रात्री लवकर झोप येण्यासाठी टाळा 'या' गोष्टी, घ्यावं लागणार नाही कोणतं औषध

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2024 09:52 AM2024-01-08T09:52:51+5:302024-01-08T09:53:38+5:30

कामाचा ताण, चिंता, चुकीच्या सवयी यामुळे अनेकांना लवकर झोप येत नाही. अशात आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या होतात.

Follow these 6 things to your routine to get deep sleep instantly | रात्री लवकर झोप येण्यासाठी टाळा 'या' गोष्टी, घ्यावं लागणार नाही कोणतं औषध

रात्री लवकर झोप येण्यासाठी टाळा 'या' गोष्टी, घ्यावं लागणार नाही कोणतं औषध

Sleeping Problem : आजकाल वेगवेगळ्या कारणांनी रात्री चांगली आणि लवकर झोप न येण्याची समस्या अनेकांना होते. सामान्य डॉक्टर सांगतात की, दिवसातून किमान 7 ते 8 तास झोप घेतली पाहिजे. पण कामाचा ताण, चिंता, चुकीच्या सवयी यामुळे अनेकांना लवकर झोप येत नाही. अशात आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या होतात. तुम्हाला तुमच्या रात्रीच्या झोपेचं खोबरं होऊ द्यायचं नसेल तर खालील गोष्टींची काळजी घ्यावी.

1) धुम्रपान व मद्यपान टाळा 

झोपण्यापूर्वी मद्यपान केल्यामुळे झोप येण्यास मदत होते हा चुकीचा समज आहे. मद्यपानामुळे  तुम्हाला झोप आली, तरीही ती सुखकारक झोप नसून यामुळे तुम्हाला रात्री सारखी जाग येईल. तसेच धुम्रपानामुळे देखील आरोग्यदायी झोप मिळत नाही. 

2) झोपण्याआधी खूप पाणी पिऊ नका 

आरोग्य चांगलं राहण्यासाठी भरपूर प्रमाणात पाणी पिणं गरजेचं आहे. मात्र रात्री झोपण्यापूर्वी खूप जास्त पाणी प्यायल्याने लघवीसाठी तुम्हाला सतत उठावं लागतं. त्यामुळे झोपमोड होऊ शकते.

3) रात्री भरपूर  खाणे टाळा 

चांगल्या आरोग्यासाठी सर्वात जास्त सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण व रात्रीचे जेवण कमी करणं चांगलं मानलं जातं. तसेच रात्रीचं जेवण जास्त मसालेदार असू नये. यामुळे पित्त व पचनाचे विकार होऊन रात्रीची झोप बिघडू शकते. म्हणून झोपण्यापूर्वी किमान दोन ते तीन तास अगोदर जेवणेच चांगले आहे. जेवल्यावर लगेच झोपू नका.

4) दिवसा डुलकी घेणे टाळा

पोटभर जेवणानंतर बऱ्याचदा दुपारी झोप येते. छोटीशी डुलकी घेणे तुम्हाला दिवसभर प्रसन्न ठेवण्यास मदत करेल मात्र, वामकुक्षी घेण्याच्या सवयीमुळे तुमची रात्रीची झोप बिघडू शकते. रात्री तुमची पुरेशी झोप न झाल्याने तुमचा दुसरा दिवस चांगला जाणार नाही.

5) चहा / कॉफी टाळा 

चहा व  कॉफीत आढळणाऱ्या ‘कॅफिन’ या उत्तेजक घटकामुळे तुम्ही झोप टाळू शकता. तसेच विविध पेयांमध्ये आढळणाऱ्या कॅफिनमुळे रात्री वारंवार लघवीला जावे लागते. त्यामुळे रात्रीच्या वेळी झोपण्यापूर्वी चार ते सहा तास अगोदर चहा , कॉफी यासारखी पेय घेणे टाळा.

6) झोपताना विचार/चिंता करणे टाळा

झोपण्यापूर्वी अनावश्यक गोष्टींचा विचार करणे, चिंता करत राहणे यामुळे तुमची झोप कमी होऊ शकते. तुमच्या मेंदूला मनन करण्यासाठी व दुसऱ्या दिवसासाठी पुन्हा सज्ज होण्यासाठी थोडा वेळ द्या. झोपण्यापूर्वी किमान दोन ते तीन तास अगोदर चिंता व विचार करत बसणे टाळा.

Web Title: Follow these 6 things to your routine to get deep sleep instantly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.