पैशांच्या स्ट्रेसमुळे वाढू शकतो तुमचा मायग्रेनचा त्रास - रिसर्च
By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2019 10:13 AM2019-01-02T10:13:14+5:302019-01-02T10:15:24+5:30
आर्थिक अडचणीमुळे काय काय समस्या होऊ शकतात हे काही कुणाला वेगळं सांगायला नको. ते म्हणतात ना सगळ्या गोष्टीचं सोंग आणता येतं, पण पैशांचं आणता येत नाही.
(Image Credit : Medical News Today)
आर्थिक अडचणीमुळे काय काय समस्या होऊ शकतात हे काही कुणाला वेगळं सांगायला नको. ते म्हणतात ना सगळ्या गोष्टीचं सोंग आणता येतं, पण पैशांचं आणता येत नाही. पैशांची अडचण हे टेन्शन, तणावाचं कारण ठरतं हे सर्वांनाच माहीत आहे. पण याचा आरोग्यालाही धोका आहे. आर्थिक अडचणीमुळे येणाऱ्यामुळे विशेष जीन असणाऱ्या लोकांमध्ये मायग्रेन वाढण्याचं कारण ठरु शकतं, असं एका रिसर्चमधून समोर आलं आहे.
काय आहे मायग्रेन?
मायग्रेन म्हणजे वारंवार आणि अनेकदा डोक्याच्या एकाच बाजूला होणारी तीव्र डोकेदुखी. ही कधी एका बाजूची तर कधी दोन्ही बाजूंची असते. डोकेदुखीबरोबर काहींना ओकार्याही होतात. अर्धशिशीने त्रस्त झालेल्या व्यक्तींमध्ये जवळजवळ 60 % स्त्रिया असल्याचे आढळून आले आहे.
अर्धशिशीचा अॅटॅक येण्याचीही काही कारणं आहेत. त्यापैकी महत्त्वाची कारणं म्हणजे स्त्रियांना मासिक पाळीच्या वेळी होणा-या हार्मोन्स बदलामुळे, तसेच रंगाचा, अत्तराचा सुगंध, प्रकाशाची तीव्रता, चहा-कॉफीचे अति सेवन, अति तेलकट खाणं, अनियमित झोप, अति शारीरिक श्रम, कामाचा ताण, अति व्यायाम, ऋतुमानातील बदल यांमुळे अर्धशिशीचा त्रास वाढू शकतो.
हंगरीच्या सेमीमेलवीस विश्वविद्यालयाच्या अभ्यासकांनी या अभ्यासासाठी क्लॉक जीनच्या दोन प्रकारांसाठी २३९४ रुग्णांना यात सहभागी करुन घेतलं आणि याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला की, आर्थिक अडचणीमुळे येणारा तणाव आणि मायग्रेन यांचा काय संबंध आहे.
क्लॉक जीन हे स्लीप-वेक प्रक्रियेशी जुळलेले जीन आहेत. हे सकॅडियन रीदम म्हणूनही ओळखले जातात. याने मायग्रेन वाढू शकतो.
अभ्यासकांनुसार, क्लॉक जीन शरीराच्या वेगवेगळ्या रिदम पॅटर्नला नियंत्रित करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो. यात शरीराचं तापमान येतं. अभ्यासादरम्यान असं आढळलं की, जीन आणि मायग्रेनमध्ये थेट संबंध नव्हता. पण या लोकांना जेव्हा आर्थिक अडचणीचा तणाव होता, तेव्हा त्यांच्यात मायग्रेनची समस्या जवळपास २० टक्क्यांनी वाढलेली आढळली.
अभ्यासकांनी क्लॉक जीनच्या आत असलेल्या सिंगल न्यूक्लियोटाइड पॉलीमॉर्फिज्मवर विचार केला, ज्यातून हे समोर येतं की, जीनकडून किती प्रोटीन घेण्यात आलं. हे प्रोटीन बॉडी क्लॉक मशिन्सना नियंत्रित करतं. त्यामुळे याने मायग्रेनपासून बचाव केले जाणाऱ्या प्रक्रिया खराब होतात.
या अभ्यासातून हे समोर नाही आलं की, मायग्रेनचं कारण काय आहे. पण हे समोर आलं की, स्ट्रेस आणि जीन दोन्हींमुळे मायग्रेनचा धोका वाढतो. बुडापेस्ट सेमीमेलवीस यूनिव्हर्सिटीचे प्राध्यापक डॅनिअल बक्ष्सा यांच्यानुसार, आर्थिक अडचणीतून येणाऱ्या तणावामुळे हे विशेष जीन असणाऱ्या लोकांना मायग्रेन होऊ शकतो.
मायग्रेन दूर करण्याचे घरगुती उपाय
यावर घरगुती उपाय म्हणजे लिंबू चिरावे आणि अर्धा भाग कपाळावर घासावा. लिंबाच्या रसातील गुणतत्त्वांमुळे वेदना कमी होतात. नियमितपणे हा उपाय केल्यास अर्धशिशीपासून मुक्ती मिळू शकते. या उपायाबरोबरच ही व्याधी असणार्यांनी नियमितपणे लिंबाच्या सरबताचे सेवन करावे. मात्र, साखरेचा वापर टाळावा. या सरबतात सैंधव वापरणे अधिक चांगले. लिंबाच्या रसामुळे शरीरातील अल्कलाइन आणि इलेक्ट्रोलाइट्समध्ये वृद्धी होते आणि शरीराची रोग प्रतिकारशक्ती वाढते.
या गोष्टी टाळा
- फार काळ उपाशी राहू नये.
- तंबाखू, दारू, सिगारेट आदी व्यसनं टाळा.
- अती विचार करू नका.
- अती मांसाहार करू नका.
- दही वर्ज्य करा.
- उन्हात फिरणं टाळा.
- छत्री किंवा टोपी घेतल्याशिवाय बाहेर पडू नका.
- मानसिक संतुलन ठेवण्याचा प्रयत्न करा. अती ताण टाळा.
- स्ट्रेस हार्मोन्स (ताण वाढवणारे हार्मोन्स) वाढले तर त्यामुळेसुद्धा हा त्रास वाढतो.