हिवाळ्यात असे रहा फिट...!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2016 08:10 PM2016-11-03T20:10:55+5:302016-11-04T18:19:57+5:30
हिवाळा सुरु होताच त्याचा परिणाम आपली त्वचा, शरीर आणि शारीरिक प्रक्रियांवर जाणवायला लागतो. हिवाळ्यात भूक वाढते आणि शारीरिक कष्ट काहीअंशी कमी होतात.....
हिवाळा सुरु होताच त्याचा परिणाम आपली त्वचा, शरीर आणि शारीरिक प्रक्रियांवर जाणवायला लागतो. हिवाळ्यात भूक वाढते आणि शारीरिक कष्ट काहीअंशी कमी होतात, मात्र लहान-सहान गोष्टींसोबत सकाळची सुरुवात केली तर हिवाळ्यात आपण सृदृढ तर राहणारच शिवाय आपल्या सौंदर्यातदेखील भर पडेल. आजच्या सदरात आपण हिवाळ्यात फिट राहण्यासाठी काय काळजी घ्याल याबाबत जाणून घेऊयात...
* अंथरुण सोडल्यानंतर लगेच व्यायाम करा-
अंथरुणावरुन उठल्यानंतर आपल्या शरीरास ताण द्या आणि नंतर ढिले सोडा. पुन्हा ताणा आणि ढिले सोडा. चार ते पाच वेळा ही क्रिया करा. असे केल्याने शरीराचे तापमान वाढेल. जर आपल्याकडे वेळ असेल तर एका ठिकाणी उभे राहून काही वेळ जॉगिंग करा. असे केल्याने शरीरात स्फूर्ती येईल आणि आपले पुढची कामे लवकर होतील.
* उटण्याने स्रान करा-
हिवाळ्यात स्रान करताना साबणाचा वापर कमी करा, त्याऐवजी चांगल्या प्रतीचे उटणे लावा. हात, पाय, पाठ, गुडघे तसेच मान उटण्याने चांगले चोळून स्रान करा व त्यानंतर टॉवेलने अंग पुसा. याप्रकारच्या स्रानाने ताजेतवाने तर वाटेलच शिवाय स्फूर्ती आणि उष्णतादेखील मिळेल.
* पोट भरुन खा
हिवाळ्यात भूक अधिक लागते आणि रिकाम्या पोटी थंडी जास्त वाजते. यासाठी सकाळी पौष्टिक नास्ता भरपूर खा. तसेच जेवणात भरपूर ऊर्जा प्रदान करणारे खाद्यपदार्थ घ्या. गरमागरम सूप घेणेदेखील या ऋतूत आरोग्यासाठी फायदेशीर असते.
* गरम कपडे परिधान करा-
ऋतुमानानुसार कपड्यांची निवड करा. त्यात जाड व जड कपड्यांऐवजी बारीक पण गरम कपडे घ्या. यामुळे आपला नक्कीच थंडीपासून बचाव होईल. तसेच इनरवेअर कॉटनचे असतील तर उत्तमच. दस्ताने आणि मोजे परिधान करण्यात संकोच नको. यामुळे आपणास आराम तर मिळेलच शिवाय त्वचेचेही संरक्षण होईल.
* पायी चला-
जर आपले कार्यालय आपल्या घरापासून जास्त लांब नसेल तर कार्यालयापर्यंत पायी जा. यामुळे रक्ताभिसरण प्रक्रिया वाढेल, ज्यामुळे आपणास थंडी जास्त जाणवणार नाही. या ऋतूत लिफ्टचा प्रयोग कमी करा. दिवसातून दोन ते तीनदा पायºयांचा वापर करा. यामुळे शरीराचा व्यायाम तर होईल शिवाय शरीरास ऊर्जादेखील मिळेल. जर आपले काम पायी चालण्याचे जास्त नसेल तर घरात जेव्हाही वेळ मिळेल वेगाने काही वेळ चाला. चालल्याने शरीरास गरमी मिळते.
* ओठ व पायांची काळजी घ्या-
या ऋतूत पायाच्या टाचा आणि ओठांना तडे पडतात. यासाठी पायांची मालिश करुन थंडीपासून बचाव करावा. घरात स्लीपरसोबतच मोजे परिधान करा. तसेच ओठांवर व्हॅसलीन व लिपस्टिक लावत रहा, यामुळे ओठ कोरडे पडणार नाहीत.
* घराचे तापमान संतुलित ठेवा-
घराचे तापमान संतुलित ठेवा. जास्त उष्ण किंवा जास्त वातानुकूलित रुममध्ये झोपू नये. यामुळे थंडीपासून तर बचाव होईल मात्र, सकाळी उठल्यावर आपल्याला फ्रेश तर वाटणार नाही शिवाय सुस्ती अधिक वाटेल.
* मॉयश्चरायजरला अधिक महत्त्व द्या-
या काळात गार हवा आणि दुपारचे उष्ण तापमान याचा त्वचेवर परिणाम होतो. यासाठी कोल्ड क्रीमसोबतच मॉयश्चरायजरचा प्रयोग करा. त्वचेची मुलायमता कायम ठेवण्यासाठी पेट्रोलियम, लेनोलिन, मिनरल आॅइल, ग्लिसरीन आदीचा देखील प्रयोग करा. यातील मुलायम ठेवणाºया तत्वांमुळे त्वचेचे रक्षण होते.