सावधान! कोरोनानंतर आता आणखी एक संकट; मेंदू खाणाऱ्या 'अमिबा'चा धोका, 'ही' आहेत लक्षणं
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2023 10:01 AM2023-03-02T10:01:53+5:302023-03-02T10:08:13+5:30
रोजच्या प्रमाणेच नळाच्या पाण्याने नाक साफ केले. परंतु त्याने त्या दिवशी यासाठी पाणी न उकळताच घेतले होते. या पाण्यातूनच त्याला नेग्लेरिया फाउलेरी या अमिबाची लागण झाली.
शरीरात शिरलेल्या अमिबामुळे अमेरिकेत एका व्यक्तीचा मागच्या आठवड्यात बळी गेला. या व्यक्तीला दुर्मीळ आजार झाला होता. पुढे आजार विकोपाला गेला आणि उपचारादरम्यान त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. हा प्रकार फ्लोरिडातील शार्लोट काऊंटीमध्ये घडला आहे. याबाबत अधिक तपास सुरू असल्याने फ्लोरिडाच्या आरोग्य विभागाने अद्याप त्या व्यक्तीचे नाव जाहीर केलेले नाही.
नेमके काय झाले?
या व्यक्तीने रोजच्या प्रमाणेच नळाच्या पाण्याने नाक साफ केले. परंतु त्याने त्या दिवशी यासाठी पाणी न उकळताच घेतले होते. या पाण्यातूनच त्याला नेग्लेरिया फाउलेरी या अमिबाची लागण झाली. नाकावाटे शिरकाव केलेला हा जीव नंतर मेंदूपर्यंत पोहोचतो.
हा जीव मेंदूत गेला की, माणसाला प्रायमरी अमेबिक मेनिंगोएन्सेफलायटिस-पीएएम हा आजार होतो. हा अमिबा मेंदूंच्या ऊती खाऊन नष्ट करतो. असे झाल्यास सामान्यपणे व्यक्तीचा मृत्यू ओढवतो. त्यावर डॉक्टरांना अद्याप उपाय करता आलेला नाही.
आतापर्यंत किती जणांचे बळी?
- हा एकपेशीय जीव सामान्यपणे तलाव, नदीमध्ये आढळतो. अशा ठिकाणी पोहणारे, डुबकी घेणाऱ्यांना याची लागण होण्याची भीती असते. परंतु हा जीव नळावाटे येणाऱ्या पाण्यात आढळल्याचे पुरावे नाहीत.
- १९६० पासून आतापर्यंत या आजाराचे एकूण १५७ रुग्ण आढळले आहेत. यातील १५३ जणांचा मृत्यू झाला आहे.
- बहुतांश रुग्ण दक्षिण अमेरिकेतील राज्यांमध्ये आढळले आहेत. टेक्सासमध्ये ३९ तर फ्लोरिडामध्ये ३८ जण आढळले आहेत.
- अमिबा सामान्यपणे उष्ण ठिकाणी व उबदार पाण्यात आढळतो. परंतु अलीकडे काही रुग्ण उत्तरेकडील राज्यांमध्येही आढळले आहेत.
बाधा झाल्याची काय आहेत लक्षणे?
नाकावाटे अमिबाने शरीरात शिरकाव केल्यानंतर पुढच्या १२ दिवसात त्या व्यक्तीला ताप येऊ लागतो.
डोके दुखू लागते. उलट्या होऊ लागतात.
मान आखडू लागते, स्मृतिभ्रंश होऊ लागतो.
मज्जासंस्थेशी संबंधित अनेक अडचणी निर्माण होऊ लागतात.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"