सकाळी लवकर जागे होण्याचे काही खास उपाय
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2018 05:07 PM2018-04-06T17:07:34+5:302018-04-06T17:07:34+5:30
सकाळी उठणं काही होत नाही. अनेकजण सकाळी उठण्याचे अनेक प्लॅन करतात. पण तेही एक-दोन दिवस. पुन्हा ये रे माझ्या मागल्या...हे होतंच.
(Image Credit: wikiluv.com)
वयोवृद्ध लोकं नेहमीच घरातील तरुणांमागे सकाळी लवकर उठण्यासाठी तगादा लावतात. पण सकाळी उठणं काही होत नाही. अनेकजण सकाळी उठण्याचे अनेक प्लॅन करतात. पण तेही एक-दोन दिवस. पुन्हा ये रे माझ्या मागल्या...हे होतंच. त्यामुळे आम्ही सकाळी लवकर उठण्याच्या काही टिप्स तुम्हाला सांगणार आहोत.
रात्री वेळेत झोपा
इतर कामापेक्षा पुरेश्या झोपला प्रथम प्राधान्य द्या. रात्री उगाच टाईमपास म्हणून टीव्ही बघत बसू नका. यासाठी रात्री ठरवून वेळेवर झोपा व सकाळी लवकर उठा.
उशीरा झोपण्याची सवय बदला
रात्री उशीरा झोपल्याने दुस-या दिवशी सकाळी लवकर उठायला तुम्हाला शक्य होत नाही. मग या गोष्टीची तुम्हाला सवयच लागते. सर्वप्रथम ही सवय बदला. रात्री झोप येत नसेल तर रात्री एक ग्लास कोमट दूध घ्या. थोडं चला. ज्यामुळे तुम्ही लवकर झोपू शकाल.
प्रयत्न सोडू नका
जर तुम्ही ठरवल्याप्रमाणे तुम्हाला सकाळी जाग आली नाही, तर लगेच धीर सोडू नका. तुमच्या शरीराला उशीरा उठण्याची सवय लागली आहे. ही सवय मोडायला थोडा वेळ लागेल. जरी पहिल्या दिवशी तुम्हाला वेळेत जाग आली नाही तरी आठवडाभर प्रयत्न केल्यास तुम्हाला लवकर उठण्याची सवय लागेल.
आधी छोटे ध्येय गाठण्याचा प्रयत्न करा
सकाळी लवकर उठण्याचा प्रयत्न करण्यासाठी आधी छोटे-छोटे ध्येय गाठण्याचा प्रयत्न करा. म्हणजे पहिल्या दिवशी नेहमीच्या वेळेच्या १५ मिनिटे आधी झोपा व दुस-या दिवशी १५ मिनिटे लवकर उठण्याचा प्रयत्न करा. मग दुस-या दिवसापासून ३० मिनिटे आधी झोपा व ३० मिनिटे लवकर उठण्याचा प्रयत्न करा.
दुपारी झोप घेण्याचे टाळा
कधीही दुपारी झोपू नका. कारण दुपारी झोपल्याने रात्री लवकर झोप लागत नाही. त्यामुळे पुन्हा सकाळी लवकर जाग येत नाही. दुपारची झोप टाळण्यासाठी स्वत:ला इतर गोष्टीत किंवा तुमच्या आवडीच्या छंदामध्ये गुंतवा.
आठवडाभराच्या कामाचे नियोजन करा
आठवडाभरात तुम्ही जी कामे करणार आहात त्याचे आधीच नियोजन करा. रोजच्या कामामध्ये तुम्हाला उत्साहीत करणारी कामे सकाळसाठी ठरवा.