थंडीत घरामध्ये 'या' 5 गोष्टी अवश्य ठेवा; अनेक आजारांवर ठरतील रामबाण उपाय!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2018 12:17 PM2018-11-02T12:17:26+5:302018-11-02T12:22:13+5:30
थंडी सुरू झाली की तिच्यासोबत अनेक छोट्या छोट्या आजारांचंही आगमन होतं. अशामध्ये अॅन्टी-बायोटिक्स घेण्याऐवजी नैसर्गिक पदार्थांनी या आजारांवर उपचार करण्याचा प्रयत्न करा.
थंडी सुरू झाली की तिच्यासोबत अनेक छोट्या छोट्या आजारांचंही आगमन होतं. अशामध्ये अॅन्टी-बायोटिक्स घेण्याऐवजी नैसर्गिक पदार्थांनी या आजारांवर उपचार करण्याचा प्रयत्न करा. जाणून घेऊया काही असे घरगुती आणि नैसर्गिक उपाय जे थंडीमध्ये त्रास देणाऱ्या या आजारांपासून बचाव करण्यासाठी मदत करतील. हे उपाय शरीरातील रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी मदत करतात. त्यामुळे थंडीमध्ये या पदार्थांचं सेवन अवश्य करा.
खडीसाखर :
आयुर्वेदानुसार खडीसाखर कफ काढून टाकण्यासाठी आणि खोकला कमी करण्याचं काम करते. खडीसाखर तोंडामध्ये ठेवून चघळल्याने आराम मिळतो. दिवसातून दोन वेळा हा प्रयोग केल्याने आराम मिळेल.
बडिशेप :
फार कमी लोकांना हे ठाऊक असेल की, थंडीमध्ये आपली पचनशक्ती कमी होते. त्यामुळे अपचन आणि अॅसिडिटीसारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. जेवल्यानंतर बडिशेप खाल्याने या समस्या दूर होण्यास मदत होते.
कापूर :
एक कप गरम नरळाच्या तेलामध्ये एक मोठा कापराचा तुकडा टाकून वितळवून घ्या. त्यानंतर सांध्यांवर त्या तेलाने मालिश करा. कापूर रक्तप्रवाह सुरळीत करण्यासाठी फायदेशीर ठरते. त्यामुळे सांधेदुखी दूर होण्यास मदत होते.
कोरफड :
अचानक तापमान आणि आद्रतेमुळे त्वचा कोरडी होते आणि खाज येते. कोरफड एक मॉयश्चरायझर आणि अॅन्टी-इन्फेमेटरीसरखे गुणधर्म आढळतात. कोरड्या त्वचेवर या जेलने मसाज केल्याने खाजेसारख्या समस्येपासून आराम मिळतो.
निलगिरी ऑईल :
निलगिरी ऑईल हे एक इसेंशिअल ऑईल आहे. निलगिरीच्या तेलाचे काही थेंब उकळत्या पाण्यामध्ये टाकून त्या पाण्याची वाफ घ्या. त्यामुळे कफ निघून जाण्यास आणि खोकला नाहीसा होण्यास मदत होते. त्याचप्रमाणे बंद नाकाची समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर ठरते.