भाजी व दही हलक्या प्रमाणात खावे. दिवसभर उत्साह टिकून राहावा यासाठी लिंबू पाणी व ताक यांचे सेवन करत रहावे.
काय खाऊ नये
उपवासाला चालते म्हणून खिचडी, तळलेले साबुदाणा वडे, शेंगदाणे, चहा यांचे सेवन जास्त प्रमाणात करू नये. बाहेरून आणलेले तळलेले वेफर्स, चिवडा तसेच उपवासाचे इतर पदार्थ खाणे टाळावे.

निरोगी आयुष्यासाठी व्यायाम, चांगला आहार या गोष्टींसोबतच उपवास देखील महत्त्वाचा आहे. उपवासाच्या दिवशी शक्यतो पाणी व फळांचा रस यावरच भर दिला पाहिजे. हल्ली उपवासाच्या नावे लोक इतर दिवसांपेक्षा जास्त तेलकट व गोड पदार्थ खातात. ते टाळायला हवे.
- डॉ. समीर नाईक, आहारतज्ञ 

मीही करतो आठवड्यातून एक उपवास
उपवासामुळे शरीराला एक प्रकारचा आरामच दिला जातो. त्यामुळे मी आठवड्यातून एक उपवास धरतो. यामुळे आजारांपासून दूर राहण्यास देखील मदत होते. - शैलेश पाटील
अनेकदा लोकांना जिम ट्रेनर कडून अत्यंत कठोर डाएट सांगितला जातो. यामुळे सुरुवातीचे काही महिने तो डाएट व्यवस्थितरीत्या पाळला जातो. यानंतर कंटाळून तो डायरेक्ट सोडला जातो. त्यापेक्षा आठवड्यातून एकदा उपवास केल्यास त्यात सातत्य राहते.
- विनिता केणी 

Web Title: Fasting is a must for a healthy life!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.