२४ तासांपेक्षा जास्त वेळ ताप येणं धोकादायक; पावसाळ्यात करू नका दुर्लक्ष, अन्यथा...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2024 03:51 PM2024-07-25T15:51:24+5:302024-07-25T15:52:26+5:30

कधी पाऊस तर कधी ऊन असे हवामानात सतत बदल होत असतात, ज्याचा आरोग्यावर वाईट परिणाम होत आहे.

fever can become severe for more than 24 hours in monsoon season | २४ तासांपेक्षा जास्त वेळ ताप येणं धोकादायक; पावसाळ्यात करू नका दुर्लक्ष, अन्यथा...

२४ तासांपेक्षा जास्त वेळ ताप येणं धोकादायक; पावसाळ्यात करू नका दुर्लक्ष, अन्यथा...

पावसाळ्यात कधी पाऊस तर कधी ऊन असे हवामानात सतत बदल होत असतात, ज्याचा आरोग्यावर वाईट परिणाम होत आहे. अनेक आजार झपाट्याने पसरत आहेत. याच दरम्यान अनेकांना हमखास ताप येतो. मात्र हा ताप काही दिवसांनी जातो. तुम्ही त्यातून बरे होता. पण जर याकडे दुर्लक्ष केलं तर ते तुम्हाला महागात पडू शकतं. त्यामुळे ही चूक करू नका. 

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, या ऋतूत २४ तासांपेक्षा जास्त वेळ ताप येत असल्यास सावधगिरी बाळगणं अत्यंत आवश्यक आहे. कारण, हा ताप अनेक आजारांचं लक्षण असू शकतो. तापाद्वारे शरीर संसर्गाशी लढतं, परंतु जर ते दीर्घकाळ टिकत असेल तर याचा अर्थ संसर्ग गंभीर होऊ लागला आहे आणि इतर समस्यांचा धोका आहे. काही प्रकरणांमध्ये, दीर्घकाळ टिकणारा ताप शरीराच्या अनेक अवयवांना इजा करू शकतो.

पावसाळ्यात ताप येऊ नये म्हणून हे करा

1. नियमितपणे हात धुवा आणि स्वच्छता राखा.
2. संक्रमित लोकांपासून स्वतःचं रक्षण करा.
3. फक्त पौष्टिक अन्न खा आणि भरपूर पाणी प्या.
4. व्यायाम आणि चांगली झोप घ्या.

पावसाळ्यात २४ तासांपेक्षा जास्त ताप राहिल्यास ताबडतोब डॉक्टरांकडे जा. याशिवाय तापासोबत डोकेदुखी, उलट्या, जुलाब किंवा धाप लागणे, अंगावर लाल पुरळ उठणे, बेशुद्ध पडणे असा त्रास होत असेल तर रुग्णालयात जा. जेणेकरून आजारावर योग्य वेळी उपचार करता येतील. यामध्ये थोडासा निष्काळजीपणाही परिस्थिती गंभीर बनवू शकतो.

दरवर्षी या ऋतूत डेंग्यूने कहर केला आहे, मात्र यंदा डेंग्यूशिवाय इतरही अनेक व्हायरस लोकांमध्ये धुमाकूळ घालत आहेत. निपाह व्हायरस असो, चांदीपुरा व्हायरस असो, झिका व्हायरस असो किंवा व्हायरल फ्लू, प्रत्येकाचं पहिलं लक्षण म्हणजे ताप. अशा स्थितीत जर ताप २४ तासांपेक्षा जास्त काळ राहत असेल तर त्याला हलक्यात घेण्याची चूक करू नका. ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घेणे आणि शक्य तितक्या लवकर रोगाचे निदान करणे खूप महत्वाचे आहे जेणेकरून वेळेवर उपचार सुरू करता येतील.

कसं राहायचं सुरक्षित?

तापासह संसर्गाचे परिणाम कमी करणे सर्वात महत्वाचे आहे. यावेळी, डिहायड्रेशनपासून वाचण्याचा प्रयत्न करा आणि शक्य तितकं पाणी प्या. विशेषतः उष्णता असल्यास स्वतःला हायड्रेटेड ठेवणं महत्वाचं आहे. याशिवाय, जर तुम्हाला ताप, उलट्या, जुलाब असं काही होत असेल तर जास्तीत जास्त विश्रांती घ्या कारण विश्रांतीमुळे शरीराला संसर्गाशी लढण्यास मदत होते. याशिवाय पावसाळ्यात भिजल्यामुळे किंवा इतर कारणांमुळे ताप येत असेल तर थंड पाण्याने अंघोळ करू नका, गरम पाण्यानेच अंघोळ करा.

Web Title: fever can become severe for more than 24 hours in monsoon season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.