रोज प्लास्टिकच्या डब्यातलं अन्न खाताय? - सावधान!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 03:02 PM2017-08-19T15:02:01+5:302017-08-19T15:04:01+5:30
प्लास्टिक कंटेनरमधील अन्न खाल्यानं उद्भवतील आरोग्याच्या अनेक समस्या
- मयूर पठाडे
रोजच्या कामाच्या धबडग्यात आपलं जेवणाकडे दुर्लक्ष होतंच. वेळच्या वेळी जेवण करायचं कितीही म्हटलं तरी ते होत नाहीच. काही ना काही काम निघतं, हातातलं काम सोडवत नाही, डेडलाइन मागे लागलेली असते.. वेळच्या वेळी जेवण होत नाही ते नाहीच, पण निदान ज्या डब्यातलं आपण खातोय, तो तरी व्यवस्थित आहे की नाही? समजा डबा सोबत नेलाच नसेल, बाहेरचंच काही आपण खात असू, तर ते पदार्थ कशात पॅक केलेले असतात?..
तपासून पाहा स्वत:लाच. आपलं जेवण कशात पॅक केलेलं असतं? तुमचा डबा प्लास्टिकचा आहे का? किंवा बाहेरुन जे पदार्थ तुम्ही मागवता, ते कशात गुंडाळलेले असतात. प्लास्टिकचा आणि तुम्ही जे काही अन्न खाता, त्याचा काही संबंध आहे का?
तुम्ही कायम प्लास्टिकच्या डब्यातलं अन्न खात असाल किंवा पॅक्ड फूड जे प्लास्टिक कंटेनरमध्ये असेल, त्याचा जर आस्वाद तुम्ही घेत असाल, तर तुम्हाला नक्कीच ते महागात पडू शकतं.
पाण्यासाठी प्लास्टिकची बाटली, प्लास्टिकच्या प्लेट्स.. या गोष्टीदेखील तुमच्या आरोग्याला त्रासदायक ठरू शकतात.
काय आहेत प्लास्टिकचे धोके?
१- प्लास्टिकच्या संपर्कात असलेले खाद्यपदार्थ जर तुम्ही सतत खात असाल, तर लक्षात ठेवा, तुम्हाला हृदयविकाराचा त्रास होऊ शकतो.
२- प्लास्टिकच्या संपर्कातील अन्न दुषित होऊन त्यामुळे ब्लड प्रेशरच्या संदर्भातील तुमच्या तक्रारीही मोठ्या प्रमाणात वाढू शकतात.
३- भले तुम्ही आरोग्याची काळजी घेत असाल, पण प्लास्टिक कंटेनरमधील अन्न खाल्यामुळे तुम्हाला डायबेटिसचा धोका वाढू शकतो आणि इतर आजारही तुमच्यावर कुरघोडी करु शकतात.
४- प्लास्टिक पदार्थातील अन्न सेवन केल्यामुळे तुमच्या शरीरातील थॅलेट्सचं प्रमाण वाढतं आणि त्यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्तीही कमी होते.
५- पाश्चात्य देशात सॉफ्ट ड्रिंक्स आणि पॅक्ड फूड खाणारे लोक मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे त्यांच्या शरीरात थॅलेट्सं प्रमाण अधिक आढळून येतं आणि त्यांच्या आरोग्यावर होणारा विपरित परिणामही तुलनेनं जास्त आहे.