झोप न लागणं, थकवा जाणवतोय... तर कोरोनाशी कनेक्शन; ICMR च्या रिपोर्टमध्ये मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2024 06:53 PM2024-07-30T18:53:09+5:302024-07-30T18:58:06+5:30

कोरोना व्हायरसपासून लोकांमध्ये आरोग्याशी संबंधित अनेक समस्या दिसून येत आहेत. ज्याचा लोकांच्या दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम होत आहे.

fatigue sleepiness and sleep quality are sars cov2 variants in patients with long covid symptoms | झोप न लागणं, थकवा जाणवतोय... तर कोरोनाशी कनेक्शन; ICMR च्या रिपोर्टमध्ये मोठा खुलासा

झोप न लागणं, थकवा जाणवतोय... तर कोरोनाशी कनेक्शन; ICMR च्या रिपोर्टमध्ये मोठा खुलासा

इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चचा (ICMR) नुकताच एक रिपोर्ट समोर आला आहे. यामध्ये आरोग्याशी संबंधित अशा गोष्टींचा उल्लेख करण्यात आला आहे, ज्यांची माहिती प्रत्येक व्यक्तीसाठी खूप महत्त्वाची आहे. या माहितीमध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आलं आहे की, कोरोना व्हायरसपासून लोकांमध्ये आरोग्याशी संबंधित अनेक समस्या दिसून येत आहेत. ज्याचा लोकांच्या दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम होत आहे.

कोरोनानंतर आरोग्याशी संबंधित समस्यांमुळे अनेक अवयवांवर परिणाम झाला आहे. जसं की ॲलर्जी, हृदयाशी संबंधित आजार, ऐकण्याची क्षमता कमी होणं, न्यूरॉनशी संबंधित आजार, त्वचेशी संबंधित आजार, किडनी, लिव्हर, फुफ्फुस आणि आतड्यांसंबंधी समस्या उद्भवू शकतात.

भारतातील ३१ रुग्णालयांमधून घेतलेले आकडे आणि क्लिनिकल रजिस्ट्री आकडे यांच्या आधारे डेटा तयार करण्यात आला आहे. आरोग्याशी संबंधित समस्यांमध्ये श्वास घेण्यास त्रास होणं, थकवा येणं, मानसिक आरोग्याशी निगडीत समस्या अशी लक्षणं दिसून येत असल्याचं स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे.

डेटामध्ये ८०४२ रुग्णांचा समावेश करण्यात आला आहे. या रुग्णांना डिस्चार्ज मिळाल्याच्या ३० ते ६० दिवसांपासून किरकोळ त्रास होत असल्याचं दिसून आलं. धाप लागणे, थकवा येणे आणि मानसिक आरोग्याच्या समस्या १८.६ टक्के, १०.५ टक्के आणि ९.३ टक्के आढळल्या. त्यापैकी २१९२ लोकांमध्ये एक वर्षाच्या अंतरानंतर आरोग्याशी संबंधित अनेक गंभीर समस्या वाढल्या आहेत. 

या आकडेवारीमध्ये युरोपमधील १०६ स्टडीज, आशियातील ४९ स्टडीज, नॉर्थ आणि साऊथ अमेरिकेतील ३१ स्टडीज आणि इतर खंडांमधील १९४ स्टडीजचा समावेश आहे. या रिपोर्टमध्ये २९ टक्के लोकांना सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं सांगण्यात आलं. ज्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं नाही अशा लोकांना थकवा, अंगदुखी, अस्वस्थता, झोप न लागणे, धाप लागणं असा त्रास होत होता.

या रिपोर्टमध्ये असंही म्हटलं आहे की, कोरोना व्हायरसनंतर लोकांमध्ये ज्या पद्धतीने आरोग्याशी संबंधित समस्या दिसून येत आहेत. रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होणे, डिस्बायोसिस, मायक्रोथ्रॉम्बी, फायब्रोसिस, श्वसन समस्या हे त्यामागील कारण असू शकतं.

अलीकडील रिपोर्टनुसार, कोरोनामधून बरे झालेल्या सुमारे ४५ टक्के लोकांमध्ये किमान एक लक्षण दिसून आलं आहे. कोविडपासून, लोकांमध्ये खूप थकवा दिसत आहे. या डेटामध्ये श्वासोच्छवासाचा त्रास, चव कमी होणं, अस्पष्ट दृष्टी, डोकेदुखी, खोकला, हलका ताप, चक्कर येणं, नैराश्य, स्नायू आणि सांधेदुखी आणि अशा अनेक समस्यांचा समावेश आहे.

'वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन'च्या म्हणण्यानुसार, थकवा, धाप लागणे, श्वास घेण्यास त्रास होणे, एकाग्रतेचा अभाव, सतत खोकला, छातीत दुखणं, बोलण्यात अडचण, स्नायू दुखणं, चव कमी होणं अशा समस्या असू शकतात. आयसीएमआरने असंही सांगितलं की, ज्या लोकांनी कोरोना होण्यापूर्वी लस घेतली होती. त्यांच्यामध्ये आरोग्याशी संबंधित समस्या कमी दिसून आल्या आहेत. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी केवळ १६ टक्के रुग्णांचं लसीकरण करण्यात आलं होतं.
 

Web Title: fatigue sleepiness and sleep quality are sars cov2 variants in patients with long covid symptoms

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.