सारखी तहान लागतेय?...असू शकतो हा गंभीर आजार!व्हा वेळीच सावध!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2021 08:39 PM2021-05-31T20:39:15+5:302021-05-31T20:41:10+5:30
तुम्हाला सतत तहान लागते का? दरवेळी ही तहान उन्हाळ्यामुळे लागत असेल असेच काही नाही. तहान लागण्याची अन्य कारणेही असू शकतात. ही कारणे काहीवेळा आजार असू शकतात तर एखाद्या आजाराची लक्षणेही असू शकतात.
उन्हाळ्याच्या दिवसात तहानेने जीव व्याकूळ होऊन जातो. सतत पाणी पित रहावेसे वाटते. पण तुम्हाला सतत तहान लागते का? दरवेळी ही तहान उन्हाळ्यामुळे लागत असेल असेच काही नाही. तहान लागण्याची अन्य कारणेही असू शकतात. ही कारणे काहीवेळा आजार असू शकतात तर एखाद्या आजाराची लक्षणेही असू शकतात. त्यामुळे वेळीच सावध व्हा व जाणून घ्या तहान लागणे नेमके कशामुळे असू शकते...
डॉ. अबरार मुल्तानी यांनी झी न्युजच्या संकेतस्थळाला दिलेल्या माहितीनूसार खालील त्रास संभावतात.
मधुमेह
मधुमेह किंवा डायबेटीज असताना रक्तातील वाढलेली साखर मुत्रावाटे बाहेर फेकली जाते. यामुळे सतत युरीन होत राहते. याचा परीणाम म्हणजे शरीरातील पाणी कमी कमी होत जाते व सतत तहान लागत राहते. त्यामुळे तुम्हाला जर सतत तहान लागत असेल तर हा डायबेटीजचा धोकाही असू शकतो.
पॉलीडिस्पिया
जर तुम्ही गरजेपेक्षा जास्त पाणी पित असाल तर तुम्हाला पॉलीडिस्पिया हा आजार असू शकतो. या आजारात सतत तहान लागते आणि गरजेपेक्षा जास्त पाणी पोटात जाते. यामुळे शरीरातील सोडियमचे प्रमाण कमी होते. यामुळे तुम्हाला मळमळ, उलट्या अशी लक्षणं जाणवू शकतात. तसेच तुम्हाला सतत युरिनही होऊ शकते.
डिहायड्रेशनची लक्षणे
तुम्हाला हा त्रास उन्हाळ्यात जास्त जाणवेल. सतत तहान लागणं हे डिहायड्रेशनचं लक्षणही असू शकतं. तुमच्या शरीरात तुम्हाला पाण्याची कमतरता जाणवते. अशावेळी तुम्हाला घसा सतत कोरडा पडणे, थकवा वाटणे अशी लक्षणं दिसू शकतात. जुलाब, हिटव्हेव, फुड पॉयझनिंग, ताप, जळजळ यामुळेही डिहायड्रेशन होऊ शकते. यावर योग्य प्रमाणात पाणी आणि इलेक्ट्रॉल देऊन पाण्याची समस्या दूर होऊ शकते.
उपाय काय?
डॉ. मुल्तानी यांच्या मते यावर नक्कीच उपाय आहेत. पहिला उपाय म्हणजे एकाचवेळी भरपूर पाणी पिऊ नये. तुम्ही आवळा आणि मधाचे मिश्रण खाऊ शकता तसेच भिजवलेली बडिशेप वाटून खाऊ शकता. जर जास्तच त्रास होत असेल तर त्वरित डॉक्टरला संपर्क साधणेच योग्य.